"सोलापूरची खाद्यसंस्कृती"
चवीचे खाणार त्याला सोलापुरात सर्वकाही मिळणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. किती विविध पदार्थ सोलापुरात मिळतात नुसती उजळणी जरी केली तरी तोंडाला पाणी सुटेल. मी मुळचा सोलापूरचा नाही पण मागील २० - २५ वर्षांपासून सोलापुरात राहतो आहे व आजपर्यंत जे काही घरचे सोडून सोलापुरात बाहेर खाल्ले आहे त्याच्या अनुभवावरून हे लिहले आहे . एखादे सोलापुरात ठिकाण किंवा पदार्ध असेल तो मी चाखला नसेल तर त्याचा उल्लेख येथे आलेला नाही. तेव्हा कृपया कोणताही गैरसमज नको. 'डिस्को भजी' हा भज्याचा प्रकार सोलापुरातच मी पहिल्यांदा खाल्ला . केलेली मिर्ची भजी कापून पुन्हा एकदा तेलात तळून कडक केली जातात. त्यासोबत शेंगा चटणी आणि कढी व बारीक कांदा दिला जातो हे सर्व एकदम अप्रतिम . बहुतेक सर्व भज्यांच्या गाड्यावर हा डिस्को भजी प्रकार मिळतोच. सोलापूरची शेंगाची चटणी आणि कडक भाकरी ही फक्त सोलापुरात नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहे. परदेशातही ही निर्यात केली जाते. सोलापूरचे 'नसले बंधू' यासाठी प्रसिद्ध आहेत. काही बचत गटा मार्फत देखील कडक भाकरी बनवली जाते. यातून महिलांना मोठा रोजगार मिळाला आहे. भेळेसाठी 'भैय्याची भेळ' ही प्रसिद्ध आहे. क्वचित असा सोलापूरकर असेल ज्याने भैय्याची भेळ ही खाल्ली नाही. पार्कवरील विविध गाड्या विविध पदार्ध सोलापूरकरांना खावू घालत असतात. ही सोलापूरची मुंबईची चौपाटीच जणू आहे. नवीपेठेत संध्याकाळी खरेदीला गेल्यानंतर किंवा इतर काही कामानिमित्त गावात गेल्यानंतर सोलापूरकर या पार्कवरील गाड्यावरील पदार्थांचा आस्वाद सहकुटूंब घेतात. संध्याकाळी येथे तुडूंब गर्दी पहावयास मिळते. वजनावर आईस्क्रीम देखील मी सोलापुरात पहिल्यादांच खाल्ले आहे. याची चव देखील मस्त.
जोशींचा भाग्यश्री चिवडा आणि बटाटेवडा हा देखील सोलापुरात खूप प्रसिद्ध आहे. या दोन्हीची चव लाजवाब. दरवर्षी भरणाऱ्या गड्डा यात्रेत यांचा स्टॉल असतो. गड्डा यात्रेत गेलोत आणि जोशींचा गरम असा बटाटेवडा खाल्ला नाही असे होत नाही. सकाळच्या नाष्टासाठी सोलापुरात अनेक ठिकाणे आहेत. माझ्या आवडीचे ठिकाण म्हणजे सुधा . येथील इडली वडा , डोसा व अमर्याद मिळणारी चटणी व सांबार एकदम मस्त. सध्या यांची दोन ठिकाणे झाली आहेत. एक जुळे सोलापुरात आणि दुसरे सात रस्ता . दोन्ही ठिकाणी ग्राहकांची वर्दळ तुडूंब. रविवारचा कित्येक घरांचा नाष्टा येथेच होतो. घरी देखील पॅकबंद करून येथून पदार्ध दिले जातात. कोणत्याही वेळेचा नाष्टा साठी कामत हॉटेल देखील खूप चांगले आहे. इथला पेपर डोसा मस्त. मी जुळे सोलापुरात राहत असल्याने येथीलच नाष्टासाठी पुष्पक, स्वाद देखील उत्तम ठिकाणे आहेत. पावभाजीसाठी सोलापुरात सुप्रजा प्रसिद्ध आहे. बहुतेक सोलापूरकरांनी येथील पावभाजी खाल्ली असेलच. उन्हाळ्यात किंवा इतरवेळी देखील कामठे पुणेकर येथील उसाचा रस प्रसिद्ध. तसेच सात रस्ता मधील कृष्णा आईस्क्रीम देखील मस्त.
अनादीची धपाटे, शेंगा पोळी , खवा पोळी अप्रतिम. घरी पार्सल सेवा देऊन अनेक सोलापूरकरांची मने व पोट यांनी तृप्त केली आहेत. आज सोलापुरातील काही महिला देखील गृह उद्योग करून काही घरगुती पदार्ध जसे कि विविध प्रकारचे लाडू , चकली , सातूचे पीठ , चिवडा , शेव , दिवाळीचे पदार्ध सोलापूरकरांना पुरवत आहेत. यांनी बनवलेले पदार्थ देखील चवीला उत्तम असतात.
सोलापुरातील हॉटेल मधील देखील जेवण अगदी चविष्ट. यात गुजराथी थाळी पुरवणारे रसिक, साईप्रसाद , पांचाली , पूनम इत्यादी हॉटेल खरं बेस्टच आहेत. इतर हॉटेल म्हणजे लोकप्रिया, अंबर, सेलीब्रेशन , कामत , जय- विजय, निसर्ग , मंत्रालय , धनश्री , बासुरी इत्यादी हॉटेल मधील जेवण पोटाला तृप्त करणारे आहे. हुग्गी ( गव्हाची खीर ) देखील काही हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मिळते असे मी ऐकले आहे. पण अजून तो माझा आवडता पदार्ध असून देखील बाहेर मी तो चाखलेला नाही बघूया कधी योग येतो ते. कार्यक्रमातील केटरिंगचे पदार्ध प्रीती आणि दिपालीचे उत्तमच . वर्षानुवर्षे यांनी तीच अवीट चव ठेवून सोलापूरकरांची मने जिंकलेली आहेत. घरगुती जेवणासाठी 'हॉटेल सुगरण' खरं सुगरणच .
मिठाई व इतर खमंग पदार्थांसाठी 'अन्नपूर्णा' उत्तम. घरगुती जेवणातील पदार्थ जसे की विविध चटण्या , लोणचे , पापड , मिरच्या यासाठी 'पेठे' यांचा हात कोणी दुसरा धरू शकणार नाही .
तेव्हा या लेखावरून वाचकांना हे लक्षात आले असेल कि सोलापुरात खाण्याची रेलचेल आहे. सोलापूरकर तर याचा आस्वाद बारा महिने घेतातच. सोलापुरात कामानिमित्त, पर्यटनानिमित्त आलेल्या बाहेरील पाहुण्यांना या सोलापूरची खाद्यसंस्कृती सांभाळणाऱ्या व्यावसायिकांनी चांगला पाहुणचार व चविष्ट पदार्थ खाऊ घालून सोलापूरचा बहुमान वाढवला आहे. तेव्हा आमच्या या लाडक्या सोलापुरात सर्व खवैयांचे हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद !
( महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment