जीवनात गाण्याचा प्रवेश नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही. लहानपणी म्हणले जाणारे 'शुभंकरोती', 'बडबडगीते' शाळेत म्हटले जाणारे 'राष्ट्रगीत', घरात पूजेच्या वेळेस म्हटल्या जाणा-या 'आरत्या' येथूनच गाण्याचा जीवनात प्रवेश झाला असेल असे मला वाटते . यातील काहीना रूढ अर्थाने गाणं म्हटल जात नसले तरी माझ्या दृष्टीने जे सुरात म्हटल जातं व जे चांगलं आहे ते प्रत्येक काव्य म्हणजे गाणं. रविवारी रेडिओवरील बालगीतांचा कार्यक्रम ऐकताना धमाल यायची. तसेच रेडिओवरील 'बिनाका- गीतमालेने' चित्रपट गाण्याशी चांगली गट्टी जमली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहानपणी या कार्यक्रमाची आम्ही भावंडे आतुरतेने वाट पाहत असायचो . या कार्यक्रमासाठी अमीन सयानींचे असलेले अप्रतिम निवेदन हि एक आनंदाची पर्वणी होती. आईला गाण्याची फार आवड होती व मोठ्या भावालाही ती आहे (महंमद रफी हा त्याचा आवडता गायक) . तो अनेक कार्यक्रमात गायला देखील आहे . बहुतेक या दोघांकडून गाण्याच्या गोडीचा वारसा माझ्यात आला असे मला वाटते. मी ७ वी किंवा ८ वीत असतांना टेलिव्हिजनची सुरवात झाली. आमच्या घरीं जरी टीव्ही नसला तरी शेजा-र्यांकडे कमीत कंमीत 'चित्रहार' पाहण्यासाठी तरी मी जात असे. नंतर घरी टीव्ही आल्यानंतर 'रंगोली' व 'चित्रहार' आम्ही कुटूंबीय आवडीने पाहत असूंत. परंतु हि सर्व चित्रपट गीते होती. शालेय जीवनात काही देशभक्तीपर गीतांचा सराव आमच्याकडून करून घेतला जात असल्याच पुसटसं मला आठवतंय. या काळात चित्रपट गीते व काही देशभक्तीपर गीता व्यतिरिक्त इतर गाण्यांचा तसा माझा फारसा संबंध आला नाही. याच दरम्यान टेपरेकॉर्डर घरी आला. तो टेपरेकॉर्डर आज नादुरुस्त असला तरी त्या काळाची आठवण म्हणून आजही आम्ही तो जपून ठेवला आहे. टेपरेकॉर्डर सोबत 'गीतरामायणाच्या' कॅसेट देखील आल्या होत्या. इतर गाण्यांची आवड मला 'गीतरामायणातून' झाली. मला अजूनही आठवतंय रामनवमीच्या दिवशी दिवसभर आम्ही हे 'गीत रामायण' कॅसेट लावून ऐकत असु. माझी आजी 'राजुससयज्ञ'(महाभारतावरील एक गीत) फार चांगले म्हणायची तिच्या कडून कित्येकदा मी हे गीत ऐकले आहे. तसेच माझी मावशी "कर्ण हा पांडव रे पहिला" हे गाणं खुप सुंदर म्हणते तिच्याकडूनही हे गाणं मी पुष्कळदा ऐकले आहे . आजोळी होणा-या भागवत सप्ताहातील आरत्या, भजन , घरातील सणासुदीला म्हटल्या जाणा-या आरत्या व नवरात्रात नऊ दिवसाचे महती सांगणारी देवीची रोज म्हटली जाणारी आरती, गणपती व लक्ष्मीच्या काळात त्या त्या म्हटल्या जाणा-या आरत्या यातून भक्ती गीतांची आवड जोपासली गेली.तसेच कौटूंबीक लग्नसभारंभात व इतर कार्क्रमाच्यावेळी गाण्याच्या भेंड्या आम्ही चढाओढीने खेळत असु. त्याची गंमत काही औरच होती.
कॉलेज जीवनात त्या काळात गाजलेल्या चित्रपटाची कॅसेट विकत घेवून ती दिवसभर मोठ्या आवाजात ऐकत बसने हा एक आवडीचा कार्यक्रम होता. तसेच आपल्या आवडीच्या गाण्याची यादी करून ती गाणी रिकाम्या कॅसेट वर भरून घेणे हे एक आनंददायी कार्य होते. त्याकाळात तर कित्येक दिवस, रात्री आवडीची कॅसेट लावूनच गाणी ऐकत मी झोपत असे. याच काळात अरुण दातेंच्या भाव गीतांनी मला मोहिनी घातली. तसेच त्या काळात गाजलेली " मैने प्यार किया", "दिल", "तेजाब", राम-लखन" मिस्टर इंडिया", "रोजा", "नमक हलाल" , "शराबी" , "चांदणी" इत्यादि व नंतरच्या काळातील ' ताल', "दिल वाले दुलहनिया ले जायेंगे", "डर", "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है" "हम दिल दे चुके सनम", "हम आपके है कौन" इत्यादि चित्रपटातील गीतांनी मनाला भुरळ घातली हि गाणी ऐकणे व गुणगुणणे हा एक आवडीचा विषय बनला. आईला जुन्या गाण्याची आवड असल्याने राजकपूर, राजेंद्रकुमार, शशीकपूर, राजेश खन्ना, शम्मीकपूर इत्यादि कलाकारांनी अभिनय केलेले चित्रपटांची गाणी देखील ऐकण्याची गोडी निर्माण झाली. "बॉबी", "संगम", "मेरा नाम जोकर", "आराधना", "तिसरी मंझिल", "जंगली", "अभिमान", "गाईड", "शोले", "शर्मिली", :"कटी पतंग", श्री ४२०, या काही जुन्या चित्रपटातील गीते आजही मला तेवढीच आवडतात.अमिताभ तर आमचा दैवत त्याच्या चित्रपटातील गीते आमची जीव कि प्राण . याच काळात भीमसेन जोशी व अनुप जलोटा यांची भक्ती गीते, भजने देखील मी ऐकली व त्याचीहि आवड निर्माण झाली . टीव्हीवरील 'मेरी आवाज सुनो' हा देखील माझा आवडता कार्यक्रम होता.
वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद या शहराच्या ठिकाणी गाण्याच्या कार्यक्रमाला कधी जाण्याचा योग आला नाही. मात्र हा योग किंवा संधी म्हणा जेव्हा वडिलांची सोलापूरला बदली झाली व त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आम्ही सोलापुरातच जेव्हा स्थाईक झालो तेव्हा मोठ्या प्रमाणात लाभली . सोलापुरातच मला पंडित हृदयनाथ मंगेशकर, माझे आवडते गायक अरुण दाते, श्रीधर फडके, अजित कडकडे, उत्तरा केळकर, देवकी पंडित, शॉनक अभिषेकी, रवींद्र साठे, शंकर महादेवन, अजित परब , सुलोचना चव्हाण यांना ऐकणाचे भाग्य लाभले. 'गीतरामायण' जे की मी लहानपणी कितीतरी वेळा कॅसेट वरून ऐकले आहे त्यातील काही गाणी श्रीधर फडकेंच्या आवाजात सिद्वेश्वर मंदिराच्या भक्तीमय वातावरणात ऐकतांना विशेष आनंद वाटला . भावगीत सम्राट व माझे आवडते गायक अरुण दाते यांचा नावाजलेला 'शुक्रतारा' हा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकतांना मी फार सुखावून गेलो . सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा "आयुष्यावर बोलू काही" हा अलीकडील काळातील आवडलेला अप्रतिम कार्यक्रम ज्या कार्यक्रमास मी आई- वडिलांना आवर्जून घेवून गेलो होतो . तसेच सोलापुरातील प्रसिद्ध गायक 'क्षितिज' चे गिरीष पंचवाडकर, नंदा परचुरे जोशी, विद्या लिमये, प्रशांत देशपांडे यांना ऐकण्याची संधी मला मिळाली. क्षितिजच्या अनेक कार्यक्रमाला मी हजेरी लावलेली आहे . अरुण दाते व सुधीर फडके हे माझे आवडीचे भावगीत गायक. गिरीष पंचवाडकर यांचा आवाज सुधीर फडकेच्या आवाजाशी मिळता जुळता असल्याने त्यांच्या कार्यक्रमाशी माझे विशेष ममत्व होते. दिवाळीमध्ये होण्या-या व दिवाळीचा आनंद द्विगुणित करणा-या 'पहाटगाणी' या कार्यक्रमाला देखील मी आवर्जून जातो . शहरात गाण्याचा कार्यक्रम असेल तर शक्यतो मी तो चुकवीत नाही. अलीकडेच 'शिवरंजनी' च्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित होतो. या सर्वांमुळे ऐक ऐकणाचा चांगला कान तयार झाला. सोलापुरातच मी संघाशी जोडला गेलो. संघ स्थानावर व संघाच्या उत्सवांमधून अनेक राष्ट्रभावना तेजवणारी संघगीते (पद्य) मी ऐकली व समूहामध्ये गायली. संघगीते(पद्य) हा आम्हा संघस्वसेवकासाठी एक जीव्हाळ्याचा विषय. नुकताच पार पडलेला 'संघ गीतांचा' कार्यक्रम मनाला फार आनंद देऊन गेला.
