"चलो इश्क लड़ाए"


आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. सर्वत्र प्रेमाचा महापूर. पाश्चात संस्कृतीच्या  या  खुळाने  आपल्या देशातही चांगलेच बाळसे धरले आहे. बाजारपेठेचा रेटा याला बराचसा कारणीभूत  आहे. एक दिवस प्रेमाचा चांगल्या रीतीने साजरा केला तर कोणाची काय हरकत असणार आहे .  फक्त त्याला भलतंच वळण लागू नये एवढेच. आपल्याकडे मुलगा-मुलगी/ स्त्री -पुरुष याच्या प्रेमाचे जास्तीचेच उदात्तीकरण केले गेले आहे. त्याला आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. तसेच लेखक, कवी, शायर यांनी देखील यावरच भरभरून लेखन करून यात भरच घातली आहे. या पलीकडेही प्रेमाची काही व्याख्या असू शकते हे कोणाच्या खिजगिणतही नाही. इश्क दुसऱ्याही बाबतीत लढवलं जाऊ शकतं याची कल्पनाही नाही. 

शेवटी प्रेम म्हणजे काय तर उद्दात्त भावनेचे प्रगटीकरण. आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी. माणूस हा सर्व प्राणीमात्रात भावनाप्रधान आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला भावनेची जोड असते. प्रेमात पडलेला व्यक्ती ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याच्यासाठी तो वेडा झालेला असतो. पण मी म्हणतो प्रत्येक वेळेस प्रेम म्हणजे एखादी व्यक्तीच का असावी. आपण आपल्या एखाद्या स्वप्नावर प्रेम करू शकत नाही का ? आपण एखाद्या आपल्या छंदावर प्रेम करू शकत नाही का ? आपण आपल्या देशावर, मातृभूमीवर प्रेम करू शकत नाही का ? आपण एखाद्या खेळावर प्रेम करू शकत नाही का ? आपण आपल्या समाजावर प्रेम करू शकत नाही का ? या आणि अशा अनेक चांगल्या गोष्टी आपल्या इश्क का बनू नयेत ? त्यासाठी झपाटलेपणा आपल्यात का येऊ नये ? यात आपल्या भावना का गुंतू नयेत ?

सचिन तेंडुलकर - क्रिकेट , अभिताभ बच्चन - अभिनय  ,  टाटा, अंबानी, नारायण मूर्ती    - उद्योग , आमटे परिवार - समाजसेवा , नरेंद्र मोदी - राजकारण , लता , आशा,  रफी , किशोर , मुकेश - गायन  या आणि अशा दिगज्ज व्यक्तींना आपले इश्क सापडले होते. म्ह्णूनच त्यांनी  आपआपल्या क्षेत्रात झोकून देऊन एक उंची गाठली हे आपण सर्वजण पाहतो. ही सर्व आपल्या सारखीच हाडामासाच्या  व्यक्ती होत्या/आहेत. पण त्यांना आपल्या जीवनाचे इप्सित सापडले . ते आपल्याला का गवसू नये ? 

तेव्हा आपल्याला  माझ्या आवडीच्या गोष्टी कोणत्या आहेत , माझा कल कोणता आहे  हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर जाणून घेतले असेल तर झपाटून त्याच्यावरच प्रेम करूया  . त्यातील उच्च शिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील राहूया . कारण भावना गुंतल्याशिवाय कृती होणार नाही. आणि कृती शिवाय यश संपादन करणे अशक्य. भावना , बुद्धी , कृती एकाच दिशेने असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्योग, राजकारण , खेळ , कला , संशोधन , शिक्षण , कृषी,समाजसेवा, प्रशासन या आणि अशा अनेक क्षेत्रात अजूनही खूप मोठे काम उभे होऊ शकते. ही क्षेत्रे तरुणांची प्रियकर /प्रियसी का होऊ शकत नाहीत ? या क्षेत्राशी  तरुणाई 'चलो इश्क लड़ाए' असे का म्हणू शकत नाहीत ? 

शेवटी आपल्याला अशा आपल्या इश्काच्या गोष्टी सापडो, त्यातले झपाटलेपण येवो आणि ही इश्काची लढाई यशस्वी होवो यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. इथे एक माझाच हिंदीतला शेर लिहतो " हमने इश्क किया है, बर्बाद तो होनाही था । ' पण येथे टिपिकल प्रेमातले बरबाद होणे अपेक्षित नाही तर आपण निवडलेल्या इश्काच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठणे अपेक्षित.

(महेश भा. रायखेलकर ) निमित्ताने लिहलेला लेख 
संचालक,  व्यंकटेशा कॉम्प्युटेक
सन 2009 पासून आपल्या सेवेत
शॉप नं.9, बनशंकरी नगर, म्हाडा कॉलनी,
टाकळीकर मंगल कार्यालय रोड
जुळे सोलापूर, सोलापूर
Our Professional Excellence ... Will Take YOU Forward !






Comments

Popular posts from this blog