आवर्जुन चांगले पहा, चांगले ऐका, चांगले वाचा


हा लेख लिहीत असतांना  मला गांधीजींच्या त्या तीन माकडांची आठवण झाली जे कि सांगतात वाईट पाहू नका , वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. गांधीजींच्या विचारांचा योग्य तो सन्मान ठेवून मला आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जेथे कि द्रूक-श्राव्य माहीतीचा सर्वत्र  भडीमार होत  आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, दूरदर्शन  वरून चोवीस तास माहितीचा महापूर वहात आहे  जो की  आपण इच्छा असूनही टाळू शकत नाही मला  असे नमूद करावेसे वाटते आवर्जुन 'चांगले पहा', 'चांगले ऐका', 'चांगले वाचा'. याची सुरवात आपण स्वतःपासून करून त्याचे बीज आपल्या पाल्यात रुजवणे आजच्या काळात अत्यंत  आवश्यक झाले आहे.

चांगले पहा - आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही  ना काही पहात असतो. आपण काय पहातोय याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो व आपले व्यक्तिमत्व त्यानुसार घडत असते. पण आजच्या काळात वाईट पहाणे आपण टाळू शकतो का?  तर काही प्रमाणात नाही. पेपर मधून येणा-या अर्धनग्न जाहिराती, दूरदर्शन मधील उत्तेजक जाहिराती, प्रक्षोभक दृष्ये, फालतू मालिका,  बाहेर दिसणारी सिनेमांची पोस्टरे, जाहिरातीची बॅनर्स , सोशल मिडियावरील अश्लील जाहिराती किंवा माहीती, मिरणुकीतील आचरट नाच   हे आपल्याला न पहाणे टाळता येणार आहे का ? तर नाही  . हे सर्व बंद करणे देखील आजच्या काळात  शक्य नाही. तर मग आपल्या हातात काय उरते?  ते म्हणजे चांगले पाहणे व आपल्या पाल्याला आवर्जुन चांगले पाहायला  लावणे. आपल्या गावात चागंले चित्र प्रदर्शन लागले असेल, शिल्प प्रदर्शन  असेल, बोध देणारा  चित्रपट  लागला असेल , एखादे चांगले नाटक असेल,  प्राणी संग्रहालयं असेल, पुरातन वस्तूचे संग्रहालयं असेल, सायन्स सेंटर असेल, योग शिबीर असेल, खेळाच्या स्पर्धा असतील, पुरातन मंदिर असेल येथे आपण जातो का ?  मुलांना घेवून जातो का ? नसेल तर चांगले काय आणि वाईट काय याचा फरक त्यांना कसा कळणार?.  तर याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपण सहलीसाठी महाराष्ट्रातील किल्ले, वेरूळ अजिंठाची लेणी , कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र, हेमकलसा,  सावरकरांना जिथे शिक्षा झाली असे अंदमान ही ठिकाणं निवडून येथे जावून व ती ठिकाणे पाहून नक्कीच प्रेरणा घेवू शकतो व मुलांना ती देवू शकतो . तसेच महाराष्ट्रातील अध्यात्मिक मंदीरे जसे की  पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, कोल्हापूर, शेगाव, शिर्डी, अष्टविनायक या ठिकाणी जावून स्वतः व मुलांना अध्यात्माची कास धरायला लावणे आजच्या काळात गरजेचे आहे. काहींना अध्यात्मिक होणे बुरसटलेले वाटू शकते पण तंत्रज्ञान युक्त, हुशार पण मनाने विकृत अशी पिढी घडविण्या पेक्षा तंत्रज्ञान युक्त, हुशार व  मनाने अध्यात्मिक पिढी घडविणे कधीही चांगले. कारण आपण बघतो ज्या कोणी समाजात श्रेष्ठ व्यक्ति  होवून गेल्या व आहेत त्यांचा विचारांचा पाया हा उत्तम व भक्कम आहे व त्याला थोडीतरी अध्यात्मिकतेची किनार आहे. एकदा चांगले पाहण्याची दृष्टी सजग झाली की  वाईट जरी एखाद्यावेळेस नजरेसमोर आले तरी त्याचा परीणाम आपल्या विचारांवर होणार नाही.

चांगले ऐका- दिवसभर आपण खूप काही ऐकत असतो. वाहनांचे कर्कश आवाज, रेडिओवरील जाहिरातींचे आवाज, लग्न-समारंभ व इतर सभारंभ मध्ये लावलेले रद्दड गाण्यांचे आवाज, टवाळखोर व्यक्तींच्या  शिव्यांचे आवाज हे आपल्या कानांवर इच्छा नसताना देखील आदळत असतात. हे जर टाळायचे असेल तर आपल्याला कानात बोळे घालून बसावे लागेल. असे करणे शक्य आहे का ? . हे सर्व वाईट ऐकून आपले मन अशांत होते. चीड चीड होते. वाईट विचार मनात यायला सुरवात होते. हे जर आपल्या बाबतीत होवू  शकते तर लहान मुलांच्या बाबतीत काय  होत असेल, वरील सर्व वाईट गोष्टीं ऐकून  त्यांच्या मनःपटलावर काय परिणाम होत असेल. या सगळ्या नकारात्मक गोष्टी ऐकून मुले त्याचे अनुकरण करतात  तर यावर एकच उपाय म्हणजे चांगले ऐका. चांगले संगीत ऐका, चांगली गीते ऐका, नाट्य संगीत ऐका. आपण स्वतः किंवा आपल्या मुलांनी  गीतरामायण ऐकले आहे का?  नसेल तर ऐका व ऐकवा. समज असणा-या पाल्याला आपल्या गावात  होणा-या  वेगवेगळ्या विषयावरील बौद्धिक  व्याख्याने  ,  धार्मिक प्रवचने, कविसंमेलने  यांना घेवून जा. मनाचे श्लोक , रामरक्षा, शुभंकरोती, आरत्या, पोवाडे, देशभक्तीपर गीते  हे लहान मुलांना ऐकवा. युटयूबवरून  शिवखेरा , अब्दुल कलाम, संदीप महेश्वरी, सिस्टर शिवानी, विश्वास नांगरे  पाटील, अविनाश धर्माधिकारी या सारख्यांची  व्याख्याने , त्या त्या क्षेत्रातील नामवंतांच्या मुलाखती जसे कि अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अटल बिहारी वाजपेयी, किरण बेदी, नारायण मूर्ती  इत्यादी  तरुणांनी आवर्जून ऐकल्या  पाहिजेत. 'चांगला कान तयार करणे' हे फक्त आणि फक्त आपल्याच  हातात आहे.

चांगले वाचा - कोणीतरी म्हटले आहे 'वाचाल  तर  वाचाल'. पण आपण काय वाचतो हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. रोजच्या वर्तमानपत्रातील खून, दरोडे, घोटाळे, बलात्कार, अपघात यावरील बातम्या वाचून आपण तरून जावू शकू  का? तर याचे उत्तर आहे कदापि नाही. आपल्या जीवनाला दिशा द्यावयाची असेल तर चांगले वाचणे गरजेचे आहे. श्रीमानयोगी, मृत्युन्जय, छावा, माझी जन्मठेप, अग्नीपंख, ययाती, मन में है  विश्व्वास, येथे थांबणे नाही या सारख्या कादंबर-या नक्कीच आपल्याला वाड्मयीन  सौन्दर्य, प्रेरणा, दिशा देतील. तसेच लहान मुलांना दैनंदिन वर्तमान पत्रातून येणा-या बोध पर कथा, प्रेरणा देणारे लेख, विज्ञानावरील लेख व तंत्रज्ञानावरील लेख आवर्जून वाचण्यास सांगणे गरजेचे आहे की  ज्यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडू शकेल व त्याच्या विचाराच्या कक्षा रूंदावतील. दर्जेदार लेखन काय असते  हे एकदा लक्षात आले कि आपण  आलतूफालतू वाचण्यात आपला बहुमोल वेळ वाया घालवणार नाहीत.

तर आजच्या काळात चांगले पहाणे, चांगले ऐकणे, चांगले वाचणे आवश्यक झालेले आहे. त्यासाठी आवर्जून वेळ देणे गरजेचे आहे तरच वाईटापासून आपली सुटका होवू शकेल. तर असे चांगले पाहीलेले, ऐकलेले  आणि  वाचलेले अनुभव आपण इतरांना देखील सांगणे आवश्यक आहे. यावर आपसात चर्चा करणे गरजेचे आहे तरच एक सुदृढ समाज घडू शकेल व असा सुदृढ समाज घडविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे.  मुलांना भरकटू द्यावयाचे नसेल, संस्कारक्षम करावयाचे असेल तर चांगले पहाणारा, चांगले ऐकणारा, चांगले वाचणारा पाल्य तयार करणे हे प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे. आणि असा तयार झालेला पाल्य पुढील काळात एक उत्तम नागरीक बनू शकेल.  चांगले पाहिलेला, ऐकलेला,  वाचलेला व्यक्ती वाईट बोलू कसा शकेल? तो उत्तमच बोलेल उत्तमच  वागेल त्याचे विचारही  उत्तमच  असतील. विचारांचा पाया उत्तम असलेला व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेवू शकेल त्यास  यशाचा मार्ग गवसेल.  पण सुरवात आपल्याला आपल्यापासून करावी लागणार आहे . कारण पालकांचे छंद काय आहेत, ते काय पाहतात, काय ऐकतात, काय वाचतात याचे अनुकरण हा  पाल्य करीत असतो.   चला तर मग नवीन  एक संकल्प करूया चांगलं पाहूया, चागलं ऐकुया, चांगलं वाचूया तेही आवर्जुन . 

© महेश भा.रायखेलकर

Comments

Popular posts from this blog