"पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज"



आपला समाज हा उत्सवप्रिय समाज आहे तो वर्षभर अनेक उत्सव साजरे करीत  असतो. रूढी परंपरेने उत्सव साजरे करणे हा त्याचा जगण्याचा अविभाज्य भाग आहे उत्सव त्यास नवीन ऊर्जा, उत्साह देण्याचे काम करीत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा देणे, आप्त, नातेवाईक, मित्रांची भेट होणे, नवीन वस्त्र , अलंकार, वस्तु खरेदी करणे, मिठाईची देवाणघेवाण करणे हे उत्सवाने माणसास साध्य करता येते.  म्हणून  प्रत्येक माणूस येणा -या उत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतो. अनेक धर्माचे लोक वर्षभरात  अनेक उत्सव साजरे करीत असतात. 

उत्सव साजरे करीत असतांना ते पर्यावरणाला मारक तर ठरीत नाहीत ना? याचा विचार करणे आज गरजेचे झालेले आहे. प्रत्येक उत्सवामुळे पर्यावरणाला धोका नसला तरी काही उत्सव साजरे करतांना, पर्यावरणाची हानी  होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे . काही उत्सवामूळे ध्वनी प्रदुषण, वायु प्रदुषण जल प्रदुषण होत आहे हे काळाने सिध्द केलेले आहे  तर काही उत्सवामुळे प्राणीमात्राला आपला जीव गमवावा लागतो हे देखील आपण बघतो. 

सर्वात मोठा उत्सव 'दिवाळी' . . दिवाळी म्हटली की फटाकेहे  समीकरण पक्के झाले आहे. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण तर होतेच त्याचबरोबर फटाक्याच्या धुरामुळे वायू प्रदुषण देखील होते. काही वेळेस फटाक्याच्या आगीमुळे शारिरीक इजा व जिवीत हानी देखील झालेली आपण पाहतो. हे सगळे आपण टाळू  शकतो जर आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला तर. दिवाळी हा दिपोत्सव  आहे . तेव्हा दिवे , पणत्या, लाइटिंग  आकाशकंदील लावून आपण ही साजरी  करू शकतो की ज्यामुळे कोणतेही पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.

नुकताच आपण 'गणेशउत्सव साजरा केला घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्राणप्रतिष्ठा  केली गेली दहा दिवसानंतर आपण त्याचे विसर्जन केले विसर्जनासाठी आपण विहीर तलाव, नदी समुहाचा वापर  करीत असतो जेव्हा आपण गणेशाची मुर्ती विसर्जित करतो. त्यामुर्तीतील वापरण्यात येणा-या घटकामुळे, रसायनामूळे जलप्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होते आपण मूर्तीसोबत हार, निर्माल्य, त्याला सजवण्यासाठी वापरलेल्या लहान लहान वस्तू  हे देखील विसर्जित करतो  त्यामुळे देखील जलप्रदुषण होते.  प्रदुषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांच्या जीविताला  देखील धोका पोहोचू शकतो यामुळे पर्यावरणपूरक गणपती बसविणे व त्याचे  घरीच विसर्जन करणे हे गरजेचे झाले आहे


कोणत्याही धर्माच्या उत्सवाच्या काढण्यात येणा-या मिरवणूकीतील डॉल्बीचा वापर हा काळजीचा विषय झालेला आहे . डॉल्बीच्या आवाजामुळे मोठया प्रमाणात ध्वनीप्रदुषण होते त्यामुळे कानाला इजा होणे, हृदयाचा  गंभीर आजार असणा-या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो तसेच कोणत्याही रुग्णांना याचा त्रास होवू शकतो, त्यामूळे डॉल्बीमुक्त उत्सव ही काळाची गरज आहे. यासाठी पर्यायी म्हणून आपण लेझीम , ढोल, टिपऱ्या , याचा वापर करू शकतो . तसेच उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात लावण्यात येणाऱ्या लाउडस्पीकर मुळे देखील ध्वनी प्रदूषण होते जेकी टाळणे गरजेचे आहे. त्या ऐवजी समाजप्रबोधन, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम व तसेच खेळ घेतले तर उत्सवाचा आनंदही वाढेल व कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. 

'होळी' हा उत्सव देखील पर्यावरणाला मारक ठरू शकतो जर त्यासाठी झाडे तोडून लाकडाचा वापर केला गेला असेल तर . काही ठिकाणी आपण  घडतांना पाहतो जे की चुकीचे आहे . झाडे हा एक पर्यावरणाचा अतंत्य महत्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रकारे तास नुकसान पोहचवणे म्हणजे पर्यावरणाची हानी करणे होय. ' होळी' म्हणजे खरं तर दुर्गुणांची होळी करणे होय. आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करणे होय. वाईट प्रथांना तिलांजली देणे होय. या प्रकारे जर आपण 'होळी' साजरी केली तर नक्कीच ती पर्यावरणाला पुरक ठरू शकते. 

'रंगपंचमी' मध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा वापर केला जातो की ज्यामुळे पाण्याची नासाडी होते. पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याची अशी नासाडी करणे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे पाण्याशिवाय 'रंगपंचमी' साजरी करणे व त्यासाठी कोरडया रंगाचा वापर करणे जे कोणत्याही रसायनापासून तयार केलेले नाहीत. हे गरजेचे झालेले आहे. 

'दसरा' या उत्सवामध्ये काही ठिकाणी देवीसमोर प्राण्यांचा बळी दिला जातो. हे अघोरी व पर्यावरणाला घातक आहे. प्रत्येक प्राणी हा पर्यावरणसाखळीतील एक घटक आहे. प्राणीमात्रातील कोणताही प्राणी नष्ट होणे म्हणजेच त्यावर अवलंबून असलेल्या जीवाच्या आस्तित्वाला धोका निर्माण होणे होय. जे की पर्यावरणाला मारक आहे. 

मुस्लीम बांधव ' बकरी ईद' ला मोठ्या प्रमाणात बकरी नष्ट करतात. हे करणे देखील चुकीचे आहे.प्रतीकात्मक लाकडी किंवा इतर वस्तू पासून तयार केलेल्या बकरीचा बळी देता येईल का ? याचा विचार या समाजाने करणे गरजेचे झाले आहे. 

काही उत्सवामध्ये प्राण्यांना पळवले जाते . त्यांची शर्यत लावली जाते. त्यासाठी त्यांना छळले व डिवचले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. आपण आपल्या आनंदासाठी इतरांचा छळ कसा करू शकतो ? प्राणी जरी असले तरी त्यांना देखील जीव आहे याचा विचार माणसाने करणे गरजेचे आहे. 

प्रत्येक उत्सवामध्ये आपण देवाची आराधना आपण करत असतो. शेवटी देव म्हणजे तरी काय ? आपल्या अवतीभवती असलेला निसर्ग म्हणजेच पर्यावरण होय. त्याला इजा पोहोचवणे म्हणजेच नकळत देवाला इजा पोहचवणे . असे करून आपण उत्सवामागचा उद्देश साध्य करू शकतो का ? कदापी नाही. तसेच कोणत्याही धर्मातील देव हा त्यानेच निर्माण केलेल्या जीवाचा बळी कसा मागेल ? याचा विचार गांभीर्याने करणे निकडीचे बनले आहे . पर्यावरणाची हानी करून आपण आनंदी , सुखी होवू शकणार नाहीत. प्रदुषणमुक्त जल, हवा, ध्वनी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. असे जर केले नाही तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. ओझोनचा थर कमी होणे , कमी पाऊस पडणे, स्वच्छ हवेचा अभाव व त्यामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागणे , दुषीत पाण्यामुळे होणारे रोग , ध्वनी प्रदुषणामुळे होणारी चीडचीड हे काही धोके आपणास आज जाणवत आहेत. याचे एकमेव कारण आहे की आपण उत्सवाच्या उन्मादात पर्यावरणाचा विचार करत नाही आहोत. 

वरील धोके जर टाळावयाचे असतील तर भावी पिढीला प्रदुषणमुक्त पर्यावरण द्यावयाचे असेल तर पर्यावरणपूरक उत्सवाशिवाय पर्याय नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे . काही संस्थांनी या कामी पुढाकार घेतलेला आहे. त्यांचे हात समाजाने बळकट करणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी याकामी समाजाला जागरूक करणे निकडीचे आहे. याकामी शासनाने, न्यायपालीकेने , समाजसेवी संस्थांनी व त्या त्या धर्मातील धर्म पंडीतांनी खोटा धर्माभिमान सोडून पुढाकार घेणे गरजेचे आहे. माध्यमांनी आपल्या माध्यमातून या कामी समाज जागृती करणे योग्य ठरू शकेल. उत्सव साजरा करत असतांना काही जुन्या रूढी , परंपरा ज्या की पर्यावरणाला मारक आहेत त्याला फाटा देवून नवीन विज्ञानदृष्टी अंगीकारून उत्सव साजरा करणे ही आजच्या काळाची गरज आहे. 

शेवटी एवढेच म्हणावे लागेल '  पर्यावरणपूरक उत्सव  साजरा करूया उत्सवातील आनंद वाढवूया ' असे केले तरच निसर्गाची कृपादृष्टी आपल्यावर राहील व समाज सुखी, समृद्ध होवून उत्सव साजरा करण्यामागचा माणसाचा उद्देश सफल होवू शकेल. 


Comments

Popular posts from this blog