अरुणा


जीवनाचा झाला पाचोळा
शरीर झाले चोळामोळा
तरीही लढले शर्थीने
मरणाशी झुंजविले हिमतीने !

घेतला होता रुग्णसेवेचा वसा
गिधाडाने पंजा मारीला असा
क्षणात थिजले अवघे आयुष्य
अंधारमय झाले सारे भविष्य !

होते   स्वप्नात माझ्या सुंदर घर
राजाराणीचा गोड संसार
नियतीने घातला असा घाव
मोडला अर्ध्यावरीच सारा  डाव !

जरी मी असले अरुणा
सखींनी दाखवली करुणा
फेडु न शकणार त्यांचे उपकार
ज्यांनी केली देखभाल, उपचार!

जाते  वरच्या न्यायालयात
सांगते माझ्या आहे जे मनात
ऐक माझी एवढी एक  याचना
 नको  घडवुस  दुसरी अरुणा !
 नको  घडवुस  दुसरी अरुणा !!



© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog