नियोजनाचे महत्व समजून घेऊया
एका प्रसिद्ध विनोदी लेखकाचे एक वाक्य आहे "ऐन वेळेस होण्यासारखी एकच गोष्ट ती म्हणजे फजिती". या वाक्यातून नियोजनाचे महत्व अधोरेखीत होते. नियोजन नसेल तर तारांबळ, फजिती, कामात चुका , ताणतणाव अशा गोष्टींना सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विद्यार्थी लोकांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल . गृहिणीला आपल्या घरातील दैनंदिन कामाचे नियोजन करावे लागेल. नोकरदाराला आपल्या नोकरीतील कामाचे नियोजन करावे लागेल तर व्यावसायिकाला आपल्या व्यवसायातील कामाचे. म्हणजे सर्वत्र नियोजन आवश्यकच आहे. जेवढे काटेकोर तुम्ही बारीक बारीक गोष्टींचे नियोजन कराल तेवढी कामे यशस्वी होतील.
आपण दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे, वर्षाचे, पुढील पाच वर्षाचे नियोजन करू शकतो. पण नुसते कागदावर नियोजन करून भागणार नाही तर त्या नियोजनाची अंमलबजावणी देखील तेवढीच काळजीपूर्वक करावी लागेल. काही मोठ्या कामात आपल्याला ए प्लॅन , बी प्लॅन असे पर्याय ठेवावे लागतील. ए प्लॅन जर काही कारणामुळे फसला तर बी प्लॅन अंमलात आणता येईल . पण याचे पूर्व नियोजनच नसेल तर काहीही साध्य होणार नाही.
आपली काही कामे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. अश्या वेळेस खूप आधीपासून नियोजन केले तर काहीही गडबड होत नाही. ऐन वेळेस एखादे काम आपण दुसऱ्याला सांगितले तर तो व्यक्ती तरी आपले काम कसे करणार. नैसर्गिक आपत्ती , आजारपण, यंत्राचा बिघाड, संप, सणांच्या सुट्ट्या अश्या काही कारणामुळे केलेले नियोजन कोलमडू शकते तेव्हा या सर्व बाबी महत्वाच्या कामाच्या नियोजन करतांना लक्षात घेणे गरजेचे असते.
आपण पाहतो कधी कधी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विपरीत परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आपण पाहतो. दर पावसाळ्यात वर्षानुवर्षे मुंबई तुंबते. याच काळात काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी होते . पूर्व नियोजन केले तर या गोष्टी टाळता येतात. काही ठिकाणी पाऊस चांगला पडतो पण पाणी साठविण्याचे नियोजना अभावी उन्हाळ्यात जनतेला पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागते. आरोग्य सेवेच्या गलथान नियोजनामुळे आजही कित्येक जीव जातात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या वरून आपल्याला हे लक्षात येईल नियोजनाला किती महत्व आहे.
आर्थिक नियोजन, कुटूंब नियोजन,स्वास्थ नियोजन घरातील खाद्य सामृगी व इतर दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी, गाड्यांची सर्व्हिसिंग , विविध बिलांचा भरणा, विविध टॅक्सचा भरणा याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
मान्य सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्यातरी नियोजनामुळे कामे सुरळीत होतात. वेळेची नासाडी होत नाही. पैशाचा अपव्यय टळतो आणि हे सर्व झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आनंद व समाधान मिळते. आपल्या सर्वांना जीवन जगण्यासाठी काही ना काही कामे तर करावीच लागणार आहेत. ती जर नियोजनपूर्वक केली तर जगणे सुंदर होईल. तेव्हा नियोजनपूर्वक जीवन सुंदर करण्याचा संकल्प करूया तेही नियोजनानेच !

Comments
Post a Comment