"जुन्या आठवणींना उजाळा "
उस्मानाबादला भाच्याच्या लग्नसोहळा निमित्त गेलो असता मी ज्या शाळेत ५ वी ते १० शिकलो ती जिल्हा परिषदच्या शाळेला भेट दिली . मी उस्मानाबादला या आधी देखील खूपदा गेलो आहे पण शाळेला भेट देण्याचा कधी योग आला नव्हता . या शाळेत मी पाच वर्ष शिकलो . त्याच शाळेला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्या वर्ग खोलीत ११ वी व १२ वी चे शिक्षण घेतले त्या वर्गखोलीत परत एकदा बसलो. शाळेत असतांना शाळेच्या मैदानावर शाळा सुटल्यानंतर रंगलेला खो खो चा खेळ असो , याच मैदानावर केलेली एन. सी . सी . ची परेड असेल , कॉलेजला असतांना याच मैदानावर मित्रांसोबत मारलेला गप्पा असतील. सारे काही एका क्षणात नजरेसमोर आले . याच वेळी उस्मानाबादमधील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मी बीकॉम प्रथभ वर्षाचे शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाला भेट दिली. महाविद्यालयाचे सायकल स्टॅन्ड ज्यात मी सायकल लावत होतो त्यास निरखून पाहिले. स्टेज जिथे महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन होत असे तेही नजरेखालून घातले . या सर्व ठिकाणी मी शाळा व महाविद्यालय सोडल्यानंतर प्रथमच गेलो. दोन्ही ठिकाणच्या मुख्याध्यापक व प्राचार्याना भेटलो . अनेक आठवणी ताज्या झाल्या. गुरुजनाच्या , सहकारी मित्रांच्या आठवणी , व ज्या परिसरात अनेक वर्ष घालवली तो परिसर पुन्हा एकदा पाहून मन भरून आले. हि भेट सहकुटूंब होती. सौ व मुलास हे सर्व दाखवतांना मन भूतकाळात हरवून गेले. फेसबुक मुळे त्या काळातील काही सहकारी मित्र आताही संपर्कात आहेत. एकदा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी स्नेहसंमेलन करण्याचा विचार आहे. बघू कधी योग येतो ते. आतातर माझ्याच पुढाकाराने शाळेतील व महाविद्यालयातील मित्रांचा व्हाट्सअँप ग्रुप देखील आम्ही बनवला आहे . काही जणांनी आपले फोटो त्यावर टाकल्यानंतर त्यांची ओळख पटणे देखील कठीण होत आहे एवढा बदल त्यांच्या चेहरेपट्टीमधे झाला आहे . साहजिकच आहे ३०-३५ वर्षाचा काळ मध्ये घडून गेला .
यातील काही मित्र जसे कि दीपेंद्र कुलकर्णी याची मी औरंगाबादला गेल्या नंतर भेट घेतली. तब्बल २५ ते ३० वर्षांनी आम्ही भेटत होतो . त्याला भेटून खूप आनंद झाला. तसेच माझा दुसरा मित्र गोडसे मला माझ्या ऑफिसला येऊन भेटला . त्याच्यात देखील खूप बदल झाला आहे . त्याला पाहूनही मला खूप आनंद झाला. सोशल मीडियाचा हा फायदा आहे कि जुने मित्र देखील संपर्कात येऊ शकतात. नाहीतर २५ ते ३० वर्षांनी मित्रांची भेट होणे केवळ अशक्य आहे. फक्त एक मित्र गिरीश कुलकर्णी अजून भेटत नाही. त्याला मी फेसबुकवर फार शोधले पण सापडला नाही. त्याला भेटण्याची एक ओढ आहे. मला खात्री आहे एक ना एक दिवस तो भेटेलच.
या सर्वांना घेऊन उस्मानाबाद येथे स्नेहमेळावा घेण्याचा मानस आहे. हा योग कधी येतो ते कोणास ठाऊक. याकामी उस्मानाबादला असलेल्या मित्रांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. आम्हाला शिकवणारे शिक्षक यांना देखील यावेळी बोलावता येईल. हा एक सुंदर मेळावा होईल. कधी होईल ते माहित नाही. मला वाटते मलाच या कामी पुढाकार घ्यावा लागेल . बघूया काय होते ते. आतातरी एका ग्रुप द्वारे एकमेकांच्या संपर्कात आहोत हेही नसे थोडके.

Comments
Post a Comment