"सकारात्मक स्व-संवाद महत्वाचा "

लोक आपल्याविषयी काय बोलतात या पेक्षा आपण स्वतः विषयी काय बोलतो हे जास्त महत्वाचे ठरते. आपली स्वतः ची प्रतिमा आपल्या मनात कशी आहे, ती सकारात्मक आहे का नकारात्मक या वरून आपले व्यक्तिमत्व बनत असते .  यावरूनच आपली आयुष्याची वाटचाल सुलभ किंवा कठीण  होते. ' माझे नशीबच खोटे आहे' , 'मी दिसायला कुरूप आहे', 'मला  सतत अपयशच येते',  'माझी परिस्थिति वाईट आहे ',' हे जग चांगले नाही ' , ' माझ्या हातून काहीही होणार नाही',   या आणि या सारखे इतर नकारात्मक संवाद आपण स्वतःशी करत असूत तर आयुष्यात चांगले काही घडण्याची आपण अपेक्षाच  कशी ठेवू शकतो?. आपली सर्व शक्ती आपण नकारात्मक विचारात, संवादात खर्च करत असूत तर आपल्या हातून नवंनिर्मिती  होणार कशी? आपण आपली प्रगती कशी साधणार?. शारीरिक व्यंगावर एखाद्यावेळेस मात करता येऊ शकेल पण मनाच्या व्यंगाचे काय?. या वरून सकारात्मक स्व-संवादाचे महत्व अधोरेखीत करणे गरजेचे आहे

 'मी सर्व शक्तिमान अशा परमेश्वराची एक निर्मिती आहे, एक अंश आहे'.  'मी कोणतेही काम माझ्यात असलेल्या अंगभूत शक्तीमुळे, आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या बळावर पूर्ण करू शकतो'. 'माझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही'. 'मी कोणत्याही आलेल्या संकटावर मात करू शकतो'. ' मी माझी सध्याची वाईट परिस्थिति बदलू शकत्तो ' मी काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या मधली ऊर्जा वापरेन '. 'हे जग सुंदर आहे ते अजून सुंदर करण्याचा मी जाणीवपूर्वक  प्रयत्न  करेन' , ' चांगलं दिसणं माझ्या हातात नाही,  पण चांगलं बनणं माझ्या हातात आहेया सारखे सकारात्मक  स्व-संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. असे संवाद जर आपण साधत नसूत तर ते जाणीवपूर्वक साधणे  गरजेचे आहे.

 नकारात्मक स्व-संवाद साधणारा व्यक्ती हा इतरांशी देखील नकारात्मकच बोलत असतो. त्याचा स्वभाव सतत किरकिरा बनतो. नवीन कोणत्याही गोष्टी मध्ये त्याला रस नसतो. त्याच्यासाठी आयुष्य हे सुंदर नसून कंटाळवाणे बनते. त्याची प्रगती खुंटते. तो अपयशाच्या खोल दरीत ढकलला जातो. अशा  व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असतील तर अशा व्यक्ती पासून दूर राहणे हे आपल्या हिताचे ठरते.

 या उलट सकारात्मक स्व-संवाद साधणारा व्यक्ती इतरांशी देखील सकारात्मकच बोलतो. त्याच्या अंगात एक उत्साह असतो. काहीतरी नवीन करण्याची त्याच्यात उर्मी असते. आपल्यातील ऊर्जा तो इतरांना देखील देतो. तो इतरांना आपल्याकडे आकर्षित करतो. आपसूकच त्याचा प्रगतीचा वेग वाढतो. तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. अश्या व्यक्तीशी जवळीक साधणे , मैत्री करणे हे आपल्या हिताचे ठरते.

 नकारात्मक स्व-संवाद हा नकारात्मक जीवनशैली चा परिणाम असतो की ज्यात खालील काही  घटक समाविष्टहोतात

.व्यसनाधीनता
.वाईटसंगत
.आळशीवृत्ती
.सततकामाचा ताण
.विस्कळीत कौटूंबिक नातेसंबंध


सकारात्मक स्व-संवाद साधायचा असेल तर सकारात्मक जीवनशैली देखील अंगीकारणे गरजेचे असते की ज्यात खालील काही गोष्टी समाविष्ट होतात.

नियमित   व्यायाम
.चांगली संगत
.कामाचे योग्य नियोजन
.सुदृढ नातेसंबंध
.एखादा छंद

आपल्या विचारांना सकारात्मकतेची धार लावण्याचे कसब आपल्या अंगी येणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टी घडण्यामागचा सकारात्मकच विचार पहिल्यांदा आपल्या मनात डोकायला पाहिजे. विचार बदलायला जरी बराच अवधी लागला तरी हळू हळू हे आपल्या अंगवळणी निश्चितच पडेल.

 जगणं हे सुदर बनवायचं का कंटाळवाणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे, आपल्या विचारात आहे. नकारात्मक विचाराकडून सकारत्मकतेकडे जाणे कधीही हिताचे ठरते.  नकारात्मक स्व-संवाद जेव्हा आपण साधतो तेव्हा हि  सृष्टी 'तथास्तू'  म्हणते सकारात्मक स्व-संवाद साधतांना देखील. परंतु पहिला तथास्तू  आपल्यासाठी  शाप  बनतो तर दुसरा वरदान . असा  शाप  घ्यावयास  कोणाला आवडेल ,  नाही का ?

  

Comments

Popular posts from this blog