' लिहा एक पत्र आईसाठी '
व्हाट्सअँप, फेसबुक, इन्स्ट्रा , ई-मेल या सारख्या माध्यमामुळे पत्र लिहणे आणि ते पाठविणे हे मागे पडले आहे. नवीन पिढीला पत्रलेखन फक्त अभ्यासक्रमापुरते व परीक्षेतील मार्कापुरते . प्रत्यक्ष अंतर्देशीय पत्र , पोस्टकार्ड काय असते हे या पिढीला माहित देखील नाही. जागतीक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री. विकास गोसावी सर यांच्या संस्थेने ' लिहा एक पत्र आईसाठी ' हा विषय घेऊन पत्रलेखनाची संधी तेही आंतर्देशीय पत्रावर या नवीन पिढीला दिली . माझ्या इयत्ता ८ वीतील मुलास पार्थास आंतर्देशीय पत्र , पोस्टकार्ड आणून देऊन कमीत कमी ते कसे असते व त्यावर कसे लिहायचे हे माहित व्हावे या उद्देशाने भाग घ्यावयास लावला . उद्देश सफल झाला असे म्हणावयास हरकत नाही . आमचे मित्र श्री. अरविंद म्हेत्रे सर यांच्या माझे फेसबुक स्नेही या ग्रुप मुळे श्री. विकास गोसावी सर यांच्या या उपक्रमाची माहिती झाली . या निमित्ताने पत्र लिहण्याचा आनंद त्याला घेता आला .
नवीन पिढी अनेक गोष्टीला मुकली त्यातली पत्रलेखन हे एक. संदेश वहनाचे अनेक नवीन माध्यमे उपलब्ध झाल्याने पत्रलेखन मागे पडले. पोस्ट ऑफिस मधील नागरिकांचा वावर कमी झाला. पत्र घेऊन येणारा पोस्टमन , त्याची आतुरतेने वाट पाहणे हे सारे मागे पडले . आमची पिढी भाग्यवान त्यांना हे सुख मिळाले. माझ्याकडे अजूनही मित्रांना लिहलेली पत्रे मी जपून ठेवली आहेत. ती काढून आजही वाचतांना मन भूतकाळात रमून जाते. आता शेवटचे पत्र कधी आणि कोणास लिहले हे आठवायचे म्हटलं तरी आठवत नाही.
प्रेमपत्रे हि प्रेमजीवांना जोडणारा धागा. प्रेमात अनेकांनी आपल्या भावना पत्रातून मांडल्या आहेत. आजचे प्रेमवीर याला मुकले आहेत. नोकरी लागल्याचे पत्र, कोणाच्या काही घरगुती सभारंभाचे पत्र, कोणी गेल्याचे पत्र अशी अनेक पत्रे वाटचाल करत असत. पोस्टमनशी काही घरांशी जिव्हाळेचे नाते होते. दिवाळीला त्याला काही घरातून फराळाला निमंत्रण दिले जात होते. आता एवढे सारे जलद झाले आहे तो जिव्हाळा, प्रेम कमी झाले आहे. नवीन पिढीतर या पासून कोसो दूर आहे. कधी कधी हे सर्व पाहून फार वाईट वाटते पण करणार काय काळासोबत राहणे क्रमप्राप्त आहे.

Comments
Post a Comment