नात्याचे बॅलन्सशीट

 बॅलन्सशीट ज्यास आपण मराठीत ताळेबंद असे म्हणतो हे व्यवसायाचे एक महत्वाचे दस्तऐवज असते . व्यवसायाची आर्थिक स्थिती दाखविणारा तो एक  पुरावा असतो . याच्या दोन बाजू , संपत्ती व देयता. संपत्ती जास्त व देयता कमी दर्शविणारे व्यवसायाचे  बॅलन्सशीट हे त्या व्यवसायाची आर्थिक  स्थिती  भक्कम असल्याचे दर्शवित असते . याउलट जर स्थिती  असेल तर व्यवसायाची आर्थिक स्थिती हि नाजूक आहे हे लक्षात येते.  अगदी बिकट परिस्थिती मध्ये तो व्यवसाय दिवाळखोरी मध्ये निघतो. नोकरदारां सोबत सर्वांना  देखील बॅलन्सशीट हे परिचित आहे.   मानवी नात्याचे देखील तसेच आहे. आपण कधी आपल्या नात्यातील बॅलन्सशीट पडताळले आहे का? जसा एक व्यावसायिक आपल्या बॅलन्सशीट मजबूत कसे होईल याबाबतीत सजग असतो तसे आपण नात्याचे बॅलन्सशीट मजबूत होईल सुदृढ होईल याबाबतीत  सजग असतो का? त्याची काळजी घेतो का? याचा विचार करणे गरजेचे आहे.

कोणत्याही दोन व्यक्तीच्या नात्यामध्ये असे  बॅलन्सशीट तयार होत असते. त्यातील संपत्ती किंवा जमा बाजू म्हणजे त्या दोन व्यक्ती मधील घडलेले चांगले प्रसंग . एकमेकांच्या सुख दुःखात दिलेली साथ. संकटामध्ये दिलेले पाठबळ. यश मिळविण्यासाठी दिलेले प्रोत्साहन.  यशस्वी झाल्यानंतर केलेले कौतुक. विशेष दिवशी दिलेल्या शुभेच्छा जसे कि वाढदिवस, लग्नदिवस, काही जीवनात साध्य केले असेल तर तो  दिवस . याची विरुद्ध  बाजू म्हणजे वजा किंवा देयता बाजू ज्यात नात्यात नसलेला संवाद, कुचेष्टा, कुरघोडी, इर्षा, आत्मप्रौढी, दुस-याला कमी लेखणे, मतलबीपणा असे वागणे येवू शकते. दुस-याच्या बाबतीत आपल्या बॅलन्सशीट  मध्ये जमा बाजू किती आहे संपत्ती किती आहे यावरून नाते हे भक्कम आहे का तोट्यात  चालले आहे हे लक्षात येते.
कोणत्याही दुस-या  व्यक्ती चे आपल्या बाबतीत वागणे हे या बॅलन्सशीट वरूनच ठरत असते. जमा बाजू किती झाली आहे?  व वजा किती झाली? . त्याची प्रतिक्रिया हि आपल्या  आधीच्या क्रियेचा परिणाम असते. तुमची बाजू जमे मध्ये असेल तर तोही जमाच करेल. आणि वजा मध्ये असेल तर वजा. आणि जास्त वजा असतील तर नाते हे दिवाळखोरीत निघाल्याशिवाय राहणार नाही.  नात्यातील संपत्ती बाजू वाढविणे व देयता कमी करणे किंवा होऊच न देणे हे नाते बळकट होण्याच्या  व  टिकण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. हे वर्षानु वर्षे चालत जाणारी क्रिया आहे.
हे बॅलन्सशीट सगळ्या नातेसंबंधावर लागू पडते. ते म्हणजे पती - पत्नी असो , दोन भावातील  असो , बहीण भावाचे असो ,  दोन मित्रातील  असो   किंवा कोणतेही इतर नाते असो  .
या  नात्याच्या बॅलन्सशीट च्या संपत्ती मध्ये वाढ होण्यासाठी काही गोष्टी करता येतील.

१. नात्यामध्ये संवाद ठेवा, त्यास योग्य तो वेळ द्या.
२. एकमेकांच्या गुणांचे कौतुक करा.
३. एकमेकांच्या सुख  दुःखात सहभागी व्हा.
५. महत्वाच्या दिवसाच्या आवर्जून शुभेच्छा द्या.
६. एकमेकांना शक्य तेवढी मदत करा.
७. एकमेकांना प्रोत्साहन द्या.
८. एकमेकांच्या मताचा आदर करा.
९. एकमेकांच्या आवडी-निवडी जोपासा.
१०. संकटकाळात एकमेकांना साथ द्या.


नात्याच्या बॅलन्सशीट च्या  देयतेमध्ये या कारणाने वाढ होवू शकते.  ते करणे टाळा
१. संवादाचा अभाव.
२. इर्षा.
२. कुचेष्टा
३. आत्मप्रौढी/ वृथा अभिमान
४. दुस-याला कमी लेखणे.
५. सतत टिका करणे/ चुका काढणे .
६. मतलबीपणा .
७. संकटातील पळपुटेपणा .
८. खोटारडेपणा.
९. राजकारण.


कोणतेही नाते या बॅलन्सशीट च्या पायावरच टिकून राहते. तर अश्या  नात्याच्या बॅलन्सशीटच्या जमे बाजूमध्ये  सतत वाढ करणे व देयता जमा होवूच  न देणे व जर चुकून झालीच तर त्याची संख्या जमे पेक्षा कमी ठेवणे हे कोणत्याही नात्यातील दोन व्यक्ती ची जबाबदारी असते. जर नात्याचे  बॅलन्सशीट  हे नात्यातील कोण्या एका व्यक्ती मुळे दिवाळखोरीत जात असेल तर अशा नात्यावर पडदा टाकणे कधीही शहाणपणाचे ठरते.  कारण कि दिवाळखोरीत गेलेला व्यवसाय कोणालातरी चालवणारे परवडणार आहे का?.  कोणतेही नातं हा व्यवसाय जरी नसला तरी त्याचा प्रवास आनंददायी करणे हे फक्त त्या नात्यातील व्यक्तीच्या व्यवहारावरच अवलंबून असते. सुखाचा, आनंददायी प्रवास कोणाला आवडणार नाही?.  चला तर मग एकदा आपपल्या नात्याचे हे बॅलन्सशीट  पडताळुन पाहुया व ते सुदृढ, भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहूया !!

@ महेश भा. रायखेलकर.

Comments

Popular posts from this blog