"सरांची राहिलेली भेट"
एस. आर. पाटील सर माझे धाराशिव येथील जिल्हा परिषद शाळेतील ५ वी ते १०वी एन . सी . सी. आणि सायन्सचे सर . सरांचा शिस्तीचा माझ्यावर खुप मोठा प्रभाव . आजही बोटाची नखे वाढली किंवा डोक्यावरची केस वाढली की वेळेत काढली जातात कारण ही वाढली की त्याकाळी सरांची छडी ठरलेली . शाळेला जायला कधी उशीर झाला तर पहिले गेटवर सरांची हातावर छडी खाल्ल्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नसे . एन . सी . सी. कॅम्प , परेड सारे काही आठवते . सरांचा रुबाबदार चेहरा , पिळदार मिश्या , १५ ऑगस्ट २६ जानेवारी सर पांढरेशुभ्र धोतर व वर नेहरू शर्ट अशा पेहरावात असत . मागे बऱ्याच वर्षापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे संघाचे महासंचलनाच्या वेळी सरांची धावती भेट झाली तेव्हा सर हसून म्हणाले होते " रायखेलकर एन . सी . सी. मधे शिस्त आणि संघात देखील शिस्त " . ती भेट शेवटची . धाराशिव संघ बांधणी मधे सरांचा वाटा मोलाचा. एकदा धाराशिव मधे बहीण असल्याने "राखीपौर्णिमेस धाराशिव येथे येणार आहे मला तुम्हाला भेटायचंय सर "असे फोनवर बोललो होतो पण सरांची बहीण सोलापूरला असल्याने ते राखीपौर्णिमेस सोलापूरला येणार होते तेव्हा भेट झाली नाही . नंतर कामाच्या व्यस्ततेत सरांची भेट , मनमोकळ्या गप्पा राहून गेल्या . मी भाग्यवान असे सर मला लाभले . सरांमुळे जीवनाला एक शिस्त लागली . ऑगस्ट २०२४ मधे धाराशिव येथील मामेभावाकडून एस. आर. पाटील सर गेल्याचे कळाले ( मामेभाऊ देखील त्यांचा विद्यार्थी ) आणि डोळे पाणावले . अशा माझ्या आदर्श सरांना विनम्र प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली. सरांना एकदा भेटावे, त्यांच्या पायावर डोके ठेऊन आर्शिवाद घ्यावा असे वाटायचे पण नंतर भेट धाराशिव जवळ असूनही झाली नाही. ही हूरहूर कायमची असेल. आजही हा लेख लिहितांना सरांचा चेहरा समोर येतो. सरांची ' रायखेलकर' ही हाक अजूनही कानावर ऐकू येते. आजही गुरुपौर्णिमेस सरांची आठवण येते. सरांनी घालून दिलेली शिस्त शेवटपर्यंत पाळणे हीच सरांना दिलेली खरी गुरुदक्षिणा ठरेल.

Comments
Post a Comment