अध्यात्म आणि आपण

आजच्या आधुनिक जगात अध्यात्मिक असणे हे बुरसटलेपणाचे,  मागासलेपणाचे  लक्षण समजले जाते. असाही दृढ  समज  आहे कि अध्यात्मच्याकडे  वयाची ६५ , ७०  ओलांडल्यानंतर वळायचे असते. तसेच असाही गैरसमज आहे  अध्यात्मिक होणे म्हणजे सगळे सोडून देणे. भगवी  वस्त्रे परिधान करणे. हे सर्व  चुकीचे  मतप्रवाह आहेत. अध्यात्मिक होणे म्हणजे आधुनिकतेची कास सोडणे, तंत्रज्ञान न वापरणे , विज्ञानाच्या  संकल्पना  नाकारणे , अंधश्रद्धेला खतपाणी घालणे , सगळे सोडून देणे असा कदापि होत नाही. जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते . आजही  विज्ञानाला काही गोष्टीचा उलगडा झालेला नाही. ताणतणाव घालवण्यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू अश्या शरीराला  हानिकारक व्यसनाकडे वळण्याऐवजी भजन, कीर्तन,  देवपूजा, नामस्मरण करण्यात काय हरकत आहे.   यात कोणतीही हानी नाही व  खर्चही अगदी शून्य. पब, डान्सबार, कॅसिनो, रेसकोर्ट या कडे  पाय वळण्याऐवजी  देवळाकडे, यात्रेकडे  भजनाकडे, कीर्तनाकडे  वळला तर काहीही बिघडणार नाही. आचरट, दुहेरी संदर्भ असलेली गाणी आजच्या मुलांना तोंडपाठ होतात पण तेच एखादा अभंग, आरती , श्लोक मुलांना पाठ नाही. कारण  आज आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही हे सारे  विसरून गेलो आहोत. 'डे' संस्कृती मध्ये अडकलेलो आपण आपले सणवार, परंपरा त्यामधील अध्यात्मिक, वैज्ञानिक महत्व समजून घ्यायला तयार नाही . त्यामुळे पुढची पिढी देखील चुकीच्या व चंगळवादाच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे. जुने सर्व टाकाऊ व नवीन सर्व चांगले या चुकीच्या समजुतीने फार नुकसान होत चालले आहे. पाश्चात देशाने आपल्या एखाद्या गोष्टीला चांगले असे लेबल लावल्या शिवाय आपण त्या गोष्टीला महत्व देत नाही . रामायण, महाभारत, पौराणिक कथा आजी - आजोबांकडून ऐकत एक पिढी मोठी झाली पण हा वारसा ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यास कमी  पडली असे खेदाने  म्हणावे  लागेल.  

म्हातारपणी जीवनातील सर्व आव्हाने संपल्यानंतर अध्यात्मिक होणे कितपद योग्य आहे.  कॉलेज, नोकरी, व्यवसाय , प्रपंच जेथे जीवनाचा बराच काळ जातो आणि याच काळात नवनवीन  आव्हानांना माणसाला तोंड द्यावे लागते . याच काळात तो चुकीच्या वाटेने,  व्यसनाधीन होण्याची  शक्यता असते याच काळात अध्यात्मिकता त्यास तारून नेऊ शकते. बेछूट विकृत, कोणतेही तारतम्य न बाळगता जगण्यापेक्षा अध्यात्माची कास धरत पाप-पुण्याचा विचार करत जगणे कधीही चांगले. आजही  गीतेचा, महाभारताचा, रामायणाचा अभ्यास करून त्यातली  शिकवण जीवनात उतरवत जीवनाची वाटचाल सोपी होऊ शकते. संत साहित्यातुन जीवनाचे सखोल ज्ञान मिळू शकते एवढी ताकद त्यात आहे. रोजच्या जीवनातील सगळ्या भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडत  मनःशांती उत्तम ठेवत जगणे अध्यात्मामुळे शक्य होऊ शकते. अध्यात्म म्हणजे वैराग्य नव्हे . मी सर्व काही करेन पण त्यात अडकून पडणार नाही, एक परमशक्ती आहे तीला आपण कोणत्याही  नावाने ओळखत असू ती आपल्याला हरू देणार नाही हा विश्वास अध्यात्मिक माणसाकडे असतो. आजही लाखोने पंढरपूरला जाणारे वारकरी, वेगवेगळ्या देवस्थानाच्या  ठिकाणी निघणाऱ्या यात्रा, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, वेगवेगळ्या देवांचे जन्मोत्सव, धार्मिक प्रवचने, कीर्तने, संत्सग  अध्यात्माचा वारसा जपून आहेत हेही नसे थोडके. त्यात माणसाचा सहभाग वाढावा एवढेच.     


(महेश भा. रायखेलकर)              

Comments

Popular posts from this blog