"स्मार्ट सोलापूरसाठी नगरसेवक कसा असावा"
देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी करण्याची सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या शहरामध्ये 'सोलापूर' चा समावेश व्हावा ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे . यामूळे सोलापूरचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. सोलापूरचा ' स्मार्ट सिटी' मध्ये समावेश व्हावा यासाठी महापालिका आयुक्त , महापौर व अधिकारी वर्ग यांनी अतीशय परिश्रम घेतले आहेत . सोलापूरची ' स्मार्ट सिटी' साठी तर निवड झाली तरी प्रत्यक्ष ती ' स्मार्ट सिटी' होण्यासाठी या योजनेवर काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे व या कामी नगरसेवकांनी देखील आपले योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे. नागरीकांच्या सहकार्याशिवाय ' स्मार्ट सिटी' चे स्वप्न हे साकार होवू शकणार नाही.
महानरपालिकेत नगरसेवक हा त्या त्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत असतो. महानगरपालिका व नागरीक यातील तो एक दुवा आहे. नगरसेवकाचे घटनेने अनेक अधिकार, जबाबदाऱ्या व कामे ठरवून दिलेली आहेत. घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपण ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो त्याच्या जबाबदाऱ्या व कामे तो चांगल्या रितीने पार पाडू शकतो.
सोलापूरला ' स्मार्ट सिटी' बनविणे यात महानगरपालिकेची महत्वाची भूमिका आहे पर्यायाने नगरसेवकांची देखील जबाबदारी वाढली आहे. तो कसा असावा हे पुढील बाबींवरून आपल्याला सांगता येईल.
१. नगरसेवक हा सुशिक्षित असणे अत्यंत गरजेचे तर आहेच , तसेच तो आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असणारा तरुण असावा.
२. त्यास त्याचे अधिकार, जबाबदाऱ्या व त्याची कामे याची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
३. तो ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो त्या प्रभागातील समस्या काय आहेत तसेच प्रलंबीत प्रश्न कोणते आहेत याची त्यास जाण असावी तसेच ' स्मार्ट सिटी' बनण्यात त्याची भूमिका काय आहे याची त्यास कल्पना असावी.
४. तो कोणत्याही जातीय संघटनेशी संबंधित नसावा व त्याने प्रभागात जातीय सलोखा राखावा.
५. त्याचे चारित्र्य स्वच्छ असावे व तो व्यसनी नसावा.
६. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी.
७. तो विनयशील व सुसंस्कृत असावा.
८. त्याने महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या आर्थिक निधीचा प्रभागाच्या विकासासाठी खर्च करावा व जास्तीत जास्त निधी आपल्या प्रभागासाठी खेचून आणण्याचा त्याने प्रयत्न करावा.
९. प्रभागातील महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर बगीचा , समाजमंदिर, व्यायामशाळा, सांस्कृतिक-सभागृह , वाचनालय इ. ची त्याने उभारणी करावी.
१०. प्रभागात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील यासाठी त्याने प्रयत्न करावेत व ती बिघडल्यास संबंधित यंत्रणेला सहकार्य करावे.
११. प्रभागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी योजना त्याने प्रभावीपणे राबवाव्यात.
१२. प्रभागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ राहील यासाठी त्याने प्रयत्न करावेत व त्यासाठीच्या महानगरपालिकेच्या काही योजना असतील तर त्याची अंमलबजावणी करावी.
१३. सामाजिक कार्याची त्यास आवड व तळमळ असावी तसेच प्रभागात सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन घडवून आणावे व नागरीकांना त्यासाठी प्रोत्साहीत करावे.
१४. तो कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व करत असेल पण एकदा निवडून आल्यानंतर पक्षभेद विसरून त्याने सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करावी.
१५. त्याने दररोज किमान काही वेळ नागरीकांना द्यावा.
१६. त्याने स्वतः प्रभागातील नागरीकांशी सतत संपर्क साधावा व त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
१७. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उदा. फेसबुक , व्हाट्सअँप , ऍप , ई-मेल , वेबसाईट यांचा वापर करून नागरीकांचे प्रश्न जाणून घेवून ते सोडवावेत.
१८. तो भ्रष्टाचारी नसावा व भ्रष्टाचारास त्याने प्रोत्साहन देऊ नये.
१९. प्रभागात अत्याधुनिक सुविधा जसे की सोलर लाईट, एल. ई. डी. बल्ब , बायोमेट्रीक कचरा पेटी , सी. सी. टी. व्ही . कॅमेरे इत्यादीचा लाभ नागरीकांना देण्याचा त्याने प्रयत्न करावा व नवनवीन आधुनिक सुविधा पुरविण्याचा त्याने पाठपुरावा करावा.
२०. तो प्रभागाच्या विकासासाठी सदैव झपाटलेला असावा.
२१. त्याचा प्रभाग प्रदूषणमुक्त राहील यासाठी तो प्रयत्नशील असावा व त्यासाठी घनकचरा, सांडपाणी यांचे योग्य ते व्यवस्थापन करावे. तसेच मुबलक वृक्षांची लागवड विविध दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाच्या माध्यमातून करावी.
२२. त्याने प्रभागासाठी महानगरपालिकेची बससेवा नसेल तर ती पुरवावी व असेल तर त्याचे योग्य असे व्यवस्थापन करावे.
२३. प्रभागातील रस्ते, पाणी, दिवाबत्ती, शैक्षणिक सुविधा याची सोय करावी व त्याचे योग्य असे व्यवस्थापन करावे.
२४. प्रभागातील नागरीकांच्या सुख - दुःखात त्याने सहभाग दर्शवावा.
२५. प्रभागातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्याने प्रयत्न करावेत तसेच त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देवून कर्जाची सोय उपलब्ध करून द्यावी.
२६. प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी त्याने वेगवेगळ्या विषयाच्या तज्ञांच्या कार्यशाळेचे आयोजन करावे. तसेच त्यांना खेळासाठी मैदान व खेळसाहित्य उपलब्ध करून द्यावे.
२७. त्याने महिला बचत गटाची स्थापना करावी व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावे.
२८. प्रभागातील विविध महोत्सव, जयंत्या यात त्याचा सक्रीय सहभाग असावा.
२९. त्याने प्रभागासोबत शहराच्या विकासात आपली निर्णायक भूमिका वठवावी.
शेवटी असेच म्हणावे लागेल स्मार्ट सोलापूरचा नगरसेवक स्मार्टच असावा व त्यासाठी नागरीकांनीदेखील जेव्हा निवडणुका होतील तेव्हा स्मार्टपणे मतदान करावे.

Comments
Post a Comment