संघ शताब्दी वर्षानिमित्त लिहलेला लेख 
"माझा संघ प्रवास" 

लहानपणी एकदा मोठ्या भावासोबत उस्मानाबाद सध्याचे धाराशिव येथे  शाखेत आणि  त्याच शहरात कॉलेज मध्ये असतांना वर्ग मित्रा सोबत अ.भा.वि.प. च्या एका बैठकीला गेलो असल्याचे आठवतंय. तेवढाच काय तो तेव्हा माझा संघाचा किंवा संघ परिवाराशी संबंध . खरा संघाचा मी जोडला गेलो ते सोलापूरला वडिलांची बदली झाल्यानंतर. वडील हे त्यावेळी पी. एस. आय. म्हणून लातूर येथे कार्यरत होते. त्यांना ए. पी. आय. चे प्रमोशन मिळाले आणि त्यांची सोलापूरला बदली झाली. १९९४-९५ तो काळ असेल. सोलापूरला राहण्यासाठी आम्हाला केशवनगर येथील पोलीस वसाहतीत ऑफिसरचे निवासस्थान मिळाले होते. संगणकाचे वारे त्यावेळीस चांगलेच वाहत होते. आपणही संगणकाचा एखादा अभ्यासक्रम करावा या दृष्टीने मी लष्कर मधील न्यू-एज कॉम्प्युटर येथे सी. सी. सी. ओ . या तेव्हा प्रचलीत अशा सरकारमान्य कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेतला. तेथेच माझी माझ्या सोबत हाच कोर्स करत असलेल्या प्रदीपसिंग राजपूत यांची ओळख व नंतर मैत्री झाली. त्यांनी मला एके दिवशी शाखेवर नेले ज्या शाखेवर ते मुख्य शिक्षक म्हणून कार्यरत होते ,  जी शाखा आमच्या घराच्या अगदी समोरच्या मैदानावरच लागत होती. सध्या तिथे पोलीस कमिशनर ऑफिस झाले आहे. ही माझी पहिली शाखा 'शिवाजी शाखा.' शाखा संपताना म्हटली जाणारी प्रार्थना माझ्या मनावर खूप परिणाम करून गेली. शाखेत विविध सामूहिकरित्या खेळली जाणारी खेळ खेळतांना मजा यायची . आजही ती मजा आम्ही शाखेवर लुटतो. अशाप्रकारे स्वयंसेवक म्हणून मी संघाची जोडला गेलो. नियमीत शाखेवर जाऊ लागलो. 

याच शाखेवर महादेव शिंदे  , शैलेश मारा, अंबादास कन्नूर, योगेश गुरव , रामू बोगा , विनोद कोल्हापुरे , पंकज अभ्यंकर  यांची ओळख व मैत्री झाली. वर्षभर होणाऱ्या संघाच्या विविध उत्सवात माझा सहभाग असे. याच वेळेस आमच्या पेक्षा जेष्ठ स्वयंसेवक व संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे मिलींद फडके, अशोक संकलेचा, किरण सुतार, रमेश कुलकर्णी , सुनील भराडकर  यांची ओळख झाली व पुढे चांगला स्नेह निर्माण झाला. याच भागात ज्याला संघदृष्टया शिवाजी नगर म्हटले जाते तेथे आदर्श नगर मधील श्रीराम शाखेवरील स्वयंसेवक सुधांशु रानडे, श्रीवत्स कुलकर्णी, मुकूंद देवस्थळी, लक्ष्मीकांत गवई यांची ओळख झाली. कारण हे सर्व शाखा एकत्रीकरण ( सांघिक ) साठी आमच्या शाखेवर यायची किंवा आम्ही त्यांच्या शाखेवर जायचो. सर्व आम्ही समवयस्क आणि संघाच्या निगडित असल्याने आमच्या सर्वामध्ये चांगला स्नेहभाव निर्माण झाला जो आजही टिकून आहे. संघाने भरविलेल्या अनेक शिबिरात माझा सहभाग होता. 

