भारतीयत्व हाच धर्म !!!  भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व 

मागील काही दिवसापासून फार अस्वस्थ झालो आहे  . मनावर  निराशेचे मळभ दाटलेत  . मन अगदी विषष्ण झालंय  . केवढा हा प्रचंड द्वेष, केवढा हा भयंकर  तिरस्कार, केवढे हे आरोप प्रत्यारोप, केवढ्या ह्या मोठ्या जातीच्या भिंती?  का असं होतंय?  यातून काय साध्य करायचंय ?  कोठे चाललोत आपण ?  कोठे कमी पडलोत  आपण?  हे असं घडतंय कारण आपण भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा विसरलो आहोत , धर्म जातींची झापडे लावल्यामुळे आपली भारताप्रतीची नजर, निष्ठा धूसर झालीय. आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, राजर्षी शाहू महाराज , फुले, सावरकर  यांची शिकवण विसरलो आहोत . आपण महात्मा गांधींनी घालून दिलेला अहिंसेचा  मंत्र विसरलो आहोत.  या सर्व महापुरुषांना जाती- जातीत विभागण्याचा करंटेपणा आपण करतो आहोत . या  व इतर सर्व महापुरुषांनी आपले सर्वस्व अर्पण केले या 'देशासाठी', नाही की  विशिष्ट  जाती व धर्मासाठी.  आपल्या महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ , संत गाडगेबाबा, संत रामदास या व इतर संतांनी समस्त मानव कल्याणासाठी कार्य करून ठेवले आहे , नाही एका जाती व धर्मासाठी . त्यांच्या  या कार्याचा विसर पडून आपण भलतेच कार्य हाती घेतलंय असे दिसून येत आहे. जे की समस्त समाजासाठी व अंतिमतः  देशासाठी मारक आहे याची जाणीव आपल्याला आहे का?   आपण भारत मातेला माता म्हणतो. शेवटी हि माता म्हणजे तरी काय ? या देशातील १२५ करोड जनता, येथील साधनसंपत्ती.  जी साधनसंपत्ती तयार करण्यासाठी देशातील प्रत्येकाने  प्रयत्न  केले, घाम गाळलाय . कोण आपल्या मातेला दगड कसा मारू शकतो ? जाळू कसा शकतो ? , बंद करून कोंडू कसा शकतो? . नुकसान कसे पोहचवू शकतो? या घटनेमध्ये व नंतर जे युवक दुर्देवी मरण पावले ते आपलेच बांधव होते भारत मातेचे पुत्र होते. आपला पुत्र गेलेला पाहून भारत माता किती दुःखी होत असेल ? त्यांच्या कुटूंबीयांचे नुकसान कोण भरून काढणार ?  त्यांचा  असा विनाकारण जीव घेण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला ? याचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल. एक तरुण जेव्हा नाहक मरण पावतो तेव्हा आपण भविष्यातील चांगला  डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योजक , नेता इ. गमावलेला असतो याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे. या घटनेतील विशेष चिंताजनक बाब म्हणजे अल्पवयीन तरुणांचा असलेला सहभाग. कसले विषाचे बीज आपण पेरतोय.  काय शिकवतोय? कोणत्या विनाशाच्या मार्ग दाखवतोय ? जे तरुण पकडले गेलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांचे  भवितव्य काय?  जन्मभर गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावर बसेल. याला जबाबदार कोण? याचे उत्तर आपल्याला दयावे लागेल.  आपल्याला  आपआपला भगवा, निळा, हिरवा, पिवळा झेंडा मोठा करतांना तिरंग्याचा विसर पडत चाललाय .  आपआपली शक्ती वाढवतांना भारतीय शक्ती क्षीण होत चाललीय याचे भान राहिलेले नाही. आपआपली विचारसरणीचा प्रचार करतांना भारताचा विसर पडत चाललाय . याचा फायदा परकीय शक्तीने घेतला आणि काही देशाचे  नुकसान झाले तर ते आपल्याला परवडणारे आहे का? आधीच पाकिस्तान सतत आपल्या देशात अशांतंता पसरवण्याचा प्रयत्न करत असतो. अश्या घटनेने आपणच त्याच्या नापाक इराद्याला खतपाणी घालोतय हे आपल्याला लक्षात कसे येत नाही .  शेजारील चीनची राक्षसी महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही . अशा  घटनेने त्या महत्वकांक्षेला आपण बळकटी देतोय हे लक्षात घेणे गरजेजे आहे.  सीमेवरील सैनिक एका जातीसाठी, एका   धर्मासाठी लढत  नाहीत तर देशासाठी लढतात, तिरंग्याच्या शानसाठी लढतात व प्रसंगी वीरमरण पत्करतात . त्यांचे हौतात्म आपण वाया जावू देणार का? असे वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या आत्म्याला काय वाटत असेल , वीर पत्नी व त्यांच्या कुटूंबियांना काय वाटत असेल ?  याचा विचार आपण करणे गरजेचे झाले आहे . कोणत्या जातीत व धर्मात जन्माला यावे हे आपल्या हातात नाही तर त्याचा  एवढा अभिमान कसला? दंभ कसला?  प्रेत्येकाला आपला  जात, धर्म व त्याची उपासना करण्याचा हक्क भारतीय घटनेने दिला आहे पण देशापेक्षा कोणतीही   जात किंवा धर्म कधीही मोठा होवू शकत नाही हे हि त्रिवार  सत्य आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थे मध्ये आपल्याला पाहिजे त्या पक्षाला मतदान करून सरकार निवडून आणणे हा  हक्क आपल्या प्रेत्येकाला आहे.  पण देश निष्ठेपेक्षा पक्ष निष्ठा कदापिही मोठी होवू शकत नाही.  लोकशाही व्यवस्थे मध्ये सरकारे येतात आणि जातात . कोणतेही एक विशिष्ट सरकार हे  देशापेक्षा मोठे होवू शकत नाही . देश  स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते एका विशिष्ट जातीचे केव्हा धर्माचे नव्हते तर फक्त आणि फक्त  एक  स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे  बलिदान आपण व्यर्थ जावू देणार का?  या सर्व घटनेने  परदेशात आपल्या देशाची काय प्रतिमा होत असेल?. कितीदिवस आपण इतिहासाच्या चुका व पराक्रमाच्या कहाण्या कुरवाळत बसणार ?.  आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेले देश आज आपल्याही पुढे गेलेले  आपण पाहत आहोत.  त्याचे कारण एकच आहे केवळ आणि केवळ त्यांची त्यांच्या देशाप्रती असलेली अपार निष्ठा. त्यांच्याकडून आपण काही शिकणार आहोत कि नाही.  बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुपोषण, शेतकऱयांच्या आत्महत्या, कायदा व सुव्यवस्थाचे प्रश्न, देशाच्या विकासाचे प्रश्न इत्यादी आ वासून आपल्या समोर उभे असताना आपण आपसात जर भांडत बसलो तर हे प्रश्न कोण सोडवणार ? सरकार व सरकारी यंत्रणेची शक्ती नको त्या ठिकाणी खर्च होत गेली तर देशाचा विकास कसा होणार? अशा  घटनेने पोलीस यंत्रणेवर किती ताण पडतो याचा आपण विचार करतो  का?
मी निराश झालोय पण हताश नाही. कारण मला माहित आहे आजही शेतकरी जेव्हा धान्य पिकवितो तो सगळ्यासाठी. डॉकटर आपल्या रुग्णावर उपचार करताना जात किंवा धर्म पहात नाही. एक शिक्षक ज्ञान दान करताना जात किंवा धर्माचा चष्मा लावत नाही, एक वकील एक न्यायाधीश न्यायदान करताना जात धर्माचा विचार करत नाही. प्रशासनीतील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक , खेळाडू, कलाकार,   आजही देशाची आन, बान  , शान वाढवण्यासाठीच काम करतात. मैत्री करतांना व ती टिकवतांना आपल्या मनाला जात व धर्माचे विचार चिकटत नाहीत.  या सर्वांचा आवाज बुलंद करणे , त्याचे मनोधर्य वाढवणे आपले कर्त्तव्य आहे. प्रजासत्ताक दिन जवळ येतोय . यानिमित्ताने असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य  उपभोगतोय याचे भान आपण ठेवुयात. सिमेवरील सैनिकांच्या जागरूकतेमुळे आपले  स्वातंत्र्य अबाधित आहे याची  जाणीव आपण ठेवूयात. अनेकता मे एकता ही आपली ताकद आहे. धर्मनिरपेक्षता हा आपला मंत्र आहे. सर्वात मोठी व मजबूत लोकशाही म्हणून जगात आपला नावलौकिक आहे. तो लौकिक टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.  लोकशाही बळकट करणे हे नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.  घटनेने आखून दिलेल्या चौकटीमध्ये काम करणे यास आपले प्राध्यान असले पाहिजे.  'वसुधैव कुटुम्बकम्' अशी जगात आपली ओळख आहे ती ओळख आपण अजून मजबूत करूयात. जगातील सर्वात जास्त युवकांची संख्या आपल्या देशात आहे. या युवकांना योग्य मार्गदर्शन करणे व एका अती-उच्चं ध्येयाप्रती प्रेरित करणे हे आपले कर्तव्य  आहे तरच आपला भारत  देश एक महासत्ता बनून विश्वगुरू बनण्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलामांचे     आपले स्वप्न साकार होईल.  


© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog