तीळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण. सर्वत्र तीळ गुळाचे वाटप. ते देतांना आपण नेहमीच्या प्रथे प्रमाणे म्हणतो "तीळगुळ घ्या गोड गोड बोला!". म्हणजे कसं बोला? . गोड आवाजात ? का गोड शब्दात ? का चापलूसीने गोड गोड?. त्या दिवसापुरते ? त्या आठवड्यापुरते ? त्या महिन्यापुरते? त्या वर्षापुरते ? का येथून पुढे पूर्ण आयुष्यभर ? असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालतात. याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास काही गोष्टी लक्षात येतात. गोड बोलायचं म्हणजे कसं बोलायचे, तर त्याचे उत्तर आहे आपल्याला जसं इतरांनी बोललेलं आवडेल तसं. समोर त्याच बरोबर आपल्या माघारीही. कसं आवडतं आपल्याला बोललेलं ? . कठोर, नक्कीच नाही. वर वर गोड तसही नाही. कामापुरते गोड, हे तात्पुरते आवडेलही पण नंतर समोरच्या व्यक्तीचे अंतरंग कोणत्या ना कोणत्या प्रसंगी आपल्याला समजेल आणि हा व्यक्ती फक्त कामापुरते गोड बोलतो हे आपल्याला लक्षात येईल. असा कामापुरता गोड बोलणारा व्यक्ती नक्कीच आपल्याला आवडत नाही. समोर गोड बोलणारा पण आपल्या माघारी आपल्याला नावे ठेवणारा व्यक्तीही काही काळानंतर आपल्याला लक्षात येतो आणि असा व्यक्ती आपल्या नजरेतून उतरतो.
वरील गोष्टी वरून आपल्याला लक्षात येतं कि ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्याच गोष्टी इतरांना देखील आवडत नाहीत, ज्या व्यक्तींशी आपण रोजच्या जीवनात संवाद साधत असतो, बोलत असतो . कारण इतर व्यक्तीदेखील आपल्या सारख्याच हाडामासाच्या आणि मन असणाऱ्या व्यक्ती आहेत . इतरांनी कठोर बोललेले जसे आपल्याला आवडत नाही तसेंच आपणही इतरांशी बोलतांना कठोर शब्द टाळणे आवश्यक आहे. त्या साठी रागावर विजय मिळवावा लागेल. तुम्ही चापलुसीने गोड गोड बोलत असाल तर ते देखील समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल तेव्हा अशी चापलुसी संवाद साधतांना टाळणे योग्य. एखाद्या व्यक्तीच्या समोर गोड बोलणे व त्याच्या माघारी त्यास नावे ठेवणे हि वृत्ती जर आपण बाळगत असू तर ती आपल्यासाठी हानिकारक आहे. आपण व्यक्ती वर टीका जरी करत असुत ती देखील योग्य शब्दात व शक्यतो समुहात न करणे हितकारक ठरते. गोड बोलून काम करून घेणे अशी काहींची नीती असते हि नीती काही प्रसंगी काही व्यक्तीच्या बाबतीत यशस्वी ठरू शकेल पण सर्वांच्या बाबतीत सर्व प्रसंगी हि नीती लागू पडेल असेही नाही. त्यामुळे गोड शब्दाला गोड, चांगल्या व्यवहाराची, वागणुकीची सांगड घालणे आवश्यक ठरते. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" हे ब्रीद या ठिकाणी आठवते. बोलतो एक पण करतो भलतेच असा व्यक्ती कधीही जनमानसात वंदिला जाणार नाही. अशी वृत्ती नातेसंबंधात देखील बाधा आणते. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकणे हे देखील एक प्रभावी संवादाचे लक्षण आहे. नाते संबंध सुदृढ करण्यासाठी संवादाचे शास्त्र आपल्याला शिकावे लागेल.
शब्द हे शस्त्र आहेत त्याचा योग्य तो वापर बोलण्यात करणे गरजेचे आहे. अंतरंगात माधुर्य आणल्याशिवाव बोलण्यात माधुर्य येणे केवळ अशक्य. यासाठी आपले अंतरंग शुद्ध, सुंदर करणे आवश्यक आहे. हि एक साधना आहे. ती परिश्रमाने साध्य होवू शकते. त्यासाठी आपल्यातील दुर्गुणांवर काम करावे लागेल. त्यावर काम करण्याआधी आपल्यात काही दुर्गुण आहेत हे प्रथम आपल्याला मान्य करावे लागेल. मकर संक्रातीच्या निमित्ताने आपल्यातील हे दुर्गुण हुडकून काढूयात आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करूयात. असे केल्यास आपले अंतरंग गोड होईल व असे गोड अंतरंग असलेल्या व्यक्तीच्या मुखातून आयुष्यभर गोडच शब्द बाहेर पडतील . अश्या व्यक्ती साठी "तीळ गुळ घ्या गोड गोड बोला" हे वाक्य नुसते औपचारीक असेल. सर्वांना मकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा !!
(महेश भा. रायखेलकर )
.jpg)
Comments
Post a Comment