श्रीराम नवमीच्या निमित्ताने...
ज्याचा शत्रू एवढा श्रेष्ठ ते श्रीराम सर्वश्रेष्ठ
ही कथा खरी आहे का काल्पनिक मला माहित नाही. मी ही कथा हिंदी मधील प्रसिद्ध कवी , प्रवचनकार श्री. कुमार विश्वास यांच्या प्रवचनाच्या व्हिडीओ क्लिप मधून ऐकली. यातील भाव मला खूपच आवडला. श्रीराम नवमी निमित्त आपल्या समोर ही कथा मांडण्याचा हा प्रयत्न.
युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात . सीतेची रावणाच्या बंदीवासातून सुटका करून आणायची असेल तर शेवटी रावणा सोबतचे युद्ध हे अटळ आहे हे प्रभू श्रीरामाच्या लक्षात येते . युद्धाला जाण्या अगोदर समुद्र किनारी जेथे श्रीरामाची सर्व वानर सेना युद्धासाठी तयार आहे अशा ठिकाणी संकल्प पूर्तीसाठी यज्ञ करावा असे श्रीराम ठरवतात. त्यासाठी पौरोहित्य करणारा शिवभक्त , वैष्णव पुरोहितच हवा अशी मनीषा ते बाळगतात. या पूजेचे पौरोहित्य कोण करणार ? त्यासाठी असा ब्राम्हण कोठे मिळणार ? हा यक्ष प्रश्न श्रीरामापुढे पडतो. पुरोहिता शिवाय पुजा होऊ शकत नाही आणि या समुद्र तटावर, अशा जंगलामध्ये असा पौरोहित्य करणारा ब्राम्हण मिळणे मुश्किल आहे हे श्रीरामाच्या लक्षात येते आणि ते चिंतीत होतात. ही चिंता त्यांचे जेष्ठ मंत्री जांबुवंत यांच्या कानावर जाते. जांबुवंत म्हणतात एक पंडित ब्राम्हण माझ्या ओळखीचा आहे तो जर तुम्हाला चालत असेल तर सांगा. श्रीराम म्हणतात अशा जंगलात, समुद्रकिनारी असा कोण ब्राम्हण आहे. जांबुवंत म्हणतात ज्याच्याशी तुम्ही युद्ध करायला चालला आहात तो रावण शिवभक्तही आहे आणि वैष्णव ब्राह्मण देखील. श्रीराम म्हणतात जर रावण पौरोहित्य करण्यास तयार असेल तर माझी काहीही हरकत नाही त्याला विचारा.
जांबुवंत रावणाला भेटायला जातात. रावण विचारतो मला भेटायला यायचे प्रयोजन? जांबुवंत सांगतात मी एका यजमानाला ओळखतो ज्यांना यज्ञ करायचा आहे त्याचे पौरोहित्य करण्यासाठी मला एक शिव भक्त , वैष्णव ब्राह्मण हवा आहे . या कामी तुझ्या सारखा योग्य व्यक्ती कोणी दुसरा नाही. रावण विचारतो ज्यांना यज्ञ करायचा आहे ते तुमचे यजमान श्रीराम, लक्ष्मण तर नव्हेत ?. जांबुवंत हो म्हणतात. श्रीरामांची इच्छा आहे की युद्धाच्या आधी असा यज्ञ करावा. त्या यज्ञाचे पौरोहित्य तू स्वीकारशील का ? रावण विचारतो या यज्ञाचा उद्देश लंका विजय आहे ना . जांबुवंत सांगतात हो. रावण म्हणतो मी उत्सुकतेपोटी विचारले. उद्देश काहीही असो तुम्ही माझ्या दारी आला आहात आणि मला पौरोहित्य स्वीकारण्यासाठी सांगत आहात. मी एक ब्राह्मण आहे हे काम मी नाकारू शकत नाही. पौराहित्य टाळणे हा माझा धर्म नव्हे . मी हे काम करण्यास तयार आहे. तसे तुम्ही श्रीरामाला जाऊन सांगा. मी तुमच्या सोबत येईल आणि हा यज्ञ पूर्ण करेल. जांबुवंत म्हणतात मुहूर्त काय. रावण आपल्याच अंकीत असणाऱ्या नवग्रहाला मांडून दुसऱ्या दिवसाचा सकाळचा मुहूर्त काढून देतो. जांबुवंत म्हणतात पूजेसाठी सामुग्री काय लागेल. रावण म्हणतो श्रीराम आणि लक्ष्मण जरी राजकुमार असले तरी सध्या वनवासात आहेत. त्यांच्याकडे यज्ञासाठी यथायोग्य सामुग्री असणे शक्य नाही . जर यजमानाकडे पूजेसाठी काही सामुग्री नसेल तर पौरोहित्य करणाऱ्याचे ते काम आहे की सामुग्री घेऊन जाणे . तेव्हा काळजी करू नका मी सामुग्री घेऊन येईल.
