डायरीतील बारा पाने
मी मागील काही वर्षापासून पुढील वर्षातील कामाचे नियोजन काही संकल्प वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका डायरीत लिहून ठेवतो. यात कौटूंबीक, वैयक्तिक, व्यवसायीक, आर्थिक, खरेदी अशी वर्गवारी केलेली असते. दर महिन्यात यावर नजर टाकून व त्या त्या महिन्याची कामाची यादी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तयार करतो ज्यात आधी नियोजन केलेल्या काही गोष्टीचा समावेश केलेला असतो . यावर्षी यात अजून एक गोष्ट जमा केली ती म्हणजे त्या त्या महिन्याच्या कामाच्या यादीच्या मागच्या बाजूला त्या महिन्यात कोणती कामे झाली, काही विशेष घटना हे बाराही महिने लिहीत गेलो आणि आता वर्षीच्या शेवटी जेव्हा हि डायरी मी वाचतोय तेव्हा एक एक घटनेचा पदर माझ्या समोरून सरकत जातोय. लहान लहान गोष्टीची जसे कि हुरडा पार्टी असेल, वाढदिवस साजरा करणे असेल, एखादा लेख पेपर मध्ये छापून आलेला असेल, एखादी ट्रिप केलीली असेल, एखाद्या कवी संमेलनात भाग घेतला असेल, मुलाने एकाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल, एखादी लहान वस्तू खरेदी केलेली असेल याची नोंद केलीली असल्याने ते वाचतांना त्या त्या घटनेचा आनंद परत ताजा झाला. हे जर मी लिहून ठेवले नसते तर या बारीक- सारीक घटना विस्मृतीत गेल्या असत्या व वर्षाच्या शेवटी फक्त काही ठळक गोष्टीच मनःपटलावर आल्या असत्या व त्यानुसार वर्षाचे आकलन केले गेले असते. पण नोंद केलीली असल्याने हे ठामपणे मी सांगू शकतो कि हे वर्ष चांगले गेले. आणि आत्ताच ठरवलं कि परत या ठळक घटना एका पानावर लिहून ठेवायच्या कि ज्याची एक पाच-दहा वर्षाने परत उजळणी होवू शकेल व त्याचा आनंद परत घेता येईल . काही नियोजित कामे तशीच राहिली याची थोडीशी बोच मनाला नोंद केल्यामुळे लागते. एवढी कळ तर सोसावीच लागेल. राहिलेली कामे पुढील वर्षी पूर्ण करण्याची उमेद घडून गेलेल्या चांगल्या घटना नक्कीच देतील याची मला खात्री आहे आणि आपल्या सदिच्छा पाठीशी आहेतच.
अश्या बारीक सारीक गोष्टीचा आनंद लुटणे व त्याची नोंद
ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटते. मला हि डायरीतील बारा पाने गत काळात नेऊन खूप सुखावून गेली. आपण अशी नोंद ठेवत असाल तर चांगलेच आहे नसाल तर उचला पेन आणि लिहा आणि वर्षाच्या शेवटी बघा वाचतांना काय आनंद मिळतो ते !!!!!
"नववर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा"
(महेश भा. रायखेलकर)
.jpg)
Comments
Post a Comment