"दिल पे मत लो यार" 

त्याचे किंवा तिचे बोलणे माझ्या मनाला खूप लागले, तिच्या /त्याच्या बोलण्याने माझे मन खट्टू झाले, अमक्याच्या बोलण्याने माझा मूड खराब झाला, सकाळी सकाळी तो किंवा ती मला असे बोलण्याने माझा अख्खा दिवस खराब गेला इत्यादी इत्यादी तक्रारीचा सूर आपण स्वतः तरी लावत असतो  किंवा कोणाच्या ना कोणाच्या तोंडून तो ऐकत असतो. यातील मुख्य मुद्दा तो हा कि बोलणाऱ्याचे यात काहीही जात नाही . तो बोलून मोकळा होतो . त्याचा/तिचा दिवस खराब जात नाही . आपण मात्र दिवसभर, काही काही जण तर काही दिवस ते बोलणे मनाला लावून  घेऊन कुढत बसतात. कामावरील त्यांचे लक्ष उडते. काही हळव्या मनाच्या लोकांच्या तब्येतीवर देखील याचा परिणाम होतो. मग याला काही उपाय आहे का नाही ? तर याचे उत्तर आहे निश्चित आहे. पहिला हा विचार करा आपल्याला कोण काय बोलेल हे आपल्या हातात आहे का ? तर निश्चित नाही.  प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती आपल्याशी छान छानच बोलेल असं कधी होत का ? तर  नाही. तर मग आपल्या हातात काय उरतं तर बोलणं मनावर न घेणं. आपण काही मशीन नाही आहोत ऑन ऑफ व्हायला  कि इतरांच्या चांगल्या बोलण्याने आपला मूड फुलायला आणि वाईट बोलले कि आपला मूड खराब व्हायला. 

कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीचा बोलण्याचा उद्देश आपल्याला वाईट वाटावे हा नसतो देखील. गंमतीने, चेष्टेने एखादे वाक्य बोलले जाते . आपण मात्र त्याचा भलताच अर्थ काढून वाईट वाटून घेतो. जरी  अगदी तसे नसेल बोलण्याऱ्याचा उद्देश वाईट जरी असेल तरी शेवटी आपल्या हातात काय उरते तर त्या बोलण्याचा परिणाम आपण किती करून घ्यायचा ते . आपली वेळ , आपले काम आपल्यासाठी श्रेष्ठ असेल, त्यावर आपली निष्ठा असेल तर कोणी काय बोलले याचा परिणाम आपल्या कामावर कधीही होणार नाही. 

आपला जवळचा व्यक्ती मग तो मित्र असेल, रक्ताच्या नात्यातील असेल त्याचा मूड जर खराब असेल, तो रागात असेल तर एखादया वेळेस तो जर काही बोलला तर त्याची मनःस्थिती समजून घेऊन त्याचे बोलणे मनावर न घेणे हेच हिताचे ठरते. पण असे वारंवार होत असेल तर मात्र त्याच्याशी एकदाच बोलून त्याच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावर काय होत आहे हे ठणकावून सांगणेच चांगले. 

 आपल्या मनाचा तोल सांभाळण्याचे काम हे आपल्यालाच करावे लागेल. तुमच्या स्वतःशिवाय तुमच्या मनाला कोणीही दुसरा डिस्टर्ब करू शकत नाही हे देखील तेवढेच खरे. हा मला असे बोलला , तो मला तसे बोलला असे म्हणत आपल्या ध्येयापासून विचलित होणे कधीही शहाणपणाचे नसते . कोणी आपल्या हितासाठी काही कठोर बोलत असेल तर वाईट वाटून न घेता आपल्यात सुधारणा करणे आपल्याच फायदयाचे ठरते . पण बोलणारा कोण आहे हे देखील तेवढेच महत्वाचे. कोणी आपल्या कामा बाबबीत टिकात्मक  टिप्पणी  करत असेल तर आपला कामाचा स्तर उंचावून त्यांचे तोंड बंद करणे हाच त्यावर उपाय आहे .  आणि  मित्रांनो शेवटी एकच सांगावेसे वाटते प्रत्येकाचे बोलणे मनावर घेतले तर जगणं मुश्किल होईल म्हणूनच म्हणावेसे वाटते   "दिल पे मत लो यार"   

Comments

Popular posts from this blog