रावण आपला मुलगा इंद्रजीत याला सांगतो तू अशोक वाटीका मध्ये जा आणि सीतेला सांग मला तुला भेटायचे आहे. सीता घाबरते , चिंतीत पडते की रावण अजून कोणता कुटील डाव आपल्या सोबत खेळेल. रावण सीतेला भेटतो आणि सांगतो. तुझा पती श्रीराम यज्ञ करण्यास चालला आहे. त्या यज्ञाचे पौरोहित्य मी स्वीकारले आहे. श्रीराम विवाहित आहेत आणि विवाहित पुरुषाची कोणतीही पूजा त्याच्या पत्नी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशा अपूर्ण पूजेचे पौरोहित्य मला करायचे नाही . तेव्हा तू उद्या सकाळी स्नान करून, नवीन वस्त्र घालून तयार रहा. सकाळी इंद्रजित रथ घेऊन येईल तू तयार होऊन त्यासोबत श्रीरामाच्या यज्ञासाठी जा . परत वर संगितले तुझी सुटका फक्त या यज्ञा पुरती आहे. यज्ञ संपताच तुला परत याच रथात बसून अशोक वाटीके मध्ये यावे लागेल.
यज्ञ सुरु होतो. रावण पुरोहिताचे वस्त्र घालून पूर्ण तयारीनिशी येतो. श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या पुरोहितास नमस्कार करतात. रावण श्रीरामास विचारतो तुम्ही विवाहित आहात ना ? श्रीराम सांगतात हो मी विवाहित आहे . मग आपल्या पत्नीला पूजेसाठी बोलवा. श्रीराम सांगतात माझी पत्नी सध्या माझ्यासोबत नाही. रावण म्हणतो पत्नी शिवाय मग पूजा कशी होणार ? जांबवंत म्हणतात मग गुरुजी आता काय करायचे ? . रावण सांगतो मी सांगितले होते जर पूजेसाठी काही कमी पडत असेल तर पौरोहित्य करणारा जो आहे त्याचे ते काम आहे ती कमी पूर्ण करणे. सीता या पूजेसाठी हजर आहे. तो इंद्रजितला सांगतो हे मुला यजमान श्रीरामाच्या शेजारी त्यांची धर्मपत्नी सीतेस बसण्यास सांग. सीता श्रीरामशेजारी आसन ग्रहण करते आणि यज्ञ सुरु होतो .यज्ञाचे सर्व विधी रावण यथासांग पार पाडतो . यज्ञ संपतो . रावण पुरोहित या नात्याने श्रीराम लक्ष्मणास आशीर्वाद देतो की ज्या संकल्पासाठी हा यज्ञ तुम्ही केला तो संकल्प सफळ होवो . जेव्हा यज्ञ संपून रावण निघतो तेव्हा श्रीराम म्हणतात गुरुजी आपली दक्षिणा. तेव्हा रावण म्हणतो माझ्याकडे सर्व आहे. सर्व देव माझे अंकित आहेत. कुबेर माझ्याकडे पाणी भरतोय . श्रीराम म्हणतो ठीक आहे पण मी एक राजकुमार आहे पुरोहितास दक्षिणा जर दिली नाही तर माझा यज्ञ सफळ होणार नाही तेव्हा तुम्हाला दक्षिणा ही घ्यावीच लागेल. त्यावर रावण म्हणतो जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला दक्षिणा मागेल. श्रीराम म्हणतो मी तेव्हा देण्या योग्य असेल किंवा नसेल. काय दक्षिणा असेल ती आताच सांगा. यावर रावण म्हणतो जेव्हा माझा शेवट होईल तेव्हा माझे यजमान माझ्या समोर असावेत. श्रीराम हसून ठीक आहे म्हणतात . गुरुजी जशी तुमची इच्छा .
शेवटी युद्ध होतं . श्रीराम रावणास मारतात. श्रीराम आणि लक्ष्मण त्याच्या समोरच असतात . रावण पत्नी मंदोदरी शोक करते . ती म्हणते ज्याने माझ्या पतीस मारले त्या श्रीरामास मला भेटायचे आहे. मंदोदरी श्रीरामास भेटते. श्रीराम तिला नमस्कार करत म्हणतात तुझा पती बुद्धिमान होता , पराक्रमी होता, ज्ञानी होता पण परस्त्रीच्या अभिलाषापोटी त्याचा नाश झाला . मला त्याला मारावे लागले. मंदोदरी म्हणते हो खरे आहे मी एवढी सुलक्षणा , सुंदर असूनही रावण परस्त्री अशा सीतेस लंकेची राणी बनवू पाहत होता . एक श्रीराम आहे जो मी शत्रू पत्नी असूनही मला आदराने नमस्कार करतो.
श्रीराम इच्छा मुक्त आहेत. एकपत्नी, एकवचनी आहेत . याउलट रावण अभिलाषी, लोभी, स्त्रीलंपट, अहंकारी आहे आणि म्हणून कितीही श्रेष्ठ असला तरी त्याचा नाश होणे हे अटळच.
आपल्या सर्वांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! जय श्री राम !!
(महेश भा. रायखेलकर )

Comments
Post a Comment