" या ऊर्जेचे करायचे काय ?" 

छावा चित्रपट आज सर्वत्र गाजतोय. कधी नव्हे ते चित्रपटगृह परत  एकदा प्रेक्षकांनी तुडूंब भरलेली  आहेत. त्याला कारण ही तसेच आहे या चित्रपटात असलेली सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राची कहाणी म्हणजेच शुरवीर छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी , त्यांच्या बलिदानाची कहाणी. विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका नुसती केली नाही तर भूमिका जगणे म्हणजे काय हे त्याच्या अभिनयातून त्याने दाखवून दिले आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना जबरदस्तच. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर ज्यांनी एवढा उत्कृष्ट चित्रपट बनविला ते  अभिनंदनास पात्र आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे निर्माण केलेले स्वराज्य जिथे सर्व जाती धर्माची माणसे सुखाने, आनंदाने राहू शकतील . स्त्रियांचा सन्मान केला जाईल. जाती-धर्माला कोणतीही हानी पोहोचणार नाही . त्यांचाच वसा घेतलेला त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची धुरा मोठया हिंमतीने गनिमाशी मूख्यत्वे औरंगजेबाची दोन हात करत सांभाळत असतात. दुर्दैवाने फितुरीमुळे त्यांना कैद होते. आणि शेवटी देशासाठी , स्वराज्यासाठी , धर्मासाठी अत्यंत्य  हालअपेष्टा , छळ सोसत वीरतेचे प्रतीक होत ते आपल्या प्राणाची आहुती देतात . केवढा मोठा हा त्याग , केवढे मोठे हे शौर्य. शेवटचा प्रसंग पाहतांना प्रेक्षक भावनाशील होतात. 

हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम , स्वराज्याप्रती असलेली त्यांची निष्ठा , त्यांचे बलिदान यातुन एक नवीन ऊर्जा निर्माण करतो . पण या ऊर्जेचे नेमके करायचे काय ? काय आपण फक्त चित्रपट पाहण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवणार आहोत ?  छत्रपती शिवाजी महाराज,  छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य मोठया कष्टातून त्यागातून निर्माण केलेले आहे याची जाणीव आपण पावलोपावली ठेवणे आवश्यक आहे. 

सुमारे दीडशे वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता. इंग्रजांच्या जुलुमी राजवटीला येथील जनता पुरती विटली होती. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घराची, आपल्या प्राणांची राखरांगोळी केली . त्यांच्या त्यागातून आज हे सुंदर स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत याची जाणीव सदैव ठेवणे आवश्यक आहे. कोणती प्रेरणा असेल यांच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या  त्यागात नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप  आणि बाकीचे ऐतहासिक महापुरुष. ऐन तारुण्यात हसत हसत स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारे भगतसिंग , राजगुरू , सुखदेव यांच्या मागे कोणती प्रेरणा असेल ? कोणत्या प्रेरणेतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी केली असेल. काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना सावकरांना कोण प्रेरित करत असेल. असे अनेक जण आहेत  ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले फक्त आणि फक्त देशासाठी , देशाला इंग्रज राजवटीतून मुक्त करण्यासाठी. फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी यांना आठवून भागणार नाही . सतत जाणीव ठेवावी लागेल हा देश असाच घडला नाही. 

आज आपण स्वतंत्र्य आहोत. लोकशाही मानणारा देश म्हणून जगात आपल्याला मान आहे. अनेक क्षेत्रात जगात आपण नाव कमावले आहे. पण हे सर्व नक्कीच एकदम झालेले नाही . यासाठी अनेक जण अक्षरशः खपले आहेत . या सर्वात आपली भूमिका नेमकी काय ? हे समजून घेणे गरजेचे आहे. नागरिक म्हणून आपण आपले हक्क तर मोठ्या दिमाखात मागतो मग कर्तव्याचे काय ? त्या बाबतीत आपण एवढे निरुत्साही का ? महापुरुषांच्या जयंत्या , पुण्यतीथ्या , मिरवणुका एवढ्या पुरते आपण स्वतःला बांधून घेतले आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श आचरणात आणण्यास आपण कुठेतरी कमी पडत आहोत असे खेदाने म्हणावे लागेल. 

आजही सार्वजनिक स्वच्छते बाबत आपण कमी पडत आहोत . सार्वजनिक शिस्त पाळण्याबाबतीत आपण उदासीन आहोत. कितीही प्रयन्त केले तरी मतदान जे की आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याची टक्केवारी वाढत नाही. पाश्चात संस्कृतीचा अनुसरण करत आपल्या संस्कृतीचा ऱ्हास आपण आज उघड्या डोळ्याने पहात आहोत. अभिव्यक्ती  स्वातंत्र्याखाली आम्हाला कसे व्यक्त व्हावे याचे तारतम्य राहिले नाही. जाती-धर्मातील दरी वाढविण्यात आम्ही स्वतःला धन्य मानत आहोत. सरकारी नियम कसे धाब्यावर बसवता येतील यांच्याकडे आमचा जास्तीचा कल असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला आम्ही ओरबाडत आहोत. भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालण्यास आम्हाला काहीही वाटत नाही. मी आणि माझे कुटूंब आणि त्यांचे सुख  अशी  चौकट आम्ही घातलेली आहे. शिव्या देत स्त्रियांचा अनादर आम्ही  पावलोपावली करत आहोत. 

हे सर्व जर टाळायचे असेल तर आपल्या हक्कासोबत आपली कर्तव्ये आम्हाला काटेकोरपणे बजवावी लागतील. चित्रपटातून मिळालेली ऊर्जा देशाच्या , समाजाच्या विधायक कामासाठी खर्च करावी लागेल. ओतप्रोत देशप्रेमाने भरलेले नागरीक आम्हाला बनावे लागेल. देश आमच्यासाठी काय करतोय यापेक्षा आम्ही देशासाठी काय करू शकतो हे पहावे लागेल. सरकार सर्वकाही करेल असे म्हणून चालणार नाही. देशासमोर , समाजासमोर असलेल्या समस्या आपण सोडवू शकतो का याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेली जबाबदारी मग ती सरकारी किंवा खाजगी नोकरी असू , व्यवसाय असू काटेकोर पणे बजावली ती देखील मोठी देशसेवा होऊ शकते. 

शांतिप्रय , मजबूत , बळकट साऱ्या जगाला दिशा दाखविणारा  विश्वगुरू भारत बनण्यासाठी आम्हाला चहुबाजूने प्रयन्त करावे लागतील. असा सर्वश्रेष्ठ भारत बनविणे हीच खरी आपल्या लाडक्या छावाला दिलेली आदरांजली असेल .

छत्रपती संभाजी महाराज की जय ! हर हर महादेव ! !  जगदंब जगदंब !!!


( महेश भा. रायखेलकर)
०५. ०३. २०२५




Comments

Popular posts from this blog