"कृतज्ञता व्यक्त करा "

मान्य जीवनाची वाटचाल करत असतांना मोठी स्वप्न पहावीत , महत्वकांक्षा ठेवावी . त्या स्वप्नांचा, महत्वकांक्षेचा कशोशीने पाठलाग करावा . त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट,  धडपड करण्याची तयारीही ठेवावी. पण  हे करत असतांना जे सध्या आपल्याजवळ आहे त्याचे काय? त्याबद्दलची  कृतज्ञता कधी आपल्या मनात  उमटते का ? नसेल तर आपल्या सारखे करंटे आपणच . आपल्या शास्त्रात  म्हटले जाते ८४ लाख योनिचा प्रवासा  नंतर माणसाचा जन्म होतो . अशा  आपल्याला मिळालेल्या अमूल्य मानवी  जीवना बद्दल आपण कृतज्ञ आहोत का ?  दुर्देवाने जगात कितीतरी जणांना जन्मतः अपंगत्व असेल आपल्याला ते नाही  या बद्दल  आपण कृतज्ञ आहोत का ? गरीब किंवा श्रीमंत घरात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही . परंतु लहानपणीच गरिबीचे चटके न बसता आपण  त्या  मानाने खात्यापित्या, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत घरात जन्माला आलो त्यासाठी आपण कधी आभार व्यक्त केले आहेत का ? 

कोणा माता-पित्याच्या पोटी आपण जन्म घ्यावा हेही आपल्या हातात नाही. परंतु दुर्देवाने जगात कित्येक जणांचे आई-वडील व्यसनी , अपंग असतील व त्याचे दुःख त्या घरात जन्म घेतलेल्या बालकालाही   झेलावेच लागते . असे दुःख आपल्या वाटेला आलेले नाही याचा आपण कधी आनंद साजरा केला आहे का ? कित्येक जणांचे दुर्देवाने लहानपणीच आई किंवा वडील जग सोडून गेले असतील किंवा कित्येक जण अनाथ आश्रमात लहानाचे मोठे झाले  असतील तसेच काही जणांचे आई-वडील विभक्त झाले असतील . या सर्व प्रसंगीचा त्रास आपल्याला भोगावा लागला नाही हे सुख नाही तर दुसरे काय आहे ? पण या सुखाची आपल्याला किंचितही जाणीव नसते. 

जगात असे कित्येक जण आहेत जे कोणत्या ना कोणत्या आजाराने , व्याधीने त्रस्त आहेत . आपल्या निरोगी शरीराचे कधी आपण आभार मानले आहेत का ?  याचे उत्तर नाही असेच असेल. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. जगात कित्येक जणांच्या या मूलभूत गरजा देखील नीटशा  पूर्ण होत नाही . आपल्या जर त्या नीटशा  पूर्ण होत असतील तर त्याबद्दल   कृतज्ञता व्यक्त करायला काय हरकत आहे? 

जगाच्या पाठीवर असे कित्येक देश आहे जीथे अशांतता आहे, हुकूमशाही आहे , मूलभूत सुविधा नाहीत, आर्थिक डबघाई आहे . मूलभूत सुविधा असलेल्या, लोकशाहीची बूज राखणाऱ्या, मोठ्या प्रमाणात सर्वत्र शांतता असलेल्या, आर्थिक दृष्टया संपन्न असलेल्या  महान अशा भारत देशात आपला जन्म झाला  तेव्हा आपल्या सारखे भाग्यवान आपणच.  

 सध्या आपल्याजवळ जे आहे जसे की  शिक्षण, पद, प्रतिष्ठा, आरोग्य, पैसा यात आपला वाटा कितीसा आहे. आई-वडील, भावंडे, नातेवाईक , शिक्षक, मित्र, शेजारी, डॉक्टर , समाज यांचा मदतीने, सहकार्याने  आपल्याला हे सर्व प्राप्त करून दिले आहे . या सर्वा बद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का ?   

काहींच्या जीवनात अचानक संकटे येतात. जसे की जीवघेणे आजारपण, अपघातातून आलेले शारीरिक अपंगत्व , मोठया प्रमाणात न भरून येणारे  आर्थिक नुकसान, जवळच्या माणसाची जीवितहानी, नैसर्गीक आपत्ती मुळे झालेले नुकसान. या सर्वांपासून आपले जगणे दूर असेल , आणि तरी आपण या साठी कृतज्ञ राहत नसुत तर आपण  फक्त सुखाच्या पाठीमागे धावतोय.  खरं तर आपण सुखी आहोतच फक्त त्याची जाणीव व त्या बद्दलची  कृतज्ञता व्यक्त करायला शिकणे गरजेचे आहे. नवीन नवीन दिशा पादाक्रांत करण्यासाठी प्रयत्नशील तर राहुयाच पण जे जवळ आहे त्यासाठी देखील आभारी राहूया कृतज्ञता व्यक्त  करूया एवढेच.    

Comments

Popular posts from this blog