"जीवनाचा प्रत्येक टप्पा आनंददायी"
बालपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण हे जीवनाचे मुख्य चार टप्पे. तसं पाहीलंतर जीवनातील या चारही टप्प्याची गोडी काही औरच आहे. फक्त बालपणाचाच काळ सुखाचा असे म्हणणे काहीसे चुकीचे वाटते. अर्थात बालपणात काही जबादारी नसल्यामुळे, सर्व बाजूने लाड व काळजी घेत जाण्यामुळे हा काळ सुखाचा नक्कीच वाटू शकतो त्याच्या गोड आठवणी प्रत्येकाच्या ह्रदयात कायम वास्तव्यास असतात. या काळात केलेली दंगामस्ती, विविध खेळ, पहिली शाळा , पहिला गणवेश, विविध स्पर्धेत घेतलेला भाग, मिळवलेली बक्षिसे , सहली सारेच काही मजेशीर.
जीवनातील दुसरा टप्पा म्हणजे तरुणपण. प्रचंड उत्साहाचा, ऊर्जेचा काळ. स्वतःबरोबर दुसऱ्याच्याही प्रेमात पडण्याचा काळ. नवी नवी स्वप्न पाहण्याचा काळ. पहिले कॉलेज, कॉलेज मधील कॅन्टीन, कॉलेजचा कट्टा , मित्रासोबतच्या तासंतास चालणाऱ्या गप्पा , सिनेमे सगळं काही औरच. करिअरची निवड , पहिली नोकरी, लग्न , हनिमून, पहिले मुलं सर्व याच काळाचे देणे.
प्रौढपणाचा टप्पा जीवनाला स्थीरता आणणारा. आपलं तरुणपण आपल्या वाढत्या मुलांत पाहण्याचा काळ. जीवन खऱ्या अर्थाने समजण्याचा काळ. मुलांचे यशाचा आनंद पाहण्याचा काळ. नवीन नाती जसे की सुन, जावई जोडण्याचा काळ. नातवंडांचे कोडकौतुक, त्यांच्या बाललीला , त्यांचे लाड व या सर्वातील आनंद नक्कीच सुखावणारा.
म्हातारपण जीवनातील अखेरचा टप्पा. जीवनातील अनेक चढ उतार पाहिल्यामुळे आपल्या विचारांना , बोलण्याला नक्कीच काही वजन व किंमत याच काळात मिळू शकते. जीवनातील आजपर्यंच्या जबाबदारीमुळे जे काही करू शकलो नाही त्याला बऱ्यापैकी वेळ देण्याची संधी या काळात मिळते . निवांत असण्याचे नातेवाईकांच्या भेटीगाठी, लग्न सभारंभाना हजेरी, पर्यटनाचा आनंद घेणे सहज शक्य होते.
बालपण सोडले तर जीवनातील इतर तीन टप्प्यांची मुख्य जबाबदारी त्या त्या व्यक्तीची आहे. उत्तम शारीरिक व मानसिक स्वास्थ , योग्य आर्थिक नियोजन, त्या त्या टप्प्यातील आपापल्या जबाबदारीचे भान हे सर्व जर नीट सांभाळले तर हे सर्व टप्पे नक्कीच आनंददायी ठरू शकतात.

Comments
Post a Comment