लोक काय म्हणतील ? 


लोक काय म्हणतील म्हणून
कधी खळखळून  हसलो नाही
लोक काय म्हणतील म्हणून
दुःखातही मनमोकळे रडलो   नाही !

लोक काय म्हणतील म्हणून
 कधी  कोणाच्या प्रेमात पडलो नाही
लोक काय म्हणतील म्हणून
कधी कडकडून कोणाशी  भांडलोही नाही !

लोक काय म्हणतील म्हणून
बेधूंद होवून नाचलो नाही
लोक काय म्हणतील म्हणून
कधी एखादं गाणं गायलो नाही !

लोक काय म्हणतील म्हणून
 पावसात ओलेचिंब होवून भिजलो नाही
लोक काय म्हणतील म्हणून
मुलांसोबत  कधी दंगामस्ती करत  खेळलो नाही !

लोक काय म्हणतील म्हणून
एखादया छंदात गुंतलो नाही
लोक काय म्हणतील म्हणून
कधी कोणत्या फंदातही पडलो नाही !

लोक काय म्हणतील म्हणून
वेडे धाडस कधी केले नाही
लोक काय म्हणतील म्हणून
कधी कोणते साहस  केले नाही !

लोक काय म्हणतील म्हणून
कधी फॅशन केली नाही
लोक काय म्हणतील म्हणून
कधी  जास्त पैसे खर्च केले   नाहीत !

लोक काय म्हणतील म्हणून
कधी कसली हौस केली नाही
लोक काय म्हणतील म्हणून
कोणतीही मौज केली नाही !


लोक काय म्हणतील म्हणून
कधी मनाचे   ऐकलेच  नाही
लोक काय म्हणतील म्हणून
खरंतर मनासारखे   जगलोच नाही !
मनासारखे  जगलोच नाही !!

© महेश भा. रायखेलकर




Comments

Popular posts from this blog