महाभारतातील एक कथा आहे कौरव पांडवांचे युद्ध हे अंतिम टप्प्यात आले होते गुरु द्रोण युद्धात मारले गेले तर पितामह भीष्म अर्जुनाच्या बाणाने शरपंजरी पडलेले असतात. कर्ण हा आता कौरवांचा प्रधान सरसेनापती झालेला असतो. अनेक प्रयत्न करूनही कर्णाला हरविणे हे पांडवाना शक्य होत नसते . त्यामुळे पांडवांच्या गोटात निराशेचे वातावरण पसरलेले असते . अशा प्रसंगी संयमी असलेले धर्मराज अर्जुनाला संतापाने म्हणतात "तू तर स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी समजतो तरीही तू कर्णाला हरवू शकत नाहीस ? काय कामाचे तुझे हे गांडीव धनुष्य ? कर्णाचा जोपर्यंत आपण पाडाव करत नाहीत तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकू शकत नाहीत हे तुला चांगले माहित माहित आहे " हे मोठ्या भावाचे बोल ऐकून अर्जुन दुःखी होतो. त्याचा एक प्रण असतो 'जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करेल त्याचा मी वध करेन' . आता तर मोठ्या भावाकडूनच अपमान झालेला आहे व प्रण पूर्ण करायचा असेल तर भावाचा वध करणे क्रमप्राप्त आहे. यावर श्रीकृष्ण एक तोडगा काढतात. ते अर्जुनाला सांगतात हे अर्जुना शास्त्र सांगत कि 'अपमान म्हणजे मृत्यू' . तू धर्मराजाचा अपमान कर. अर्जुन धर्मराजांचा अपमान करतो. तो म्हणतो "तुम्ही जर कौरवांसोबत द्यूत खेळला नसता तर आपण राज्य हरलो नसतो व आजची ही वेळ आपल्यावर आली नसती. आजच्या परिस्थितीला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यामुळे आम्हा सर्वांना वनवास भोगावा लागला." अर्जुनाचे हे खडेबोल ऐकून धर्मराज व्यथित होतात. 'आपल्या वडिलासमान मोठ्या भावाचा आपल्या हातून अपमान झाला ! मला जगण्याचा कोणताही अधिकार नाही ! मला मृत्यूला सामोरे गेले पाहिजे ! ' असे म्हणत अर्जुन स्वतःला संपविण्यास तयार होतो. हे सर्व पाहून श्रीकृष्ण मनाशी म्हणतात 'मी तर एक मार्ग सुचविला होता हे भलतच घडत आहे.! काही तरी उपाय केला पाहिजे ! '. ते अर्जुनाला सांगतात तू आत्महत्या करण्याची काही गरज नाही 'आत्मस्तुती म्हणजे आत्महत्या' असे शास्त्र सांगते . तू फक्त आत्मस्तुती कर त्याची बरोबरी स्वतःच्या हत्येशीच होते.
वरील गोष्टीचे तात्पर्य काय तर 'आत्मस्तुती म्हणजे आत्महत्या' . ' आत्मस्तुती हि विष्ठेसमान' असे संतवचन देखील आहे. आत्मविश्वास व आत्मस्तुती यात एक बारीकशी रेष आहे. मी अमुक अमुक या गोष्टी करू शकतो याबद्धलचा विस्वास म्हणजे आत्मविश्वास. तर जगात मीच तो सर्वश्रेष्ठ असा दर्प दाखवीत फिरणे म्हणजे आत्मस्तुती. अशी माणसे सतत स्वतःची प्रशंसा करण्यात मग्न असतात.काही प्रमाणात कधीतरी स्वतःची स्तुती ही वावगी ठरते परंतु त्यात अहंकाराचा लवलेश नको. आपल्याबरोबर इतरांचीदेखील योग्य ठिकाणी त्यांच्या कामाची प्रशंसा करून पावती देणे हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण ठरते. परंतु दुसऱ्याला कमी लेखत आत्मस्तुती करण्यात रममाण होणे हे रोगी मानसिकतेचे उदाहरण ठरते. अशा व्यक्तींचा विचार हा मी मोठा आहे या पासून सुरु होतो व मीच मोठा आहे येथे संपतो. अशा व्यक्ती आपल्या आसपास असतील तर त्यांच्यापासून चार हात दूर राहणे शहाणपणाचे ठरते. अशा व्यक्ती नातेसंबंध बिघडवतात. अशा मानसिकतेच्या व्यक्ती बरॊबर राहणे त्रासदायक ठरते. अशा व्यक्ती कोणताही विरोध सहन करत नाहीत. दुसऱ्यांना कमी लेखत स्वतःची शेखी मिरविण्यात त्यांना आनंद मिळत असतो. कधी कधी स्वतःची प्रौढी मिरविण्यात ते हास्यास्पद वर्तन करतात. आपले हसे होत आहे हे त्यांच्या गावीही नसते. अशा मानसिकतेच्या काही व्यक्ती स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ समजतात. माझे तेच खरे, मी म्हणतो तेच व्हायला हवे , सारे जग माझ्या मुठीत आहे अशा अवास्तव कल्पना अशा व्यक्तींच्या असतात. रावण, दुर्योधन, हिटलर, सिकंदर इत्यादी व्यक्ती याच मानसिकतेच्या बळी ठरल्या . पहिलेतर अशा व्यक्तीपासून स्वतःचा बचाव करणे कधीही चांगले व जमल्यास अशा रोगी मानसिकतेतून त्यास बाहेर काढण्यात त्याची मदत करणे आवश्यक ठरते. आपणही अशा मानसिकतेचे शिकार होत नाहीत ना हे तपासा. अशी आत्मस्तुती , 'गॉड कॉम्प्लेक्स' मानसिकता तुमची असेल तर ती तुमच्या एकंदरीत व्यक्तीमत्वास हानिकारक आहे. आणि आता हा लेख वाचल्यानंतर तुम्ही अशा मानसिकतेच्या व्यक्तींपासून थोडे दूरच राहणार नाही का ?
(महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment