माझा छंद  माझा आनंद 


     आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात छंद म्हणजे रणरणत्या वाळ वंटातील हिरवळच होय. छंद निराश  मनाला उभारी देण्याचे काम करतो व तसेच जगण्याची एक नवीन  उमेद वाढविण्याचे काम करीत असतो.प्रत्येक व्यक्तीने एखादातरी छंद जोपासावा.कितीही व्यस्त जीवन असेल तरीही छंदासाठी जाणीवपूर्वक वेळ  काढावा असे माझे प्रामाणिक मत आहे. 
वाचन करणे, जुनी गाणी ऐकणे व म्हणणे , सांस्कॄतीक कार्यक्रमाला आर्वजुन हजेरी लावणे, चांगले सिनेमे पाहणे, कविता करणे, लिखाण करणे  असे काही माझे आवडीचे छंद आहेत.  हे सर्व छंद माझ्या जीवनात आनंद देण्याचे काम करतात व यात माझे मन रमून जाते.  या छंदापैकी सर्वांत आवडता व माझ्या अगदी जवळचा छंद म्हणजे कविता करणे हा होय.  हा छंद मागील ब-याच   वर्षापासून मी आवडीने जोपासला आहे. 
         कित्येक वर्षापासून काही तरी लिहावे असे सतत मला वाटायचे.  पण काय?  हे मात्र सुचत नव्हते. एकदा एक ‘जसे पेराल तसेच उगवेल’ नावाची  कविता लिहली व ती आर्इ वडील, माझा मुलगा  व पत्नीला वाचून दाखविली.  त्यांना ती खूप आवडली.  त्याच काळात मी फेसबुक या सोशल मिडीयावर देखील सक्रीय होतो.  संगणकीय कामामुळे हाताने लिहण्याची सवय मोडली व त्यामुळे अक्षर खराब झाल्याने  तेव्हा ही कविता हाताने लिहून ती स्कॅन  करून फेसबुकवर पोस्ट करणे शक्य नव्हते.  फेसबुकवर मराठीमध्ये कसे टार्इप करावयाचे हे मला त्या काळात माहित नव्ह्ते.  मी संगणक क्षेत्रातीलच असल्याकारणे या बद्द्ल कोणाला विचारणे म्हणजेच आपल्या अज्ञानाचे जाहीर प्रकटीकरण करणे होय.  त्यामुळे  कविता तर तयार होती पण ती प्रसिध्द करणे शक्य नव्हते. 
        याच दरम्यान दीर्घ आजारामूळे  माझ्या आर्इचे दु:खद निधन झाले.  आर्इ माझ्या फार जवळ  होती.  तो काळ  माझ्यासाठी फार कठीण होता.  आमच्या भावंडात मी लहान असल्याकारणाने आर्इचा लाडका होतो व सर्व भावंडात मलाच तिचा जास्त सहवास लाभला होता.  तीची उणीव मला सतत जाणवत होती.  मन दु:खी व उदास होते.  या दु:खावर फुंकर म्हणजे कविता.  या दरम्यान मी माझ्या आर्इबद्द्लच्या असलेल्या माझ्या भावना कवितेतून प्रकट केल्या.  यानंतर अनेक कविता लिहीत गेलो. फेसबुकवर मराठीत कसे लिहावयाचे याचे कोडे देखील मी सोडवले होते.  साधारणत: आठवडयातून एक कविता मी फेसबुकवर पोस्ट करत होतो.  आर्इच्या दु:खातून सावरण्याचे काम कवितेने केले होते. काही कविता वर्तमानपत्र व मासिकातून देखील पसिध्द झाल्या.  फेसबुकवर देखील कविता आवडल्याच्या प्रतिकिया येवू लागल्या व त्यामूळे  माझा उत्साह वाढला व मी लिहीत गेलो. 

       आजपर्यंत  कविता, हायकू कविता, कथा, पुस्तक परीचय  तसेच लेख  एवढयाची निर्मिती माझ्याकडून झाली आहे.  कविता व कथा स्पर्धेत सहभाग देखील घेतला आहे. अनेक कवी संमेलनातून कवितेचे सादरीकरण केले आहे.  कवितेतून सामाजिक प्रश्नाला जसे की आत्महत्या, सेल्फी चे व्यसन, वॄध्दाश्रम, मुलींचा घटता जन्मदर ,वाहतूकीचे नियम ,स्त्रीयांचे प्रश्न  याला  वाचा फोडली आहे.  तसेच माझा मुलगा चि.  पार्थ १०  वर्षाचा असल्याने त्याच्यावर केलेल्या कवितेतून लहान मुलांचे भावविश्व टिपले आहे.  कर्ण, शिवाजी महाराज, अब्दूल कलाम  अशा थोर व्यक्तींचे व्यक्तीमत्व कवितेतून चितारण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तसेच दिवाळी , गुरूपौर्णिमा ,गणेश उत्सव, महाराष्ट् दिन, महिला दिन असे सण व उत्सव कवितेतून साकारले आहेत.  त्या त्या प्रसंगानुसार म्हणजेच दुष्काळ , निसर्गकोप ,अरूणा, नोटबंदी  अश्या कविता करून त्यात त्या प्रसंगाचे वर्णन केलेले आहे.  माझा संसार, तेव्हा मी आता मी, माझे प्रेम ,अशा काहि हास्य कविता देखील केलेल्या आहेत. कवितेतून वडील, मित्र, बायको, बहीण असे नातेसंबंध उलगडले आहेत. 

          माझा मुलगा चि. पार्थच्या व्रतबंध कार्यक्रमात केलेल्या रूखवतात त्याच्यावर मी केलेली कविता ‘बंंम्प्या’ ही ठेवली होती.  ती वाचून अनेकांनी माझ्या या कवितेचे कौतूक केले त्याचा आनंद काही औरच आहे. जेव्हा मुलगा त्याच्यावर केलेल्या कविता वाचतो तेव्हा त्याच्या   चेह-यावरील हास्य व निरागस भाव पाहण्यासारखे असतात व हे भाव वडील म्हणून मला खूप काही देवून जातात.  तसेच एका   रक्षाबंधनाला ‘माझी बहीण बहीण’ ही कविता लिहून बहिणीस सप्रेम भेट म्हणून दिली तेव्हा तिच्या चेह-यावरील आनंदाची किंमत कशातही मोजता येणार नाही. माझ्या प्रिय पत्नीच्या एका  वाढदिवसाला मी तिच्यावर केलेल्या कवितेची फ्रेम भेट म्हणून दिली की ज्यात माझ्या तिच्याविषयीच्या असलेल्या भावनाचे प्रकटीकरण मी केलेले आहे, ही तिच्यासाठी एक अनोखी भेट होती. ही कविता देखील सर्वांना खूप आवडली.  माझी पत्नी व मेव्हणी हया दोन्हीही नोकरी करणा-या आहेत व दो्घींनाही लहान मूले आहेत. यांना डोळयासमोर ठेवून ‘नोकरी करणारी आर्इ ‘ ही कविता लिहली.  ही कविता वाचतांना माझ्या पत्नीच्या डोळयात पाणी आले तेव्हा कवितेतून एखादयाच्या अंत:करणाला आपण हात घालू शकतो याची जाणीव मला पहील्यांदाच झाली. 
         आर्इचा आशिर्वाद व सरस्वतीचा माझ्यावर असलेला वरदहस्त असल्याने मी लिहू  शकतो असे मला येथे नमूद करावेसे वाटते.  हे सर्व मी लिहीत नसून माझ्याकडून कोणीतरी लिहून घेत आहे असे मला सतत आंतरीक वाटत असते.  माझ्या या लेखनास माझी पत्नी ,मुलगा, माझे वडील बंधू व मोठी बहीण व तसेच  माझे मित्र  यांचे सतत प्रेात्साहन मिळत असते.  माझ्या लिखाणातून ,कवितेतून वाचकास थोडाजरी विरंगूळा , आनंद मिळाला तर माझ्या लेखनाचे सार्थक झाले असे मी समजतो.  कवितेतून नुसते सामाजिक प्रश्न न मांडता लहान प्रमाणात का होर्इना  काही सामाजिक कार्य करण्याचा माझा प्रयत्न असतो. 
कवितेने, लेखनाने  माझे भावविश्व समॄध्द केले.  मनाची मशागत केली.  आयुष्याकडे बघण्याचा एक नविन दॄष्टीकोन दिला.  जाणिवा सजग झाल्या.  सभोवतालचे निरीक्षण करण्याची क्षमता वाढली.  सामाजिक बांधिलकी वाढीस लागली.  स्वत:ला व्यक्त होण्याचे माध्यम कवितेतून, लेखनातून  मिळाले व त्यामूळे  मनाचा निचरा होण्यास मदत झाली.  कवितेचा जन्म होत असतांना प्रसव अधिरता काय असते हे  देखील मी अनुभवले.  कवितेचा जन्म झाल्यानंतर आर्इ जशी आपल्या जन्मलेल्या मुलाला पु्न्हा पुन्हा कुतुहलाने न्याहाळतेे व तिला जो आनंद व समाधान मिळते तोच आनंद व समाधान  कवितेच्या निर्मीतेतुन मी अनुभवला. 
माझा हा कविता व  लिखाणाचा आनंदाचा प्रवास भविष्यात देखील असाच चालू राहील.  नव निर्मीतीचा सुगंध माझ्या जीवनात दरवळत राहील अशी आशा  मी व्यक्त करतो.कवितेने, लेखनाने  मला श्रीमंत केले, ही श्रीमंती अशीच टिकून रहावी व यापूढेदेखील माझ्याहातून माता सरस्वतीची सेवा घडावी अशी प्रार्थना  मी तिच्या चरणी व्यक्त  करतो !!!

© महेश भा. रायखेलकर 
    

Comments

Popular posts from this blog