" कवी कट्टाच्या माध्यमातून कवितेचा जागर"
काव्यप्रेमी शिक्षक मंच या राज्यव्यापी मंचाचा सोलापूर शहर अध्यक्षाची धुरा माझ्याकडे आल्यानंतर कवितेसाठी एखादा उपक्रम राबवावा जो वर्षभर चालेल असा विचार माझ्या समोर आला आणि मग कवी कट्टा ची कल्पना सुचली. कल्पना सुचल्यानंतर मी ही कल्पना आमचे राज्याध्यक्ष श्री. आनंदजी घोडके यांना ती सांगितली . त्यांनी ही कल्पना लगेच उचलून धरली. २०२१ या वर्षात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ऑनलाईन पद्धतीने सलग बाराही महिने कवी कट्टा चे आयोजन केले गेले ज्यामुळे राज्यातील कवींना व्यासपीठ मिळून त्यांना आपल्या रचना सादर करण्याची संधी मिळाली. पहिल्या कवी कट्टाचे उदघाटन काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष श्री. आनंद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले तर राज्य सचीव श्री. कालिदास चवडेकर यांचे कवी कट्टाला मार्गदर्शन लाभले. पुढील कवी कट्टाचे उदघाटन सर्वश्री नारायण दुमालदार , प्रा. सत्येंद्र राऊत, हणमंत पडवळ, बाबुराव घाडीगावकर , पी. नंदकिशोर , संजय कुळये , श्रीमती विजया पाटील , सौ. जस्मिन शेख यांनी केले तर स्व. विजयकुमार देशपांडे, श्री. राजेश साबळे , श्री. मुकेश विशे , श्री. द. ल. वारे , सौ. योजगंधा जोशी आदी मान्यवरांचे उत्तम मार्गदर्शन या कवी कट्टास लाभले. राज्य कोषाध्यक्ष श्री. कृष्णा शिंदे , श्री. वसंत पोतदार , श्री. खाजाभाई बागवान , सौ. रामेश्वरी सुतार, सौ. शुभम पाटील , श्री. प्रमोद गायकवाड आदींनी बहारदार सुञसंचलन करून कवी कट्टाची रंगत वाढवली . राज्यातील सोलापूर , नागपूर , अमरावती, पुणे, चंद्र्पुर , सांगली , मिरज, मुंबई इत्यादी व राज्याबाहेरील गोवा या ठिकाणातील कवींनी कवी कट्टा वर येऊन आपल्या उत्तम अश्या रचना सादर करून वर्षभर कवितेचा जागर केला. सर्व सहभागी कवींना ऑनलाईन पद्धतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
कोणताही खंड न पडता फक्त एका महिन्यात माझ्या पुतण्याचे लग्न असल्याकारणाने फक्त तारीख मागेपुढे झाली पण वर्षभर या कवीकट्टाचे आयोजन करण्यात मी यशस्वी ठरलो. कवी कट्टा मुळे राज्यातील अनेक कवींची, साहित्यकांची माझी ओळख झाली. या उपक्रमात सातत्य राखल्याचा अनुभव मला माझ्या इतर कामात देखील झाला. कोणताही उपक्रम एक वर्ष राबविणे हे माझ्यासाठी आव्हानच होते. पण सर्वांच्या सहकार्याने ते आव्हान मी पार पाडले. कवी हा आपली रचना सादर करण्यासाठी धडपडत असतो त्यातला त्यात नवकवीला आपली कविता कोणीतरी ऐकावी, ती सादर करण्याची संधी मिळावी असे वाटत असते. कवी कट्टाच्या माध्यमातून अशा कवींना एक सुंदर व्यासपीठ मिळाले. हा उपक्रम ऑनलाईन असल्याकारणाने कवी आपल्या घरी राहून यात सहभागी झाले. प्रत्येक कवी कट्टा मध्ये १० कवींना संधी देण्यात आली. तसेच १० नवीन सूत्रसंचालकांना सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. १० उत्तम अशा साहित्यकांची मार्गदर्शनाची मेजवानी सहभागी कवींना मिळाली. प्रत्येक कवी कट्टाचे उदघाटन देखील वेगळ्याप्रकारे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कधी झाडाला पाणी घालून , छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेला हार घालून, उदघाटकाने कविता सादर करून अशा विविध प्रकारे कवी कट्टाचे उदघाट्न केले गेले. प्रत्येक महिनाचा शेवटचा रविवार संध्याकाळी ५ वाजता कवी कवी कट्टासाठी ऑनलाईन हजेरी लावत. पुढील वर्षीदेखील हा कवी कट्टा चालू ठेवावा अशी काही कवींची मागणी होती परंतु मला काहीतरी नवीन उपक्रम राबवायचा होता म्हणून कवी कट्टाची वर्षाअखेर सांगता केली.

Comments
Post a Comment