गाणी ऐकणे व ती घरातल्या घरात म्हणणे हा एक दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे .घरात किंवा मित्रमंडळी मध्ये गाणी अनेकदा गायली . प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर गाण्याची संधी मला लोकमत आयॊजीत सूर रायझिंग स्टार च्या ऑडिशनच्या वेळॆस पहिल्यादा मिळाली. यात माझ्या आवडीचे "सखी मंद झाल्या तारका" हे गीत मी सादर केले. याही वर्षी याच कार्यक्रमात मी दुस-यादा गायलो व गीत-रामायणातील "पराधीन आहे जगती" हे गीत म्हटले . गेल्या वर्षी कॉलनीतील गणपती उत्सवामध्ये "शूर आम्ही सरदार" हे गीत मी सादर केले. आद्यापर्यंत मी प्रेक्षकांसमोर फार कमी वेळेसच माझे गाणे मी सादर केले आहे . नवोदित किंवा हौशी गायकांना सोलापुरात तसे व्यासपीठ उपलब्ध नाही हि एक माझी खंत आहे. भविष्यात नक्की यावर मी काम करेल. सध्या सुट्टीच्या दिवशी गाणे गाणे व ते मोबाइलवर रेकॉर्ड करणे हा एक आवडीचा कार्यक्रम झाला आहे. जेव्हा कधी प्रेक्षकांसमोर गाणे गाण्याची संधी मिळेल तेव्हा ती साधायची हे मी मनाशी पक्के ठरवले आहे.
. व्यावसायीक व प्रापंचिक व्यस्तते मुळे नवीन सिनेमे पाहणे आता जास्त होत नाही व त्यामुळे नवीन चित्रपटगीतांचा तसा फारसा परिचय झालेला नाही. मुलगा कोठूनतरी ती ऐकतो व गातो एवढाच काय तो नवीन गाण्याशी माझा संबंध. तेव्हा त्यावर मतप्रदर्शन करणे हे धाडसाचे ठरू शकेल. अलीकडील "सैराट" सिनेमातील गाणी मात्र मनाला झिंगाट करून गेली. मुलासोबत गाणाच्या भेंड्या खेळतांना मजा येते. यातून पुढच्या पिढीकडे गाणं जात आहे.
माझी सकाळची सुरवातच गाण्याने होते. मॉर्निंग वॉक करतांना मोबाईल वरून गाणी ऐकणे याचा आनंद काही औरच. मध्ये विश्रातीच्या काळात काही नाट्य गीते जी कि मी पहिलेही कधी ऐकली होती परंतु मूळ गायकाच्या आवाजात युट्युब वरून परत ऐकली, जसे कि " हे सुरांनो चंद्र व्हा " काटा रुते कुणाला " "सुरत पिया कि" तेव्हा मी या गीतांच्या प्रेमातच पडलो. मुकेशची दर्दभरे गीत काळजाला भिडतात व त्यालाही माझी विशेष पसंदी आहे. चित्रपट गीत, भाव गीत, भक्ती गीत, नाट्य गीत, देशभक्तीपर गीत व संघ गीत ऐकून व संधी मिळेल तशी ती गाऊन मी समृद्ध झालो. तशी तर या सर्व प्रकारातील अनेक गाणी आवडीची आहेत तरी चित्रपट गीता पैकी " तेरे चेहरे मे ओ जादू है" , भाव गीतांपैकी "सखी मंद झाल्या तारका" , भक्ती गीतांपैकी " ओंकार स्वरूपा", नाट्य गीता पैकी "हे सुरांनो चंद्र व्हा", देशभक्तीपर गीता पैकी " कर चले हम फिदा " , संघ गीता पैकी " सेवा है यज्ञकुंड " हि माझी विशेष आवडीची गाणी. बायकोलाही गाण्याची आवड आहे. आवडीची गाणी टीव्हीवर पाहणे, रेडिओवर ऐकणे व गुणगुणणे हा तिचा आवडता छंद . अनेक वेळेस आमची गाण्यावर चर्चा होत असते. बायको व मुलगा हि माझी गाणी ऐकणारी घरातील हक्काचे प्रेक्षक आहेत. भावाला गाण्याची आवड असल्याचे मी वर नमूद केलेच आहे तसेच वहींनाही गाण्याची आवड असून त्यांनी गाणाच्या काही परीक्षाही उत्तीर्ण केल्या आहेत. भावाच्या दोन्ही मुलांना गाण्याची आवड आहे. त्याचा लहान मुलगा चि. अथर्व चांगली गिटार वाजवतो. यावरून " संपूर्ण कुटूंब रंगलंय गाण्यात " असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
शात्रोक्त गाणे शिकायची खूप दिवसाची इच्छा आहे. बघूया तो योग कधी येतो ते ?. दिवसभराच्या व्यस्तते मध्ये ते काम जरा अवघडच आहे असे मला वाटते. तसेच येत्या काळामध्ये मी स्वतः लिहलेले एक गीत स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करण्याचा माझा मानस आहे.
गाण्याने जगण्याला एक चांगला सूर मिळाला .निराशेचे मळभ दूर करण्याची ताकद गाण्यात आहे असे मी मानतो . ज्या गाण्याचे बोल ह्रदयात उतरतात व संगीत मनाला भिडते ती गाणी सर्वश्रेष्ट असे माझे वैयत्तिक मत आहे. शीण दूर करून मनाला तरतरी देणे हे गाणे ऐकून व गाऊन शक्य होते हा माझा स्वानुभव आहे . मी कधीतरी असा विचार करतो, आपल्या जीवनामध्ये गाणे नसले असते तर काय झाले असते ? . उत्तर येते ... जगणे बेचव व बेसूर झाले असते. असे बेचव व बेसूर जगणे कोणाला आवडेल ? नाही का !!!!
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment