ना जमे 

तल्लीन होवूनी  ऐकतो गीतरामायण
रामा सारखा पुत्र बनणे ना जमे !

टिव्हीवर पाहतो महाभारत मालिका
कर्णा सारखा दाता होणे ना जमे !

गोकुळअष्टमीला फोडतो गगनचुंबी दहीहंडी
कृष्णा सारखा सखा होणे ना जमे !

जोमात साजरी करतो  शिवजयंती
शिवाजी सारखा राज्यकर्ता  बनणे ना जमे !

दहा दिवस साजरा करतो गणेश उत्सव
गणेशा सारखा ज्ञानी होणे ना जमे !

होळीपौर्णिमेला पेटवितो होळी
दुर्गुणांची होळी करणे ना जमे !

रंगपंचमीला उधळतो रंग
जीवनाला  रंग देणे ना जमे !

आनंदाने साजरी करतो दिवाळी
दुस-याच्या जीवनातील अंधार  दूर करणे ना जमे !

सोने लुटुनी दस-या दिवसी करतो सिमोल्लंघन
विचारांची चौकट मोडणे ना जमे !

नऊ दिवस करतो देवीची आराधना
दुर्जंनांचे निर्दालन करणे ना जमे !

पुरणपोळी खिलावुनि साजरा करतो बैलपोळा
प्राणी-मात्रा वर दया करणे ना जमे !

करतो व्रतवैकल्ये आणि उपासतापास
काम,क्रोध,मोह,मत्सर त्यागणे ना जमे !

वर्षभर साज-या करतो आदर्शांच्या जयंत्या
त्यांच्यातील एकही गुण घेणे ना जमे !

कर्मकांड उत्सवात गेलो इतके गुंतून
ते करण्यामागचा विचार करणे ना जमे !
ते करण्यामागचा विचार करणे ना जमे!!


© महेश भा. रायखेलकर








Comments

Popular posts from this blog