स्वीट रिव्हेंज 

स्वीट रिव्हेंज म्हणजे गोड बदला. तुम्ही म्हणाल बदला आणि गोड तो कसा काय ?  कोणीतरी आपला जिव्हारी लागणारा अपमान करतो. आपण आतल्या आत ज्याने अपमान केला त्याबद्दल राग ठेऊन कित्येक दिवस  धुमसत असतो . या अपमानाचा कधी मी बदला घेईन असे आपल्याला झाले असते. पण हि धुमस ऊर्जा म्हणून वापरली तर ? स्वतःला इतके मोठे केले कि सारे जग आपली  स्तुती करण्यास बाध्य होईल. तुम्ही म्हणाल कसे ते ? आपल्याला खालील तीन  उदाहरणावरून समजेल. 

एकदा महात्मा गांधी आपल्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये फर्स्ट क्लासचे तिकिटाने रेल्वेने प्रवास करत होते .   त्या काळात रंगभेदामुळे काळ्या लोकांना फर्स्ट क्लासने प्रवास करण्यास मनाई होती. तेव्हा टीसीने त्यांना फर्स्ट क्लास मधून उतरण्यास सांगितले. गांधीजींनी आपल्या कडे फर्स्ट क्लासचे तिकीट आहे तेव्हा आपण उतरणार नाही असे टीसीस सांगितले. तेव्हा टीसीने त्यांचे काही न ऐकता केवळ वर्णभेदामुळे त्यांना धक्के मारत त्यांच्या सामानासहित खाली उतरविले. या अपमानाने गांधीजी व्यथित झाले. तेव्हा त्यांनी या वर्णभेदाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला आणि सत्याग्रहाचा मार्ग निवडला. पुढे याच सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी स्वातंत्र्य  चळवळीत ब्रिटिश राजवटीस सळो कि पळो करून सोडले व शेवटी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मोठा हातभार लावला . आज वर्णभेद जगातून हद्दपार झाला आहे त्यात गांधीजींचे मोठे योगदान आहे. म्हणजेच गांधीजींनी झालेला अपमान व्यक्तिगत न घेता त्याचा वापर समाजासाठी केला. 

दुसरा किस्सा आहे जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती श्री रतन टाटा यांच्या बाबतीतला . गोष्ट १९९८ ची आहे. रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची इंडिका कार लॉन्च केली होती.  रतन टाटा यांनी या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र एक केले होते.  मात्र काही कारणांमुळे त्यांना या प्रोजेक्टमध्ये यश मिळाले नाही. टाटा मोटर्सला मोठे  नुकसान सहन करावे  लागले . नुकसान भरपाई करण्यासाठी शेअरहोल्डर्सने कंपनीना विकण्याचा सल्ला दिला. रतन टाटा कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटरच्या मुख्य ऑफिसमध्ये गेले. त्यांच्यासोबत कंपनीचे शेअर होल्डर्सही होते. फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा यांची तीन तास मीटिंग चालली. यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांचा अपमान करत म्हटले की, ‘जर  व्यवसायाचं कोणतंही ज्ञान नव्हतं तर ही कार लॉन्च करण्यासाठी एवढा पैसा का गुंतवला? आम्ही तुमची  कंपनी विकत घेऊन तुमच्यावर  उपकार करत आहोत.’ कंपनी विकावी लागणार या विचारानेच रतन टाटा दुःखी होते. त्यात या बोलण्यामुळे ते पुरते हलले. मीटिंग अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स न विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा एकदा शुन्यापासून उभे केले आणि यावेळी कंपनीला नफा झाला.२००८ पर्यंत टाटा मोटर्सचा नफा कित्येक पटींनी वाढला. तर फोर्ट कंपनी नुकसानात जाऊ लागली आणि लवकरच या कंपनीचं दिवाळं निघालं. फोर्डला सर्वात मोठं नुकसान रेंज रोवर आणि जग्वार या गाड्यांमुळे झालं होतं. रतन टाटा यांनी या दोन कंपन्या विकत घेण्याचा निर्णय घेतला. या डीलसाठी विल फोर्ड आणि त्यांचे काही शेअरहोल्डर्स भारतात आले होते, तेव्हा त्यांनी रतन टाटा यांना म्हटलं होतं की, ‘तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार मोठे उपकार करत आहात.’ तेव्हा या वरून हेच लक्षात येते कि मोठी लोकं अपमानाचा बदला आपल्या कर्तृत्वाने घेतात . अपमानाला आपली ढाल बनवतात. अपमानाने हातपाय गाळून बसत नाहीत . 
तिसरी गोष्ट आहे 2014 ची ज्या वेळी न्यू यॉर्क टाईम्स ने भारताच्या स्पेस एजन्सी ची खिल्ली उतरवताना व्यंग चित्र काढून केली. गाय आणि सापांचा मागासलेला देश काय आमची बरोबरी करणार . इस्रो मधील शास्त्रज्ञांना याची चीड आली परंतु त्यांनी अपमानाचे उत्तर व्यंग चित्रला प्रति उत्तर ट्विट करून नाही तर चंद्रयान यशस्वी करून दाखवले सायकल वरूनचा हा आतापर्यंतचा प्रवास किती खडतर असेल विचार करा अनेक शास्त्रज्ञांनी अनेक वर्षे मेहनत घेतली त्यावेळी आजचा हा सुवर्ण क्षण आला आहे . चंद्रयान मुळे आज जगात भारताची मान उंच झाली आहे. झालेल्या अपमानामुळे हातावर हात धरून शास्त्रज्ञांनी काहीही कष्ट केले नसते तर आजचे यश संपादन करणे कधीही शक्य झाले नसते.

आपण अनेक वेळा अपमानाने अगदी हतबल होतो . आतल्याआत कुढत बसतो. पण यातुन काहीही साध्य होत नाही. अपमानाचे चोख उत्तर द्यायचे असेल तर जिद्दीने काम करावे लागेल. मोठे यश संपादन करावे लागेल. कर्तृत्व दाखवावे लागेल. स्वतःला मजबूत करावे लागेल. तुम्ही गाजवलेले कर्तृत्व हाच सर्व अपयशाचा उतारा आहे. तुम्ही मिळवलेले उत्तुंग यश हाच तुमच्या अपमानाचा बदला आहे.

Comments

Popular posts from this blog