पुढारी


मी  या गावचा पुढारी
नका दाखवु मला तुमची हुषारी
मी करेल कोणताही चमत्कार
मला पाहूनी घाला तुम्ही नमस्कार !

नका पुसू मला  शिक्षण-बिक्षण
नाही लागले त्यात माझे कधीच मन
मला नसे कोणतेही बंध
मुल्य-संस्कारांशी माझा काय संबंध !

मी घालतो कपडे व्हाईट
नजर आहे म्हंति माझी वाईट
मी म्हणे समाजाचे कल्याण करीन
असे केले तर मी उपासी मरीन !

मी म्हणेल ते केलेच पाहिजे
समाजाचे माझ्यावर अपेक्षांचे ओझे
पैशाचा आहे माझ्याकडे रतीब
त्यामुळे पटकावेल मी कोणताही किताब !

पाळतो मी नेहमीच गुंड
शमवेल मी कोणतेही बंड
जरी सुटला माझ्या पोटाचा नगारा
चहूकडे आहे माझा दरारा !

म्हणे मी करतो राजकारण
हे तर आहे माझे समाजकारण
नका घेऊ शंका तुम्ही विनाकारण
या मधून साधले मी अर्थकारण !

पाच वर्षात एकदा मागेल जोगवा
नका घेऊ नंतर तुम्ही माझा मागोवा
मी काय घेतलाय सगळ्यांचा मक्ता
फ्यामिली साठी  राबवतोय मी  सत्ता !

असलो जरी   मी गावचा पुढारी
आहे  एक  स्वप्न माझ्या ऊरी
घेईल एके  दिवशी उंच भरारी
होईल स्वागत माझे  दिल्ली दरबारी !
होईल स्वागत माझे  दिल्ली दरबारी !!

© महेश भा. रायखेलकर 



Comments

Popular posts from this blog