"हलकं होऊया !उंच उडूया !!"




आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो ज्या वाहनावर जेवढे जास्त  ओझे तेवढी त्याची गती धीमी. एखादी ट्रक  जड सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असते पण अगदी कमी गतीने. जहाज देखील एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत अनेक वजनाचे सामान घेऊन जाते पण अगदी धीम्या गतीने. पण जर आपण विमानाचा विचार केला तर विमानात एका क्षमतेपेक्षा जास्त सामान तुम्ही नेऊ शकत नाही म्हणून ते उंच आकाशात वेगाने उडते. 

तुम्ही म्हणत असाल एवढी सारी प्रस्तावना कशासाठी. सांगतो सांगतो ! माणसाचे देखील असेच  आहे. जेवढ्या जास्त नको त्या विचारांचे ओझे घेऊन तो जीवनाचा प्रवास करेल तेवढा त्याचा वेग कमी होईल. नको त्या विचारांची जळमटे तुमची प्रगती मंद करतात. 'मागे या कामात मला अपयश आले होते आता परत मला ते काम जमणार नाही' . 'लोक काय म्हणतील?'. 'मला हे कसे जमेल?'. 'मागे एकदा मी फसलो होतो आता परत फसेन'. 'माझ्याकडे तर त्या कामासाठी आवश्यक असलेली साधने नाहीत मग ते काम मी कसा करू?'. 'त्याने माझा अपमान केला'. 'मागे एकदा ती संधी माझ्या हातून निसटली परत मला ती संधी मिळेल का?' हे आणि असले नकारात्मक विचारांचे ओझे तुम्ही बाळगत असाल तर तुम्ही गती कशी साधणार ? आवश्यक असणारे निर्णय कसे घेणार ? . जेव्हा जेव्हा तुम्ही काही चांगले करण्यासाठी पुढे पाय टाकता तेव्हा तेव्हा हे मागील विचार तुम्हाला मागे खेचतात. 

तुम्हाला प्रगती साधायची असेल तर नकारात्मक विचारांचे ओझे हे उतरावेच लागेल. भूतकाळात घडलेल्या वाईट घटनांचा वर्तमानात विचार करून काहीही साध्य होणार नाही. असे विचार तुमचा वर्तमान तर नासवतच आहेत तसेच भविष्यकाळ देखील अंधारमय करत आहेत. तेव्हा अशा विचारांना मूठमाती देणे कधीही चांगले. नकारात्मक विचारात तुम्ही गुंतून पडला असाल तर एका ठराविक काळानंतर तुमच्या हातून काहीही नवीन होणार नाही. साखळदंडाने बांधलेल्या कैदयासारखी तुमची अवस्था होईल. निराशा तुम्हाला चारी दिशेने घेरेल. तेव्हा वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 

तुम्हाला विमानासारखे उंच उंच उडायचे असेल प्रगतीचे शिखरे गाठायची असतील तर सकारात्मक विचार करावा लागेल. नवीन संधींचा मागोवा घ्यावा लागेल. आपल्या नवनवीन कल्पनावर विश्वास ठेवत त्या  प्रत्यक्षात अंमलात आणाव्या लागतील. नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील. खुल्या मनाने विचार करावा लागेल . पण हे सर्व कधी शक्य होईल आधीचे नको ते टाकून दिले तर . हलके झाले तरच उंच उडण्याचे स्वप्न साकार होईल. तेव्हा 'हलकं होऊया आणि उंच उडूया' 

Comments

Popular posts from this blog