कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं
कोरोना एक जागतिक महामारी. जगावर आलेले अकस्मात संकट. आजपर्यंत अनेकजण या आजारातून बरी झाली, काहींचे दुर्देवी मृत्यू झाले व काहीजण आजही यावर उपचार घेत आहेत. या कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं. या महामारीवर जालीम उपाय म्हणून लॉकडाऊन केला गेला तोहि तब्बल दोन ते अडीच महिने. या काळात सर्वजण घरीच होते. या काळात आपल्याला घराचं महत्व जास्त चांगल्या प्रकारे कळालं. घरातील माणसांना वेळ देण्याचे महत्व याच काळाने आपल्याला शिकवलं. घरातील बायकांना विशेषतः आपल्या पत्नीला दिवसभर किती काम असते हे प्रत्येकाने जवळून अनुभवलं. घरकाम हे फक्त बायकांचेच काम आहे हा गैरसमज काही पुरुष मंडळींनी घरकामात हातभार लावून मोडला. हा हातभार पुढे देखील जमेल तसा लावण्यास कोणतीही हरकत नाही. पैसा साठविण्याचे महत्व कळाले. कारण असा साठविलेला पैसाच आपल्याला या संकटात मदतीला आला. घरी कामाला येणा-या नोकर चाकाराचे महत्व त्याचे श्रम लक्षात आले. स्वालंबनाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
सर्व बंद होते तरी या काळात पोलीस यंत्रणा, मेडिकल यंत्रणा, सफाई यंत्रणा, जीवनावश्यक वस्तू पुरवणारी यंत्रणा, बँका, प्रसार यंत्रणा, मनोरंजन यंत्रणा, महानगरपालीका व इतर शासकीय यंत्रणा यांनी आपल्याला जोखीम स्वीकारून आपआपली सेवा दिली त्यामुळेच हा लोकडाऊन चा काळ देखील आपल्याला सुसह्य गेला यांचे आपल्या जीवनातील महत्व चांगल्या प्रकारे समजले.
शेतकरी जो आपला अन्नदाता आहे तो शेतात खपतो म्हणून आपल्याला चार खास सुखाने खायला मिळतात त्याच्या श्रमाची किंमत चांगल्या प्रकारे आम्हाला या काळाने शिकविली. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना कोरोनाचा धोका कमी आहे तेव्हा उत्तम आरोग्याचे महत्व कोरोनाने आम्हाला शिकवले जे कि आम्ही रोजच्या धावपळीत कोठेतरी विसरत चाललो आहोत. या काळात जमेल तशी गरिबांना, समाजातील वंचित घटकांना मोठ्या प्रमाणात्त मदत केली गेली तेव्हा संकट काळात माणूसच माणसाच्या कामी येतो हि शिकवण याच काळाने दिली. याच काळात काहींनी आपल्या विसरणीत गेलेल्या छंदाची परत उजळणी केली त्याचा आनंद काही वेगळाच व त्यामुळे या संकटाचा तणाव देखील काहीसा यामुळे कमी झाला. तेव्हा जीवनात छंदाचे महत्व व निरोगी मनाला त्याची आवश्यकता याची शिकवण याच काळाने दिली.
सर्वजण घरीच असल्याकारणाने प्रदूषण कमी झाले. आपण आपल्या वागण्याने निसर्गाची किती हानी करत आहोत हे माणसाच्या चांगलेच लक्षात आले. यातुन आपण काही शिकलो आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दिशेने काही पावलं उचलली तर हे याच संकटाचे फलित असे म्हणावे लागेल. याच संकटामुळे परत एकदा स्वच्छतेचे महत्व अधोरेखित झाले. याच कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेतील काही त्रुटी, उणीवा सरकारच्या लक्षात आल्या व त्या दिशेने कामाला सुरवात देखील झाली. हि यंत्रणा मजुबत झाली तर हे याच संकटाचे फलित असेल. कोरोनाने आमची जीवनशैली बदलली. हि जीवनशैली अंगीकारण्यासाठी एक मनाची कणखरता लागते ती आज आपण आत्मसात करत आहोत. हि मानसिक कणखरता आपल्याला पुढे देखील उपयोगी पडणारा आहे.
कोरोनामुळे पर प्रातांत गेलेले कामगार आपल्या गावी आले तेव्हा स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याची शिकवण याचमुळे मिळाली. कोरोनामुळे व्यवसाय, नोकरी याचे स्वरूप बदलेले. या बदलास आपल्याला जिद्द, परिश्रम, कल्पकता याचा आधार घेवून पुढे जावे लागेल.
खरंतर संकट हे कोणालाच नको असत. बरं ते सांगूनही येत नाही. तसेच या कोरोना संकटाचे आहे. काही दिवस तरी आपल्याला या कोरोनासोबतच राहावे लागणार आहे. तेव्हा आपल्या शाररीक, बौद्धिक, मानसिक क्षमतेचा कस लागणार आहे. तावूनसुलाखून निघालेले हेच खरे सोने व त्याची चकाकी काही औरच असते. तेव्हा या कोरोनाच्या संकटातून आपण देश, समाज व व्यक्ती म्हणून असेच तावूनसुलाखून बाहेर पडू व सोन्याप्रमाणेच आपण देश, समाज व व्यक्तिगत पातळीवर उजळून निघू अशी आशा करूया .
@ महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment