मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका
लहान मूल म्हणजे एक कोरी करकरीत पाटी. त्या पाटीवर जसे गिरवाल तसे त्याचे व्यक्तीमत्व घडत जाते, त्याचे आयुष्य बनत जाते. पण या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची?, तर ती त्याच्या पालकाची म्हणजेच आई वडिलांची, त्यानंतर मग त्याचे शिक्षक, मित्र मंडळी व समाजाची. यातील नंतरचे घटक निवडण्यामध्ये व त्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पालक आपली भूमिका चांगल्या रितीने वठवू शकतात. पण पालकाची भूमिका चुकली तर सारेच चित्र बिघडू शकते. लहान मूल विशेषतः आईच्या अगदी जवळ असते त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे आई शिवाय चांगल्या रीतीने कोण करू शकेल? मूल शाळेत जायला लागल्या नंतर मात्र ही जबाबदारी आई-वडील दोघांची बनते. ज्या घरात आजी- आजोबा आहेत त्या घरात मुलाच्या जडणघडणीत त्यांचा देखील वाटा असतो . आजी- आजोबा व आई-वडील यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली वाढलेले मूल नक्कीच योग्य दिशेने मार्गक्रमण करते . येथे एकत्र कुटूंबाचे महत्व अधोरेखित होते. पाळणाघर, डे-केअर, आया , मावश्या, कामवाली यांच्या सहवासात मुलांची जडणघडण योग्य होईलच हे खात्री पूर्वक सांगता येणार नाही. आजच्या काळात आई-वडील दोघानाही नोकरी,व्यवसाय करणे क्रमप्राप्त असले तरी एकत्र कुटूंब टिकवणे, मुलांना त्याच्या आजी-आजोबाच्या छायेत ठेवणे हे तरी पालक निश्चितपणे करू शकतात.
आई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसाय निमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देवू शकतात. त्याच्याशी संवाद साधू शकतात. त्याच्या शाळा, कॉलेज मध्ये सध्या काय चालू आहे? त्याची मित्र मंडळी कोण आहेत? मोबाईल, इंटरनेट वर तो नक्की काय पाहतोय ? त्याच्या वर्तणूकीतील वेळोवेळी होणारे बदल याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. यात मुलावर सतत संशय घेणे, मागे लागणे हा भाग नसला तरी एकदम दुर्लक्ष हे सुध्दा प्रसंगी महागात पडू शकते. तरुण मुलांशी मित्रत्वाचे नाते आई-वडील निर्माण करू शकतात. कोणतीही गॊष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे. मुलाला त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणीही इतर व्यक्ती चांगल्या रीतीने ओळखू शकत नाही, समजू शकत नाही ही ओळख मुलाच्या मनातं देखील आपल्या आई-वडिलाबद्धल असणे अशक्य नाही पण त्या साठी पालकांनी आपली भूमिका चोख बजावणे गरजेचे आहे. मुलांसमोर आई-वडीलांची आदर्श वागणूक असणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या पाल्यासाठी योग्य शाळा, कॉलेज निवडणे, चांगल्या मित्राचे महत्व त्याला सांगणे, समाजातील चांगल्या घटनांचे त्यास साक्षीदार बनविणे व वाईट प्रवृत्ती, घटने पासून त्यास दूर ठेवणे यात पालक म्हणून आपण कशी भूमिका निभावतो यावर या इतर घटकाचा चांगला, वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यामुळे या घटकांची देखील खरी दोर ही पालकांच्याच हातात असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . चांगली शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, समाजातील घटक नक्कीच त्याचे व्यक्तिमत्व फुलविण्यास मदत करतात.
पालक आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटत असतात. त्याच्या भविष्याची गुंतवणूक करीत असतात. या धावपळीत, व्यस्ततेत जी मुख्य गुंतवणूक म्हणजे त्यांची मुले यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होवू शकते. पालक आपली व्यस्ततेची सबब पुढे करतात. पण जी तुमची अनमोल गुंतवणूक आहे ती मुले व्यसनी, परावलंबी, शिक्षणात पिछेहाट झालेली, गुन्हेगार प्रवृत्तीची झालेली आपल्याला परवडणार आहे का? . कोणतीही चुकीची प्रवृत्ती मुलांमध्ये एका दिवसामध्ये निर्माण होत नाही ती काही दिवसांची प्रक्रिया असते. त्यावर वेळीच लक्ष ठेवणे, त्याला अटकाव घालणे वेळप्रसंगी थोडे कठोर होणे हे पालक म्हणून आपली जबाबदारी नाही का? इतर शाळा, कॉलेज, शिक्षक, मित्रमंडळी, समाज या घटकांना आपण कसा दोष देवू शकतो ? जरी या घटकाला जबाबदार धरले तरी झालेले नुकसान कोणाचे आहे? ते भरण्याची जबाबदारी हे घटक घेवू शकतात का?
मुलांना प्रोत्साहन देणे, अपयशामध्ये खंबीर पणे त्याच्या पाठीशी राहणे, खेळ, साहित्य, कला याच्या मध्ये त्याचा रस निर्माण करणे. विविध स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग करून घेणे . आपल्या संस्कृतीची, परंपरेची त्यास नीटशी ओळख करू देणे या सर्व कामी पालक म्हणून आपण सक्रीय असणे गरजेचे आहे. एखाद्यावेळेस मुले चुकली तर त्यास योग्य त्या वाटेवर आणणे, त्याच त्याच चुकांपासून त्यास परावृत्त करणे, आपल्या जीवनातील चागल्या वाईट अनुभवाचे सार त्यास देणे हे पालकाशिवाय दुसरे चागल्या रितीने कोण करू शकेल?
कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटूंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते. त्याचे योग्य ते पालपोषण करणे, या भविष्याची निगा राखणे, त्याचे एका चांगल्या व्यक्तीत रूपांतर करणे यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. इतिहासातील महापुरूषांच्या जीवनावरून या गोष्टीला बळकटी प्राप्त होते. आपल्या व्यस्ततेला, धावपळीला, भविष्यातील गुतवणुकीला, करीअरला थोडासा लगाम घालून पालकांनी आपली भूमिका काटेकोरपणे बजावली तर मुलांचे भविष्य नक्कीच उज्वल बनेल यात कोणतीही शंका नाही.
© महेश भा. रायखेलकर.

Comments
Post a Comment