"स्वच्छ्ता राखा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र सगळीकडे घाण करून ठेवावे !
"मुली वाचवा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून नुसते बोंबलावे!
"झाडे लावा झाडे जगवा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र झाडाच्या सावलीत पत्ते कुटत बसावे !
"वाहतुकीचे नियम पाळा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र घरचाच रस्ता समजून बिनधास्त वाहन हाकावे !
"रक्त-नेत्र-देह दान करा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र नुसते घेण्यासाठी हात पसरावे !
"कर भरा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र काळ्याचे पांढरे करण्यात स्वताला गुंतवावे!
"योग- व्यायाम करा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र शरीराचे चोचले पुरवत राहावे !
"हुंडा घेवू देवू नका" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र त्यासाठी मुलीला छळावे !
"मतदान करा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र नेत्यांच्या नावे बोटे मोडत बसावे !
"पाणी वाचवा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र आपल्या चारचाकीला पाईप लावून धुवावे !
"शौचालय बांधा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र जाहीरातेतील विद्या बालन ला पाहावे !
"पोलिओ डोस पाजा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र सरकारला उपदेशाचे डोस द्यावे !
"दारू -तंबाकू -गुटका पासून दूर राहा" हे देखील सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र व्यसनाला बळी जावून स्वताला उध्वस्त करावे !
आपली प्रत्येक कर्तव्ये करण्यासाठी सरकारनेच सांगावे
आम्ही मात्र नुसतेच हक्कासाठी भांडावे !
आम्ही मात्र नुसतेच हक्कासाठी भांडावे!!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment