जगण्यासाठी आवश्यक जीवनमंत्र

जगण्यासाठी आवश्यक जीवनमंत्र  खाली दिलेले आहेत ते जर  जीवनात उतरविले तर जीवनाचा,  आपल्या  व्यक्तीमत्वाचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही.  

१  वेगळं काही करा तरच वेगळं काही घडेल : जीवनात वेगळं काही घडावं असे वाटत असेल तर काही वेगळं करून  दाखवावे लागेल, की जे  या आधी कधी केलेले नाही . तेच तेच काम त्याच त्याच पद्धतीने केल्याने काही वेगळं कसे घडणार ?  तुम्हाला वेगळे निकाल पाहिजे असतील तर वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. वेगळ्या वाटा धुंडाळाव्या लागतील . वेगळ्या क्षमता ,  ज्ञान , विचार विकसित आत्मसात करावे लागेल. आपल्या जीवना बद्धलची काही चुकीची गृहीतके बदलावी लागतील. जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहावे लागेल. 

२. चिंता नको काळजी घ्या : भविष्या विषयीची, करीअर  विषयीची , मुलांविषयीची , कुटूंबाविषयीची चिंता करणे सोडा . कारण चिंता हा  एक नकारात्मक विचार आहे . जो तुमची क्षमता , ऊर्जा नष्ट करतो. चिंता  म्हणजे चिता हे लक्षात घ्या . त्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या . स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या . मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्यावर चांगल्या संस्कार करण्याची काळजी घ्या. स्वतःच्या व्यवसायाची ,  ग्राहकांची काळजी घ्या  . कुटूंबाची   काळजी घ्या त्यांना वेळ द्या . माता - पिता जर वृद्ध असतील तर  त्यांच्या औषधोपचाराची काळजी घ्या. त्यांना मानसिक आधार द्या . एखादा छंद , कला जोपासा . निसर्गाचा आनंद घ्या . तेव्हा चिंता  नको तर काळजी घ्या. 

३.  प्रत्येकाचे स्वतःचे एक जग असते : एखाद्या प्रसंगी किंवा गोष्टी विषयी प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते . कारण प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक जग असते व त्या जगात त्याने जीवनात घेतलेले अनुभव , त्याच्यावर झालेले चांगले किंवा वाईट संस्कार , त्याची बुद्धिमत्ता, त्याचे शिक्षण, त्याची क्षमता याचा समावेश होतो. हे आपल्याला नीटसे समजले तर आपले नातेसंबंध सुदृढ होण्यास याची मदत होईल . तसेच एखाद्या व्यक्तीचे आचरण समजणे सहज शक्य होऊ  शकेल . एखादा व्यक्ती असाच का वागतो याचे गमक आपल्याला लक्षात येईल. 

४.  वाईट काळापासून शिकूया :  जीवनातील वाईट काळ देखील आपणास खूप काही गोष्टी शिकवून जात असतो . वाईट काळातच कोण व्यक्ती आपल्या सोबत आहेत , कोण नाही हे समजून   येते. वाईट काळातच आपल्या बुद्धिमत्तेचा , क्षमतेचा कस लागतो . वाईट काळातच मित्र , पैसा , वेळ, कुटूंब याचे महत्व  कळते . वाईट काळातच आपल्या   नीतिमत्तेची , मूल्यांची कसोटी लागते. हा काळच  आपल्याला जीवनाचे महत्व पटवून देतो. तेव्हा वाईट काळात निराश न होता त्याला  धीराने  सामोरे  गेल्यास हा काळच जीवनात आपल्या शिक्षकाची भूमिका बजावू शकतो . 

५. स्वतःमधील क्षमता ऊर्जा ओळखा : प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रचंड क्षमता असते. फक्त एक तर ती त्याला माहित नसते किंवा तो ती योग्य दिशेने वापरत  नाही . तो ती ऊर्जा अयोग्य कामासाठी किंवा अयोग्य ठिकाणी वापरत असतो . यामुळे त्याची अनमोल क्षमता वाया जाते . तेव्हा वेळीच जागे व्हा व स्वतःतील शारीरिक मानसिक व बौद्धिक क्षमता ओळखा . असे जर केल्यास जीवनात कोणतीही गोष्ट करणे अशक्य असणार नाही. तसेच तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. 

६. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका : तुम्ही चांगले काम करत असाल तर लोक काय म्हणतील याचा काडीचाही विचार करू नका . तुम्ही चांगले किंवा वाईट काम करा लोक काही ना काही टीका करतच असतात. चांगले काम केल्यानंतर देखील लोक तुमचे कौतुकच करतील अशी अपेक्षा करू नका. स्वतःच्या समाधानासाठी काम करा . तुमचे काम दिसेल व ते आधीची त्यांनी केलेली टीका विसरूनही जातील . तेव्हा टीकेला न घाबरता पूर्णपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा . 

७. स्पर्धेचा सकारात्मक  विचार : सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेचा सकारात्मक विचार करणे गरजेचे झाले आहे . तसे पाहिले तर कोणत्याही प्रकारची स्पर्धा अस्तित्वात नाही. हा एक आपण केलेला विचार आहे, जो कि आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करत असतो. आपण नेहमी इतरांशी तुलना करत असतो . त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो . पण आपण या जगात इतरांशी तुलना करण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. जर स्पर्धा करावयाची असेल तर स्वतःशी करा. विचार करा की आधी मी काय होतो आणि आता काय आहे. नक्कीच तुम्ही काही मिळविले असेल. आधी तुम्ही नोकरी करत असाल आता तुम्ही नोकरी देणारे झाले असाल . आधी तुम्ही कोणावर अवलंबून असाल आता कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आधी तुम्ही घेणारे असाल आता देणारे झाले असाल. आधीपेक्षा तुमच्या विचारांचा , बुद्धीचा , अनुभवांचा विकास झालेला असेल. तर स्पर्धा इतरांशी नको तर स्वतःशी करा. 

शेवटी एकच सांगावयासे वाटते जीवन अनमोल आहे त्याचे मोल ओळखा व आनंदाने जगा .



Comments

Popular posts from this blog