गाणं अन् मी जीवनात गाण्याचा प्रवेश नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही. लहानपणी म्हणले जाणारे 'शुभंकरोती', 'बडबडगीते' शाळेत म्हटले जाणारे 'राष्ट्रगीत', घरात पूजेच्या वेळेस म्हटल्या जाणा-या 'आरत्या' येथूनच गाण्याचा जीवनात प्रवेश झाला असेल असे मला वाटते . यातील काहीना रूढ अर्थाने गाणं म्हटल जात नसले तरी माझ्या दृष्टीने जे सुरात म्हटल जातं व जे चांगलं आहे ते प्रत्येक काव्य म्हणजे गाणं. रविवारी रेडिओवरील बालगीतांचा कार्यक्रम ऐकताना धमाल यायची. तसेच रेडिओवरील 'बिनाका- गीतमालेने' चित्रपट गाण्याशी चांगली गट्टी जमली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहानपणी या कार्यक्रमाची आम्ही भावंडे आतुरतेने वाट पाहत असायचो . या कार्यक्रमासाठी अमीन सयानींचे असलेले अप्रतिम निवेदन हि एक आनंदाची पर्वणी होती. आईला गाण्याची फार आवड होती व मोठ्या भावालाही ती आहे (महंमद रफी हा त्याचा आवडता गायक) . तो अनेक कार्यक्रमात गायला देखील आहे . बहुतेक या दोघां...