"मी कापलेला पहिला केक"
आम्ही एकूण तीन भावंडं . मोठा एक भाऊ, मधली बहीण व मी सर्वात लहान अर्थात शेंडीफळ . लहानपणी आमच्याकडे वाढदिवस करण्याची प्रथा नव्हती. त्याला कारणही तसेच होते. माझी दोन का तीन भावंडं ही जन्मतःच एक तर मला आईच्या सांगण्यावरून ५-६ वर्षाचा झाल्यानंतर वारली. तेव्हा मोठा भाऊ ज्याला आम्ही अण्णा असे म्हणतो तो नवसाचा. त्याच्या पायात कित्येक वर्ष चांदीची बेडी होती नंतर त्याने ती मोठेपणी हातात कडे करून घातली. मी कधी कधी विचार करतो ही वारलेली भावंडं जर वाचली असती तर कदाचित माझा नंबरही लागला नसता. कोण्याच्यातरी जाण्याने मी या जगात आलो असे मी हसून कधी कधी माझ्या सौ ला म्हणत असतो . नवसाची मुलं असल्याने त्यांचे कोडकौतूक करू नये, कोणाची नजर त्यांना लागू नये असा काहीसा विचार आम्हा आई-वडिलांचा असावा, म्ह्णून लहानपणी आम्हा भावंडांचा वाढदिवस कधी साजरा केला असे मला आठवत नाही. आत्तासारखी केक- बेक कापणे ही प्रथा तर त्यावेळी अजिबात नव्हती. तेव्हा आजवरच्या आयुष्यातील पहिला केक मी वयाच्या २३-२४ व्या वर्षी कापला. तो ही माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी आणलेला.
त्याचे असे झाले १९९७-२००१ या काळात मी मंगळवेढेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट येथे कॉम्प्युटर सेक्शन कोऑर्डिनेटर म्हणून नोकरीस होतो. याच काळात सी. सी. सी. ओ. हा तेव्हा कॉम्प्युटरचा सरकार मान्य कोर्स करण्यासाठी एक काकूंची बॅच जॉईन झाली. काकूंची बॅच यासाठी म्हणतोय की या बॅचमधे सर्व महिला होत्या त्याही जवळपास माझ्या दुप्पट वयाच्या म्हणजे ४६-५० या वयामधील. सर्व संसारीक. शाळा-कॉलेज जीवन हा टप्पा कित्येक वर्षांपूर्वीच पार केलेल्या. अशा महिलांना नवीन टेक्नॉलाजी कशी समजावून सांगणार ?. कॉम्प्युटर कसे शिकवणार ? . हा माझ्या समोर प्रश्न होता. पहिल्यांदा मी यांना शिकविण्यास नाखुश होतो. पण नोकरी होती काय करणार ! नंतर काही दिवसातच या बॅच मधील सर्व विद्यार्थींनीनी उत्साहाने हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. या कोर्सच्या दरम्यान माझा वाढदिवस आला. याच बॅच मधील बालिगा मॅडम यांना कोठून कळाले की आज माझा वाढदिवस आहे कोण जाणे. त्यांनी त्यांच्या कॉलेजवयीन मुलीकडून केक मागविला आणि मला तो कापायला लावत माझा वाढदिवस साजरा केला. तेव्हा मी फार भावनाविवश झालो. हा मी कापलेला पहिला केक. नंतर कित्येक वर्षांनंतर मला त्या मॅडम एकदा भेटल्या तेव्हाही मी त्यांना आवर्जून आठवण करत सांगितले की तुम्ही माझ्यासाठी वाढदिवसाला आणलेला केक आजही मला आठवतो.
नंतर वैवाहिक जीवनात दरवर्षी बायको केक आणते . केक कापला जातो. वाढदिवस साजरा केला जातो. पण पहिला केक तो पहिलाच. त्याची आठवण आजही चांगलीच स्मरणात आहे.
(महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment