"सोशल मीडिया आणि आपण"

सोशल मीडियाने आपलं रोजचं जगणं व्यापून टाकलेले आहे. व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब  हे शब्द परवलीचे झाले आहेत. रोजचा काहीना काही वेळ आपण यावर घालवतच  असतो. काही वेळ ठीक आहे पण वेळेला बंधन नसेल तर?. कामाची महत्वाची वेळ यासाठी जात असेल तर ?. याचे व्यसनच लागले असेल तर , म्हणजे मी माझा पूर्ण दिवस किंवा दिवसातील जास्तीत जास्त वेळ यासाठी देत असेल तर ? या तर तर च्या गोष्टी धोक्याच्या आहेत.  

दिवसभराच्या कामाच्या ताणातून थोडा विरुंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर यात काही वावगे नाही. पण तासोंतास  याचा वापर करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होय. आणि याचे व्यसनच लागले असेल तर वेळीच यातून बाहेर पडणे हिताचे ठरते. जेवढा याचा अतिवापर तेवढे याचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त. याचे व्यसन लागलेल्या व्यक्तीचे सोशल मीडिया हेच जग बनते. तो माणसांपासून अलिप्त राहतो. सोशल मीडिया वरील लाईक, कंमेंट हेच त्याचे विश्व बनते. त्यातच त्याला आनंद वाटायला लागतो. सोशल मीडिया वरील लाईक, कंमेंट वरून आपली क्षमतेचे मोजमाप करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. 

आजच्या काळात सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे हे तर मान्यच करावे लागेल. याचा फायदा आपल्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार प्रत्येकाने करावा. तुम्ही जर कोणता व्यवसाय करत असाल तर त्याची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सोशल मीडिया करू शकतो. तुमच्या अंगात काही कला-गुण असतील तर त्याचा प्रचार तुम्ही या द्वारे करू शकता. समाजातील काही प्रश्नांवर भाष्य करून तुम्ही समाजमन जागृत करू शकता. अवयवदान, रक्तदान, अन्नदान, वस्त्रदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान , प्लास्टिक मुक्तता इत्यादींचा प्रचार करणे सोशल मीडिया मुळे  अगदी सोपे झाले आहे. 

 सोशल मीडिया मार्केटिंग, सोशल मीडियासाठी कंटेंट राईटींग, सोशल मीडियासाठी ऑडिओ किंवा व्हिडीओ बनवणे,  स्वतःचे युट्युब चॅनेल यासारखे उद्योग करून तुम्ही आर्थिक कमाई देखील करू शकता. फक्त यासाठी योग्य त्या स्कील असणे गरजेचे आहे. 

शेवटी कोणतेही तंत्रज्ञान तुम्ही कसे वापरता यावरून त्याची परिणामकता ठरते. त्याचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी, कामाची माहिती मिळविण्यासाठी, ज्ञानात भर घालण्यासाठी केला तर सोशल मीडिया हे आजच्या काळातील वरदान ठरू शकते. पण तेच जर सोशल मीडिया वरील रील्स पहाण्यासाठी कितीतरी वेळ घालविणे, सोशल मीडिया वरील काही पोस्ट वर वाद घालत बसणे , युट्युबवर बिनकामाचे व्हिडीओ पहात बसणे , धोक्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्या सेल्फी काढून त्या पोस्ट करणे, रोजच्या जीवनातील बारीक सारीक घटनेचे फॊटो काढून त्याचे स्टेटस बनवणे अशी निरुपयोगी कामे जर आपण करत असूत तर हाच सोशल मीडिया शाप ठरू शकतो. तेव्हा सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे ज्याने त्यानेच ठरवायचे आहे. 


Comments

Popular posts from this blog