जीवनशास्त्र कोण शिकविणार?
एका मोठया उदयॊगपतीची नैराश्यातून आत्महत्या. शिकाऊ महिला डॉक्टरची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या. मोबाईल गेमच्या व्यसनामुळे तरुणाची आत्महत्या. प्रेमप्रकरणातून तरुण किंवा तरुणीची आत्महत्या. परीक्षेच्या अपयशामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या अशा बातम्या वाचल्या कि मन सुन्न होते. केवढी हि निराशा? केवढा अघोर पलायनवाद ? केवढा हा काळोख ? कोठे चाललोत आपण? कुटुंबव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था नापास तर ठरत नाही ना?. या सर्वांची नेमकी जबाबदारी कोणाची? हे वाढत चाललेले आत्महत्येचे प्रकार आपण थोपवू शकणार आहोत कि नाही? याचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल . आपण शिक्षणव्यवस्थेत मोठी क्रांती केली. रोज असंख्य विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी,व्यवसाय करण्यासाठी समाजात दाखल होतात. ते नॊकरी,व्यवसाय करण्यासाठी एखाद्यावेळेस पात्र असतील पण जीवनाच्या लढाई साठी ते पात्र आहेत का, हे कोण तपासणार? ते जर पात्र असले असते तर आत्महत्येचे प्रकार समाजात घडले नसते. उच्चशिक्षित, तंत्रज्ञाना मध्ये पारंगत पण मनाने कमकुवत असा व्यक्ती तर आपल्या कुटुंब, शिक्षण, समाज व्यवस्थेने घडवला नाही ना ? हे पहावे लागेल.
आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विविध शाखेतून वेगवेगळे विषय शिकविले जातात . पण यात 'जीवनशास्त्र' या विषयाचा कोठेच समावेश नाही, हे येथे खेदाने नमूद करावे लागेल.
जीवन जगण्यासाठी नुसते शिक्षणाने, शरीराने, पैशाने मजबूत असून चालणार नाही तर मनाने देखील मजबूत असणे, कणखर असणे गरचेचे आहे. मनाची एक सकारात्मक बैठक असणे गरजेचे आहे. निराशा, अपयश, प्रेमभंग हा जीवनाचा एक भाग आहे पण हेच म्हणजे जीवन नाही हे एका समज येणा-या वयातच शिकविणे गरजेचे आहे. अपमान, टीका, राजकारण, उपहास हे रोजच्या जीवनातील एक भाग आहे हे नीटसे समजावून घेणे महत्वाचे आहे. नोकरीतील, व्यवसायातील अपयश हे चिरकाल नाही त्यावर योग्य ते निर्णय घेऊन, परिश्रमाने, ज्ञानाने विजय मिळवता येवू शकतो हे समजणे गरजेचे आहे. जीवनाचा आलेख सदाच वर असेल असे नाही तर तो कधी खाली देखील येवू शकतो हे शिकणे जरुरीचे आहे. जीवन अमूल्य आहे ते अकाली संपविण्यात कोणताही पुरुषार्थ नाही हे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ठसविणे व एक सशक्त समाज घडविणे हि आपल्या प्रत्येकाची जबादारी आहे.
प्रत्येक समस्येला उत्तर आहे. ते एखाद्यावेळेस समस्येमध्ये सापडलेल्या त्या व्यक्ती कडे नसेल तर तो व्यक्ती तज्ञ व्यक्तीची , मानसोपचार तज्ञांची मदत या कामी घेवू शकतो. मानसोपचार तज्ञांची मदत घेतली तर आपल्याला वेडा ठरविले जाईल हा गैरसमज दूर करावा लागेल. निराशेचे मळभ दूर करण्यासाठी एक आदर्श जीवनशैली अंगिकारावी लागेल. वाचन, चिंतन, व्यायाम, ध्यान, छंद, संगीत याची कास धरावी लागेल. याचे महत्व शिकवावे लागेल.. जीवनशात्राच्या व्याकरणाचे धडे गिरवावे लागतील.
कुटुंबातील संवादाचे महत्व, नात्याचे महत्व, एकत्र कुटुंबांचे महत्व, मित्राचे महत्व, अधोरेखीत करावे लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वर्तनातील होणा-या अचानक बदलांची दखल व्यस्त जीवनक्रमात देखील घ्यावी लागेल. व्यसनापासून दूर, अध्यात्माची कास धरणारी पिढी आपल्याला घडवावी लागेल. नात्याचे, ताणाचे, पैशाचे व्यवस्थापन आपल्याला शिकवावे लागेल.
. विद्यार्थी दशेतच उच्च ध्येयाने विद्यार्थी प्रेरित होणे, शरीराने, मनाने कणखर बनणे हे शिक्षण व कुटुंब व्यवस्थेने पहाणे निकडीचे आहे. . तंत्रज्ञानाचा वापर हा जीवन समृद्ध करण्यासाठी आहे ते संपवण्यासाठी नाही हे तंत्रज्ञानावर आरूढ व काहीसे स्वैर झालेल्या तरुणाईला समजावणे याची जबाबदारी व्यवस्थांना घ्यावी लागेल. एखाद्या परीक्षेतील अपयश म्हणजे जीवनातील अपयश नाही हे विद्यार्थी लोकांना पटवून देता येवू शकते. कुटुंबव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था या तीनही व्यवस्था मजबूत असतील, सजग असतील तरच आपण या आत्महत्या सारख्या संकटावर मात करू शकुत. नाहीतर या समस्येकडे व त्यातुन होणा-या नुकसानीकडे नुसते हताशपणे पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही.
(महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment