"उपेक्षित उर्मिला"
रामायणात राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांना जेवढा मान-सन्मान, गौरव त्यांच्यावर लिखाण, मालिका, चित्रपट जेवढे निघाले तो मान लक्ष्मण पत्नी उर्मिलाला मिळाला नाही असे मला वाटते. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान हे चरित्र गौरवास्पद आहेत हे मान्यच त्यात कोणताही वाद असायचे काहीही कारण नाही फक्त उर्मिला हि जरा या मान - सन्मानापासून थोडी उपेक्षितच राहिली असेच म्हणावे लागेल. रामायणातील खलपुरुष रावणाची देखील आठवण काढली जाते पण त्यागमूर्ती उर्मिला कित्येक जणांना माहीतही नाही.
लक्ष्मण पत्नी उर्मिलेचा खूप मोठा त्याग आहे. राजा दशरथाच्या दिलेल्या वचनाला अनुसरून राम जेव्हा वनवासाला निघतात तेव्हा लक्ष्मण देखील रामा सोबत वनवासाला निघतो. जेथे राम तेथे सीता म्हणून सीता देखील रामासोबत वनवास स्वीकारते. राम, सीता, लक्ष्मण वनवासाला जातात. हा काळ थोडा नसून तब्बल चौदा वर्षाचा . सीतेसोबत तिचा पती राम तरी होता . वनवासातील दुःख, त्रास, कष्ट सोसण्यासाठी ते दोघे एकमेकांच्या सोबत तरी होते पण इकडे अयोध्येत लक्ष्मणाशिवाय म्हणजेच आपल्या पतीशिवाय चौदा वर्ष ऊर्मिलेने काढली. केवढा मोठा त्याग.
रामासोबत सावलीसारखा राहणारा लक्ष्मण रामासोबत वनवासास जायला निघतो तेव्हा त्याने आपली पत्नी आपल्या माघारी कशी राहील याचा विचार केला नसेल ? उर्मिलाने देखील लक्ष्मणासोबत वनवासाला जाण्याचा हट्ट केला नसेल? लक्ष्मणाचे हे बोल ऐकून उर्मिला अयोध्येत राहते ' वनवासात मला रामाची व सीतेची सेवा करतांना तू जर सोबत असेल तर त्या सेवेपासून मी विचलित होऊ शकतो, तेव्हा तू माझ्या सोबत न येता अयोध्येत राहून तू माझ्या वृद्ध माता पित्याची सेवा कर ' . आपल्या पत्नीचा चौदा वर्ष विरह सहन करावयाचा येथे लक्ष्मणाचा देखील तेवढाच मोठा त्याग आहे. पण कमी कमी त्याचा प्रिय असा राम तरी वनवासात त्याच्या सोबत होता पण उर्मिलेला अयोध्येत वनवासी जीवनच व्यथित करावे लागले. राम, सीता, लक्ष्मण वनवासात असतांना त्यांच्या माघारी कौसल्या, कैकयी, सुमित्रा या आपल्या वयोवृद्ध सासवा आणि वृद्ध सासरा राजा दशरथ यांची सेवा करण्यातच उर्मिलेचा हा काळ गेला. आपल्या पतीशिवाय चौदा वर्ष सेवा करत राहणे हे खरंच अलौकिक कार्य आहे. उर्मिलेल्या या त्यागाला, सेवेला वंदन. हे काम फक्त लक्ष्मण पत्नी उर्मिलाच करू शकते.
(महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment