स्वतःला शाबासकी द्या

कौतुकाने माणूस सुखावतो. एखादी गोष्ट साध्य केली तर कोणी तरी आपली प्रशंसा करावी, शाबासकी द्यावी, कौतुक करावं असं वाटणं हे स्वाभाविकच . पण यासाठी सर्वस्वी दुस-यावरच अवलंबून राहणे हे मात्र चुकीचे आहे. एखादी मोठी कामगीरी साध्य केली तर इतरांकडून कौतुक, शाबासकीचा वर्षाव होईलही.  परंतु रोजच्या जगण्यामध्ये आपण काहींना काही साध्य करत असतो.  काहीतरी लहानसं काम साध्य केलेले असतं तेव्हा आपण स्वतःला शाबासकी देतो का ? याचे उत्तर कदाचित नाही असेच असेल. कौतुक, शाबासकी, प्रशंसा हि इतरांनीच आपल्या बाबतीत करायची असते अशी आपली एक चुकीची धारणा आहे.  
आजच्या जलद गतीच्या जगण्यामध्ये तुमच्या लहान सहान साध्य केलेल्या गोष्टीचं  इतरांकडून कौतुक होईल हि अपेक्षाच चुकीची आहे. मग काय करायचं तर स्वतः च स्वतः ला शाबासकी द्यायची कारण तुम्ही साध्य केलीली कामगिरी जसं कि खूप दिवसापासून रखडलेलं  असलेलं सरकारी काम पूर्ण होणे,  अनेक काम एकाच दिवसात पूर्ण करणे, तुम्ही लावलेला झाडाला फुलं येणे, पहिल्यादांच बनवलेला पदार्ध चांगला होणे, एखाद पहिल्यांदाच केललं काम यशस्वीरीत्या पूर्ण होणे, नवीन तंत्रज्ञान शिकणे, तुम्ही जोपासत असलेला छंद जसं गाणं, चित्रकला, लेखन, नृत्य इत्यादी उत्कृष्ट होणे अशी कामगिरीची यादी खूप मोठी होऊ शकते .  कदाचित हि साध्य केलेली कामगिरी   लहान असली तरी त्याच लहानसं सेलिब्रेशन करण्यास काय हरकत आहे. मग हे  सेलिब्रेशन कोणत्याही स्वरूपाचे असु शकेल जसं कि तुमचा आवडीचा पदार्ध खाणे असेल, आवडीचं पेय पिणं असेल, एखादी आपल्यासाठी लहान वस्तू खरेदी करणं असेल, आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणे असेल, चित्रपट, नाटक पाहणे असेल . व्यक्तिपरत्वे यात बदल होऊ  शकतात. यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची  देखील आवश्यकता नाही. फक्त अश्या सेलीब्रेशन साठी आपल्याला वेळ काढावा लागेल.  अशा प्रकारे लहान सहान गोष्टीत देखील आनंद शोधता आला पाहिजे. तुम्ही म्हणाल असे केल्याने काय होईल?. तुमचा काम करण्याचा उत्साह वाढेल. काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल. स्वतः च्या कौतुकाची भूक भागेल.स्वतःसाठी देखील वेळ काढायचा असतो हे समजेल.  स्वतःवरच प्रेम वाढेल. स्वतःवरचा विश्वास वाढेल.  आपला आनंद आपण शोधायचा असतो हे तुम्हाला उमगेल. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तुम्ही असे लहान लहान सेलिब्रेशन करायला लागलात तर मोठ्या कामगिरीचे सेलिब्रेशन तर नक्कीच कराल यात कोणतीही शंका नाही   एखाद्यावेळेस तुमच्या मोठ्या कामगिरीची पाहिजे तशी दखल इतरांनी घेतली नाही तरी तुम्ही अशा  परिस्थिती मध्ये निराश होणार नाहीत. 
एकदा आपला आनंद आपल्यात आहे हे जीवनाचे मर्म समजले कि तुम्हाला कोणी दुसरे दुःख पोचवू शकणार नाही आणि जरी पोहचवले तरी तुम्ही दुःखी होणार नाहीत. स्वतः आनंदी रहाल तरच दुस-याला आनंद देऊ शकाल. स्वतःवर प्रेम कराल तरच दुस-यावर प्रेम करू शकाल. अशाप्रकारे जगणं हेच एक सेलिब्रेशन होईल. बघा स्वतः शाबासकी देण्याचे एवढे सारे फायदे आहेत आणि तोटे म्हणाल तर अगदी शून्य. तर द्याल ना मग येथून पुढे शाबासकी  स्वतः ला  ? 


(महेश भा. रायखेलकर )

Comments

Popular posts from this blog