"छत्रपती  शिवाजी महाराज आता असते तर"


छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील एक अलौकिक व्यक्तिमत्व. असा एकही मराठी माणूस नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव काढताच त्याचा उर अभिमानाने भरून येणार नाही. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आंपल्या सर्वांचे जीवन उजळून निघाले असते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे निर्माण केलेले स्वराज्य जिथे सर्व जाती धर्माची माणसे सुखाने, आनंदाने राहू शकत होती  . स्त्रियांचा सन्मान केला जात होता . जाती-धर्माला कोणतीही हानी पोहोचत  नव्हती  . आज जर ते असते तर हे सर्व काटेकोरपणे अंमलात आणले गेले असते. 


आज आपण स्वतंत्र्य आहोत. लोकशाही मानणारा देश म्हणून जगात आपल्याला मान आहे. अनेक क्षेत्रात जगात आपण नाव कमावले आहे. पण हे सर्व नक्कीच एकदम झालेले नाही . यासाठी अनेक जण अक्षरशः खपले आहेत . या सर्वात आपली भूमिका नेमकी काय ? हे समजून घेणे गरजेचे आहे. नागरिक म्हणून आपण आपले हक्क तर मोठ्या दिमाखात मागतो मग कर्तव्याचे काय ? त्या बाबतीत आपण एवढे निरुत्साही का ? महापुरुषांच्या जयंत्या , पुण्यतीथ्या , मिरवणुका एवढ्या पुरते आपण स्वतःला बांधून घेतले आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श आचरणात आणण्यास आपण कुठेतरी कमी पडत आहोत असे खेदाने म्हणावे लागेल.  छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांनी घडवलेले मावळे जसे की तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक , हंबिराव मोहिते इत्यादी स्वराज्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असत. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज सारखे नेतृत्व. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आजचे तरुण भरकटलेले आपल्याला दिसले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात ते देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी सदैव तयार असले असते. कोणताही परकीय देश आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकला नसता. स्त्री सुरक्षित राहिली असती. 


आजही सार्वजनिक स्वच्छते बाबत आपण कमी पडत आहोत . सार्वजनिक शिस्त पाळण्याबाबतीत आपण उदासीन आहोत. कितीही प्रयन्त केले तरी मतदान जे की आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याची टक्केवारी वाढत नाही. पाश्चात संस्कृतीचा अनुसरण करत आपल्या संस्कृतीचा ऱ्हास आपण आज उघड्या डोळ्याने पहात आहोत. अभिव्यक्ती  स्वातंत्र्याखाली आम्हाला कसे व्यक्त व्हावे याचे तारतम्य राहिले नाही. जाती-धर्मातील दरी वाढविण्यात आम्ही स्वतःला धन्य मानत आहोत. सरकारी नियम कसे धाब्यावर बसवता येतील यांच्याकडे आमचा जास्तीचा कल असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला आम्ही ओरबाडत आहोत. भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालण्यास आम्हाला काहीही वाटत नाही. मी आणि माझे कुटूंब आणि त्यांचे सुख  अशी  चौकट आम्ही घातलेली आहे. शिव्या देत स्त्रियांचा अनादर आम्ही  पावलोपावली करत आहोत. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराज आज जर असले असते तर नक्की थांबले असते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त. गुन्हेगार मग तो त्यांचा नातेवाईक का असेना त्यांनी त्याची मुलाहिजा बाळगली नाही तेव्हा गुन्हेगारांना कठोर शासन ताबडतोब झाले असते. गुन्हेगार मोकाट सुटले नसते. भ्रष्ट्राचार थांबला असता. भारतीय संकृती टिकून राहिली असती. निसर्गाची हानी टळली असती. 


छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर आपल्याला कर्तव्ये  काटेकोरपणे बजवावी लागली असती . आपल्याला  मिळालेली ऊर्जा देशाच्या , समाजाच्या विधायक कामासाठी खर्च करावी लागली असती  देश आमच्यासाठी काय करतोय यापेक्षा आम्ही देशासाठी काय करू शकतो हे पहावे लागले असते  सरकार सर्वकाही करेल असे म्हणून चालले नसते . देशासमोर , समाजासमोर असलेल्या समस्या आपण सोडवू शकतो का याचा विचार प्रत्येकाला करावा लागला असता  . आपल्याकडे असलेली जबाबदारी मग ती सरकारी किंवा खाजगी नोकरी असू , व्यवसाय असू काटेकोर पणे बजावावा लागला असता . कारण या सर्व बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज फारच दक्ष होते. त्यांची एक जरब आपल्या प्रशासनावर होती. त्यांची रयत म्हणजे जनता सुखी कशी राहील याकडे त्यांचे लक्ष असले असते. शेतकरी सुखी झाला असता. 


छत्रपती शिवाजी महाराज आज असले असते तर स्वदेशी वस्तूंचा वापर वाढला असता. स्वैराचार थांबला असता. आपण सर्व एक आहोत आणि देशासाठी काहीही करण्यासाठी सदैव तयार आहोत हा विचार जनमानसात रुजला असता. आज तरुणाईचा देश म्हणून जगात आपली ओळख आहे. या तरुण लोकांना योग्य दिशा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर नक्कीच मिळाले असते. सरंक्षण यंत्रणेबाबत छत्रपती शिवाजी महाराज फार दक्ष होते ती देखील आज मजबूत झाली असती. त्यांच्या नेतृत्वात अनेक सरदार आजचे मंत्रीगण तयार झाले असते जे देशासाठी झटले असते. आज बोटावर मोजण्याइतके राजकारणी देशासाठी कार्य करतांना आपण पाहतो बाकीचे स्वतःचे हीत पाहण्यात मग्न आहेत. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज आज असले असते तर बदलेले असते. दारू, गुटका. इतर मादक पदार्थ यांचा बाजार छत्रपती शिवाजी महाराज आज असले असते तर चालला असता का ? तर नक्कीच नाही. हिंदू धर्माला एक वेगळी उंची मिळाली असती. धर्माचा वापर राजकारणासाठी न करता जनकल्याणासाठी झाला असता. दिन-दुबळ्या , गरीब जनतेस न्याय मिळाला असता. 


शांतिप्रय , मजबूत , बळकट साऱ्या जगाला दिशा दाखविणारा  विश्वगुरू भारत छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर झाला असता . इतर देशाला भारत दिशादर्शक ठरला असता. जगावर भारताची पकड असली असती. जगाची वाटचाल भारताने आखून  दिलेल्या वाटेने झाली असती. देशात पुन्हा एकदा रामराज्य आले असते. 


(महेश भाचंद्रराव रायखेलकर )


Comments

Popular posts from this blog