"दृक्श्राव्य दिवाळी अंक"



सन २०२२ च्या दिवाळीला एका अनोख्या दिवाळी अंकात सहभाग घेण्याची संधी मिळाली तो म्हणजे रेणुका आर्टस् प्रस्तुत स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक. हा अंक पाहता येत होता , वाचता येत होता आणि ऐकताही येत होता. आतापर्यंत छापील अनेक दिवाळी अंकात लेख , कविता प्रकाशित झाले होते पण गेल्या वर्षी स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक याच्या संपादिका आसावरी इंगळे मॅडम यांच्या फेसबुकच्या पोस्ट वरून या दिवाळी अंकात सहभाग घेतला.

यात माझ्या 'गुणांची उजळणी करूया ' या लेखाचे अभिवाचन ' माणसाच असंच असतं ' या कवितेचे सादरीकरण व 'तुमसे मिलना बाते करना' या गीताचे गायन याचा समावेश होता . संपादिका आसावरी इंगळे मॅडम यांनी सलग तिसऱ्या वर्षी खूप मेहनतीने , कल्पकतेने हा अंक तयार केला होता. तीनही प्रकारात सहभाग घेणारा बहुतेक मी एकटा होतो. हा अंक संपूर्ण जगात पोहचू शकला कारण हा ऑनलाईन होता. मराठी माणूस जगात जेथे कोठे आहे त्याला त्याच्या जागेवरून हा अंक ऑनलाईन पाहणे, ऐकणे आणि वाचणे शक्य होते. तंत्रज्ञानाचा वापर किती चांगल्या रीतीने करता येतो हे या अंकावरून याच्या संपादिका आसावरी इंगळे मॅडम यांनी दाखवून दिले.

दिवाळी आणि दिवाळी अंक याचे महाराष्ट्रात खूप वर्षांपासून एक सुंदर असे समीकरण आहे. दिवाळी फराळासोबत दिवाळी अंक वाचणे याची मजा काही औरच. अनेक दिवाळी अंक दर दिवाळीला प्रकाशित होतात. वाचक त्याचे स्वागत करत त्याचा वाचनाचा आनंद घेतात. दिवाळी अंकाची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. अनेक दिवाळी अंक यात सहभागी होतात. दर वर्षी काही नवीन दिवाळी अंकाची भर पडत असते. वाचन संस्कृती कमी झाल्या कारणाने दिवाळी अंकास आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मागणी देखील कमी आहे. काही दिवाळी अंकाचा प्रकाशित करण्याचा खर्च तरी निघतो का नाही हा प्रश्नच आहे. तरी काही प्रकाशक दिवाळी अंक दर वर्षी प्रकाशीत करतच असतात . वाचकांनी त्याला उत्तम असा प्रतिसाद देणे दिवाळी अंक संस्कृती टिकण्यासाठी आवश्यक आहे. दिवाळी अंकांचा प्रकाशनाचा खर्च निघणे आवश्यक आहे तरच प्रकाशक टिकतील व दिवाळी अंक दर दिवाळीला निघत राहतील . स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक या सारखे प्रयॊग करणे देखील आवश्यक आहे ज्यास फारसा खर्च येत नाही . स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक हा एक नवीन प्रयोग होता व तो यशस्वी झाला.

या स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकात सहभागी होण्याचा अनुभव काही वेगळाच होता. माझ्या लेखाचे अभिवाचन मी कधी केले नव्हते या निमित्ताने ते करण्याची संधी मला मिळाली. गाणे गाण्याचा छंद मला आहे. जेव्हा कोठे गाणे गाण्याची संधी मला मिळते तेव्हा अशी संधी मी कधी सोडत नाही. यात गाणे गाण्याची संधी देखील मला मिळाली. कविता सादरीकरण देखील माझे आवडीचे काम ते देखील या अंकात करता आले. संपादिका आसावरी इंगळे मॅडम यांचे खूप खूप आभार कि अशा अनोख्या दिवाळी अंकात मला संधी दिल्याबद्यल. खरंच हा वेगळा अनुभव होता.

Comments

Popular posts from this blog