यांच्यातील उर्जेला सलाम

अमिताभ बच्चन वय वर्ष ८० अजूनही तरुणाला लाजवेल अश्या जोशात काम करतात  .  कोठेही आपले म्हातारपण ते मिरवत नाहीत. गेली पाच दशके आपल्या अभिनयाने त्यांनी मोठा व छोटा पडदा  गाजविला व आजही 'केबीसी' च्या माध्यमातून व नुकताच आलेल्या 'उंचाई'  या चित्रपटातून  त्याच र्जेने त्यांनी काम केले आहे, करत आहेत . जीवनात आलेल्या चढ-उताराला सामोरे जात, शारीरिक व्याधीवर मात करत , जीवघेण्या अपघातातून बरे होत, आर्थिक दिवाळखोरीला सामोरे जात , फिल्म इंडस्ट्री मधील नवनवीन  तंत्र ,गोष्टी शिकत, नवीन सहकलाकारांसोबत स्वतःला जुळवत काम करणे सोपी गोष्ट नव्हे. आजच्या पिढीला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आशा भोसले वय वर्ष ८९ आजही त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. रिऍलिटी शो मध्ये जाणे, तरुण गायक कलाकारांना मार्गदर्शन करणे , प्रसंगी गाणे त्याच जोमात चालू आहे. स्वर्गीय गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या सोबतच आशा भोसले यांची देखील गायन क्षेत्रात वेगळी ओळख आहे. आशा  भोसले यांची गाण्यातील विविधता अलौकिक. आपल्या खाजगी आयुष्यातील कटू प्रसंगाला सामोरे जात, गाण्याची उर्मी कायम ठेवत गायन क्षेत्रावर त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविला . वयाच्या ८१ वर्षी देखील  श्री . शरद पवार राजकारणात ठाण मांडून आहेत. कॅन्सर सारख्या आजारावर मात करत , भल्याभल्या राजकारणांना पाणी पाजत, आपल्याच पक्षातील बंड मोडत, सतत कार्यरत राहणे हे साधे काम नाही . पायाला पट्ट्या बांधून आजही सर्वत्र राजकारण, समाजकारण साठी ते संचार करतात. आपल्या पक्षावरील त्यांची पकड थोडीही ढिली झालेली नाही. मागील काही दिवसापूर्वीच ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असतांना , डॉक्टर ने मनाई केली असतांनाही  पक्षाच्या अधिवेशनाला हजर राहिले व आपल्या कार्यकर्त्याना त्यांनी मार्गदर्शन केले. ८४ वर्षाचे श्री.  रतन टाटा आजही कार्यरत आहेत. या वयातही नवीन जबाबदाऱ्या घेण्यास ते तयार असतात  कार्पोरेट जगात आजही त्यांचा तेवढाच दबदबा आहे.  शास्त्रीय गायिका  श्रीमती प्र. भा. आत्रे आजही वयाच्या ९० वर्षी कार्यरत आहेत. स्वतःचे गुरुकुल चालवतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. माझ्या असे वाचण्यात आले आहे की त्या  स्वतःच  कार देखील ड्राईव्ह करतात.  ८८ वर्षीय गीतकार, निर्देशक, कवी श्री. गुलजार आजही आपल्या लेखणीतून नवीन नवीन गाणी लिहीत आहेत, सिनेक्षेत्रात कार्यरत आहेत. नवीन चित्रपटाचे निर्देशन करीत आहेत. 

वरील सर्वांनी आपापल्या क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान कमावला असला तरी ते थांबले नाहीत. आपल्या क्षेत्राला एक नवीन आयाम देण्यासाठी ते आजही त्याच उमेदीने, त्याच उत्साहात  कार्यरत आहेत. वय, शारिरीक  व्याधी त्यांना थांबवू शकल्या नाहीत. 

आपण वयाची चाळीशी-पन्नाशी गाठली की 'बास झाले आता' '  थकलो बुआ '  असे म्हणतो. काहीजण तर रिटायरमेंट चे नियोजन सुरु करतात. साध्या-साध्या व्याधी समोर नमते घेतात. अपयश आले की खचून जातात, नाऊमेद होतात. अश्या प्रसंगी वरील उदाहरणे डोळ्यासमोर आणा. वरील सर्वांनी सलग ५०-५५ वर्ष एकाच क्षेत्रात अलौकिक काम केले आहे. अपयशाला ते देखील सामोरे गेले असतील, वयानुसार येणाऱ्या शारिरीक व्याधी त्यांना देखील आल्या असतील. खाजगी आयुष्यातील झालेली हानी त्यांनी देखील पचवली असेलच. कितीतरी संकटाना यांनाही सामोरे जावे लागले असेल. कित्येक जणांकडून झालेले अपमान पचवावे लागले असतील. यशाबरोबर येणाऱ्या अनेक प्रलोभनांचा  मोह त्यांनाही पडला असेल. या सर्वांवर मात करत आजही आपल्या आपल्या क्षेत्रात ते पाय रोवून उभे आहेत. 

जीवनातील आलेल्या यश-अपयश याकडे तटस्थेने पाहत ,आलेल्या संकटाला धीराने सामोरे जात , शरीर स्वास्थ व मन स्वास्थ उत्तम ठेवत, कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता, स्वतःची उर्जा, उत्साह वाढवीत आपल्या ठरविलेल्या क्षेत्रात दीर्घकाळ सजगतेने मार्गक्रमण करणे शक्य आहे हेच यावरून दिसून येते .  

(महेश भा. रायखेलकर)

Comments

Popular posts from this blog