"सोलापूरची खाद्यसंस्कृती" चवीचे खाणार त्याला सोलापुरात सर्वकाही मिळणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. किती विविध पदार्थ सोलापुरात मिळतात नुसती उजळणी जरी केली तरी तोंडाला पाणी सुटेल. मी मुळचा सोलापूरचा नाही पण मागील २० - २५ वर्षांपासून सोलापुरात राहतो आहे व आजपर्यंत जे काही घरचे सोडून सोलापुरात बाहेर खाल्ले आहे त्याच्या अनुभवावरून हे लिहले आहे . एखादे सोलापुरात ठिकाण किंवा पदार्ध असेल तो मी चाखला नसेल तर त्याचा उल्लेख येथे आलेला नाही. तेव्हा कृपया कोणताही गैरसमज नको. 'डिस्को भजी' हा भज्याचा प्रकार सोलापुरातच मी पहिल्यांदा खाल्ला . केलेली मिर्ची भजी कापून पुन्हा एकदा तेलात तळून कडक केली जातात. त्यासोबत शेंगा चटणी आणि कढी व बारीक कांदा दिला जातो हे सर्व एकदम अप्रतिम . बहुतेक सर्व भज्यांच्या गाड्यावर हा डिस्को भजी प्रकार मिळतोच. सोलापूरची शेंगाची चटणी आणि कडक भाकरी ही फक्त सोलापुरात नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहे. परदेशातही ही निर्यात केली जाते. सोलापूरचे 'नसले बंधू' यासाठी प्रसिद्ध आहेत. काही बचत गटा मार्फत देखील कडक भाकरी बनवली जाते. यातून म...