शिवाजी शाखेचा गंगाजळी प्रमुख म्हणूनही काही काळ मी जबाबदारी सांभाळली. संघ उत्सवांपैकी माझा सर्वात आवडता उत्सव म्हणजे विजयादशमी व त्यानिमित्त निघणारे संचलन . आता जरी ते नगर स्तरावर निघत  आहे पण तेव्हा ते शहर स्तरावर निघायचे. शिस्तबद्ध संचलन आणि त्यावर होणारी नागरिकांची पुष्पवृष्टी एक्दम वेगळा अनुभव देऊन जातो. याच काळात औरंगाबाद ( सध्याचे छत्रपती संभाजीनगर) येथून निघालेले संघाचे भव्य संचलन यातही माझा सहभाग होता. संघाच्या विविध उत्सवात विविध वक्त्यांची होणारे बौद्धिक कायम प्रेरणा देणारे. 

संघ शाखेवर, शिबिरात , उत्सवात  म्हटली जाणारी विविध पद्दे राष्ट्रीय भावना जागृत करतात. सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले,  हम करे राष्ट्र आराधन, संगठन गडे चलो , शुद्ध सात्विक प्रेमही कार्य का आधार है अशी अनेक पद्दे आम्ही गायली आहेत आणि गातो त्यातुन मनाला एक चैतन्य मिळते. मागच्याच वर्षी झालेल्या अयोध्या येथील बांधलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा प्रसारणाचा जुळे सोलापुरात झालेल्या भव्य कार्यक्रमात मी गायलेले रामावरील संघ पद्य ' महामंत्र हा नवं विजयाचा ' हे मनाला खूप भावून गेले. 

प्रचारक हा संघाचा मानबिंदू. याच काळात आम्हाला लाभलेले अनिल बर्वे हे प्रचारक यांच्याशी असलेला स्नेहभाव आजही कायम आहे. अनेक प्रचारक त्यांच्या संघ प्रवासा निमित्त घरी येऊन गेलेले आहेत.  संघकार्य करत असतांना अनिल वळसंगकर, निलेश भंडारी,प्रशांत बडवे, राजेंद्र काटवे. मदन मोरे, ज्ञानेश्वर मायकल , शिरीष कुलकर्णी   यांच्याशी ओळख  व मैत्री झाली जी आजही कायम आहे. 

किल्लारी  येथे जो भूकंप झाला व त्यातून उभारी घेण्यासाठी संघाने रेबेचिंचोळी हा गाव दत्तक घेऊन त्याला परत वसवले . त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात तेव्हाचे सरसंघचालक स्वर्गीय श्री. रज्जूभय्या आले होते त्या कार्यक्रमास माझी हजेरी होती. पुढे दर वर्षी सध्याचे  सरसंघचालक श्री. मोहनजी  भागवत हे निंबाळ येथील आश्रमास भेट देत असतात . त्यालाच लागून त्यांचा एके वर्षी आमच्या शाखेस प्रवास होता तेव्हा त्यांची भेट आणि बौद्धिक ऐकण्याचा योग आला. अशा प्रकारे आजपर्यंतच्या संघ प्रवासात स्वर्गीय श्री.रज्जूभय्या व श्री. मोहनजी भागवत या दोन सरसंघचालक यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला. 

वडील सेवा निवृत्त झाल्यानंतर आम्ही जुळे सोलापूर येथे राहावयास आलो. याच भागातील के. एल . ई . शाळे समोर भरणाऱ्या 'हनुमान प्रभात' या शाखेवर मी जायला लागलो. याच शाखेवरून मोरवंची ,  पुणे येथे झालेल्या शिवशक्ती संगम या संघाचा भव्य कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे.  हा सोहळा स्मरणीय  ठरला. याच शाखेवर नागेश गुणके, नागेश वाकळे , सिद्राम पोतदार , वसंत पोतदार, भोपालसिंग राजपुरोहित , संतोष कुलकर्णी, विक्रम शहा, संजय पैठणकर   यांची  ओळख व मैत्री झाली. सध्या रोहिणी वस्ती प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. 

१९९४-९५ ते २०२५ म्हणजेच जवळपास  ३०-३१  वर्ष मी संघाची संलग्न आहे. शहर स्तरापासून शाखा स्तरापर्यंत कार्य करणाऱ्या संघ अधिकारी  , स्वयंसेवक याच्याशी जवळून परिचय आहे. संघ विचार हा अती उच्च विचार आहे. आम्ही सर्व स्वयंसेवक त्या वाटेवरून चालण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो . 

संघाची शिस्त ही वाखागण्याजोगी आहे. संघ शाखेवर गरीब - श्रीमंत , जात पात , पद -प्रतिष्ठा असा कधीही भेद भाव केला जात नाही. कोणत्याही पदासाठी , अधिकारासाठी कोणतीही धडपड , चढाओढ संघात असत नाही. संघकार्य हे देश कार्य -राष्ट्र कार्य आहे हे समजून आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे ती आद्य कर्तव्य म्हणून काम करण्याची प्रवृत्ती संघात आहे. प . पू . डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या संघरूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. त्याच्या अनेक शाखा जसे की विश्व हिंदू परिषद, बजरंग दल , भारतीय मजदूर संघ, सामाजिक समरसता मंच , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इत्यादी देशाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आज देशाच्या आणि राज्याच्या मुख्यपदी एक  स्वयंसेवकच कार्यरत आहे. 

संघकार्यामुळे एकमेकांच्या घरी जाणे हे कायम चालू असते. यामुळे काही घरांशी घनिष्ठ जिव्हाळा निर्माण झाला. कोणाच्या शेतावर केलेली हुर्डापार्टी, कोजागिरी पौर्णिमा, आंबा भोजन, दिवाळी फराळ असे विविध प्रसंगी एकत्रीकरण , गप्पा , हास्यविनोद अशा अनेक सुंदर आठवणी आजही मनाला ताजेतवाने करतात. शिवाजी शाखा ही माझी पहिली शाखा.  काही वरील मित्र कामानिमित्त विखुरली असली तरी जेव्हा केव्हा त्यांचे सोलापूरला येणे होते तेव्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. 

आज संघ १०० वर्षात पदार्पन करतोय . त्यातली  ३०-३१ वर्ष मी संघाशी जोडला गेलो हे मी  माझे भाग्य समजतो. एका योग्य वर्तुळात , सहवासात राहिल्याने आई-वडिलांनी घालून दिलेल्या चांगल्या संस्कार टिकून ठेवण्यात संघाची मदत झाली हे निश्चित. शाळेत असतांना मी एन. सी. सी. मध्ये होते तेथील शिस्तीचे गुण संघाने दृढ केले. राष्ट्रभावना , देशप्रेम वाढीस लागले. संघ , संघ शाखा हे एक व्यक्तीमत्व विकासाचे , उत्तम संस्काराचे विदयापीठ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  आजच्या भोगवादी जगात , स्पर्धेच्या कालखंडात निरपेक्षपणे कार्य करणारे अनेक स्वयंसेवक , प्रचारक, संघाने उभ्या केलेल्या संस्था कार्यरत आहेत. स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी हे माझे आदर्श त्यांना आणि मला जोडणारा समान धागा म्हणजे  तेही संघ स्वयंसेवक आणि कवी होते  आणि मीही स्वयंसेवक आणि कवी  आहे. . 

जीवनातील पुढील काळात देखील संघाशी नाळ तुटेल असे वाटत नाही. वरील उल्लेख केलेल्या व्यक्तींचा आणि अनवधानाने काही नावे राहिली असतील त्यांचा आणि मला जोडणारा एकच धागा तो म्हणजे संघ. संघाचा हा राष्ट्र कार्याचा यज्ञ असाच चालू राहील यात काहीही शंका नाही . भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न सर्व समाजाला आपल्या सोबत घेत संघ नक्की पूर्ण करेल . शताब्दी वर्षांनिमित्त सर्व संघ स्वयंसेवक बंधूंना  शुभेच्छा देतो आणि माझ्या लेखणीला विराम देतो. धन्यवाद !

भारत माता की जय ! 

(महेश भालचंद्रराव रायखेलकर ) 



Comments

Popular posts from this blog