" नको तुलना एकमेकांच्या मुलांची सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची"
या लेखातील शीर्षकाच्या ओळी लहान मुलांच्या बाबतीत लिहल्या असल्या तरी त्या आपल्या सर्वांना लागू होतात . प्रत्येक मुलं जस वेगवेगळे आहे आणि जेव्हा पालक आपल्या मुलांची इतर मुलांबरोबर तुलना करत असतात तेव्हा ते आपल्या मुलांवर नकळत अन्याय करत असतात. आपण देखील आपली तुलना इतरांसोबत करतो तेव्हा आपणही स्वतःवर अन्यायच करत असतो.
प्रत्येक व्यक्ती हा निराळा आहे. त्याचे जीवनातील प्राधान्यनक्रम वेगळे आहेत. त्याला मिळालेली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. सुख दुःखाच्या कल्पना वेगळया आहेत. तेव्हा एकमेकांची तुलना करून कसे चालेल. आणि जरी केली तरी ती माझ्या मते न्याय ठरेल असेही नाही. तेव्हा तुलनेचा विचार हा व्यर्थ आहे.
अगदी तुलना करावयाचीच असेल तर स्वतः ची स्वतःचीच करा. आपल्या आत्तापर्यंतच्या जगलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करा. नक्कीच तुम्हाला बदल जाणवलेला दिसेल. अगोदर तुम्ही कोणावर तरी अवलंबून होतात आज कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आपल्या जाणीवा आधीपेक्षा अधिक सजग झालेल्या असतील. वागण्या बोलण्यात एक प्रगल्भता आलेली असेल. काही गोष्टी साध्य झाल्या असतील. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त झाला असेल. मदत घेणारे पासून मदत देणारे हा प्रवास झाला असेल. आधीपेक्षा आज आपण अधिक खंबीर झालेलो आहोत . अनेक चांगल्या वाईट अनुभवांची भर पडलेली असेल. अनेक जणांच्या ओळखी झालेल्या असतील.
आत्तापर्यंत घालवलेला पूर्ण कार्यकाळ नक्कीच सुखाचा नसेल. अनेक अडचणी,संकटे, कष्ट करत करत आपण इथवर आलेलो आहोत. आपल्यातील बदल हा आपल्या परिश्रमाचे फळ आहे . तेव्हा इतरांशी तुलना करण्यात काय मतलब आहे .
प्रत्येक व्यक्ती विधात्याची सुंदर एकमेवाद्वितीय अशी निर्मिती आहे तेव्हा त्याची तुलना कशी होवू शकते ? जशी बागेतली फुले वेगवेगळी आहेत म्हणूनच बाग सुंदर दिसते. तसेच आपण वेगवेगळे असलो तरी आपापल्या ठिकाणी सुंदरच आहोत. आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येकाची भूमिका वेगळी असली तरी ती महत्वाची आहे. त्यातील रंगत वाढविणे, जीवन समरसून जगणे , आपली अवीट अशी छाप सोडणे हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे.
तुम्ही इतरांशी तुलना करत असाल तर त्यातुन तुम्हाला ताण आणि ताणच मिळणार आहे. जे आपल्याकडे आहे त्याच्याहीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. त्याचा आनंद घेण्यापासून तुम्ही दूर जाल. एक निराशेचे वातावरण तुमच्यात पसरेल. तुम्ही सतत इतरांचा हेवा करायला लागाल. या सर्वांतून तुमच्यातील न्यूनगंड वाढेल. तेव्हा तुलना करणे कधीही टाळले पाहिजे.
त्याला जे जमले ते मला जमणार नाही. तीने जे साध्य केले ते मला साध्य होणार नाही असा विचार करणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असला तरी देवाने दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे व असाध्य हि साध्य करणारा मेंदू तर सारखाच दिला आहे. तसेच निर्सगातील प्रत्येक घटक सर्वांना एकसारखा आहे. तेव्हा आपल्यातील अंगभूत शक्तीचा वापर करत व आपल्यातील उणिवांवर मात करत तुलना न करता जगणे कधीही चांगले.

Comments
Post a Comment