कर्तृत्वाने सुंदर दिसूया

प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर  असावं, दिसावं. विशेषतः तरुण मुलां-मुलींना. त्यातल्या त्यात  जास्त  मुलींना . यात वावगं असे काहीही नाही. हि एक तारुण्यसुलभ  भावना आहे. आजच्या चकाचौधच्या  दुनियेमध्ये बाह्य सौदर्यांस जरा जास्तच महत्व आलेले आहे. बाजारात अनेक सौदर्यं साधने आहेत . ते बनवणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय तेजीत आहे. पण  प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे शारीरिक सौदर्यां मध्ये माझे असे कोणते कर्तृत्व  आहे. फार तर आई वडील सुंदर असतील तर त्यांची मुलं सुंदर  जन्माला येतील,  तेही शरीराने कर्तृत्वाने नाही. कोणाच्या पोटी  जन्माला यावे हे माणसाच्या हातात नाही तर जन्माने मिळालेला सौदर्यांचा अभिमान व गर्व बाळगणे कितपद योग्य आहे. इथे सुंदर दिसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्धल कोणताही आकस  व राग नाही. फक्त शारिरीक सौदर्यां पुरती व्यक्तीने मर्यादित राहु नये एवढेच. कारण शारिरीक सौदर्यं चिरकाल टिकणारे नाही . काळाच्या ओघात त्याला कधी ना कधी उतरती कळा लागणारच. मग चिरकाल काय उरतं ?  ते कर्तृत्वाचे सौदर्यं . तरुण मुल-मुली आपल्या शारिरीक सौदर्यां बद्धल फार सजग असतात. त्यात जर काही कमी-जास्त असेल तर त्यांच्यात  न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते . तर मी  येथे आवर्जून  सांगेन असा कोणताही  न्यूनगंड  बाळगू नका. तुम्ही उंच आहात का बुटके , तुम्ही गोरे आहात का काळे, तुम्ही जाड आहात का बारीक, तुमचे नाक सरळ आहे का वाकडे, तुम्हाला केस आहेत का टक्कल पडले  आहे, तुमचे केस काळे आहेत का का काही कारणाने  वयोमानानुसार पांढरे झाले आहेत अश्या बाबी तुमच्या कर्तृत्वाच्या आड येऊ शकत नाहीत. अनेक उदाहरणाने हे मनावर ठसवता येईल. जिथे शारीरिक सौदर्यांस जास्तच महत्व आहे अश्या मायानगरीत शरीराने फार सुंदर नसतानाही आपल्या अभिनयाच्या कर्तृत्वावर काहींनी  मैदान मारले आहे. अभिनयाचा शहेनशहा अमिताभ बच्चन सामान्यपेक्षा जास्त उंच आहेत . सुरवातीच्या काळात त्यांना याच  उंचीमुळे नाकारले गेले. पण आज आपण पहातो आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एवढी उंची गाठली आहे कि भल्याभल्याना ती उंची गाठणे शक्य नाही. ओमपुरी यांच्या चेहऱ्यावर तर देवीचे व्रण  होते पण अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. अनुपम खेर यांच्या डोक्यावर एकही केस नाही परंतु चरित्र  अभिनेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मराठीतील अशोक सराफ दिसायला अगदी सामान्य पण आपल्या   अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेमा त्यांनी गाजवला. निळुफुले कुठे दिसायला सुंदर होते पण  त्यांच्या अभिनयास तोड नाही.  चार्ली चॅप्लिन दिसायला ठेंगणा , सामान्य पण त्याच्या विनोदी अभिनयाची भुरळ सगळ्या जगाला आजही पडते . अशी अनेक उदाहरणे सिनेसृष्टीमधील देता येतील ज्यांनी आपल्या शारीरिक सौदर्यांस मारक ठरणाऱ्या गोष्टीवर मात करत आपल्या अभिनयाच्या कर्तृत्वाने सिनेसृष्टी सुंदर  बनवली. इतर क्षेत्रही याला अपवाद नाहीत. गायक कलाकार स्वर्गीय किशोर कुमार , लता  मंगेशकर , महंमद रफी हे दिसायला सुंदर नव्हते पण त्यांच्या आवाजातील गाणी आजही त्यांच्यानंतरही रसिकांना मोहनी घालतात   कारण  गाण्यातील त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे. इंडियन आयडॉल मधील परीक्षक  व गायक नेहा  कक्कर  उंचीने ठेंगणी आहे पण गाणाच्या प्रागंणात किती उंच. आपला लाडका सचिन तेंडुलकर तसा बुटका पण   आपल्या   कर्तृत्वाने  क्रिकेटला त्याने एका उंचीवर नेऊन ठेवले,  भारताची मान जगात उंचावली . पी. टी. उषा ,  मेरी  कोम , सायना नेहवाल , पी. व्ही . सिंधू या शारीरिक सौदर्यांच्या बळावर नाही तर खेळातील कर्तृत्वाने जगभर गाजल्या. आजच्या मुलींनी हि गोष्ट लक्षात घ्यावी. स्वर्गीय भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम कोठे दिसायला सुंदर होते पण कर्तृत्वाने ते आवडते राष्ट्रपती ठरले ,  तरुण त्यांना आपला आदर्श मानतात . रतन टाटा , मुकेश अंबानी , नारायण मूर्ती  हे दिसायला सुंदर नसतीलही   पण व्यवसायातील त्यांचे कर्तृत्व आभाळाएवढे आहे.   राजकारणातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी , बाळासाहेब ठाकरे ,  जॉर्जे फर्नांडिस ,आर. आर. पाटील यांनी आपला राजकारणात ठसा उमटविला तो कर्तृत्वाने . नुसते शरीराने सुंदर असलेल्या किती व्यक्ती असे कर्तृत्व गाजवू शकतात . समाजकारणात बाबा आमटे , मेधा पाटकर , विनोबा भावे , अण्णा हजारे यांचे योगदान कोण विसरेल . हे सर्व समाजकारणी दिसायला अगदी सामान्य पण कर्तृत्व अफाट . अर्थात चांगले, टापटीप  राहणे, चांगला  पहिराव करणे , आवश्यक एवढा सौदर्यं प्रसाधनांचा वापर करणे    गरजेचे आहे पण  खरं सांगू तेही  कर्तृत्वान माणसालाच जास्त उठून दिसते .  कर्तृत्वाने शून्य पण  चांगला  पहिराव  घातलेला , सौदर्यं प्रसाधनांचा वारेमाप वापर करणारा व्यक्ती कसा उठून दिसेल .   कर्तृत्वाचे तेज नक्कीच तुमच्या सौदर्यांत भर घालते मग तुम्ही साधे राहत असला तरी . वरील सर्वांनी आपल्या शारीरिक सौदर्यांतील कमतरतेवर मात करत आपल्या कर्तृत्वाने आपापली क्षेत्रे गाजवली. आपण त्यांना आपला आदर्श मानतो ते त्यांच्या कर्तृत्वामुळे ना की शारीरिक सौदर्यांमुळे . तेव्हा असे कर्तृत्वाने सुंदर दिसण्यास काय हरकत आहे ? 

(महेश भा.  रायखेलकर)

       

Comments

Popular posts from this blog