स्पर्धेचा सकारात्मक     विचार  आवश्यक 

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेचा सकारात्मक विचार करणे गरजेचे झाले आहे . तसे पाहिले तर कोणत्याही प्रकारची स्पर्धा अस्तित्वात नाही. हा एक आपण केलेला विचार आहे, जोकि आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करत असतो. आपण नेहमी इतरांशी तुलना करत असतो . त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो . पण आपण या जगात इतरांशी तुलना करण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. जर स्पर्धा करावयाची असेल तर स्वतःशी करा. विचार करा की आधी मी काय होतो आणि आता काय आहे. नक्कीच तुम्ही काही मिळविले असेल. आधी तुम्ही नोकरी करत असाल आता तुम्ही नोकरी देणारे झाले असाल . आधी तुम्ही कोणावर अवलंबून असाल आता कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आधी तुम्ही घेणारे असाल आता देणारे झाले असाल. आधीपेक्षा तुमच्या विचारांचा , बुद्धीचा , अनुभवांचा विकास झालेला असेल. तेव्हा स्पर्धा  कोठे आहे ?  आजही सर्वत्र  मग तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय प्रामाणिक , वेळेचे महत्व  जाणणारी, सेवाभाव जपणारी, कल्पक , सभ्य  व्यक्तींची  कमतरता आहे.   हे गुण तुमच्यात असतील  तर  तुम्हाला  स्पर्धेची भीती ती कसली ?   आजही चांगल्या डॉक्टर ,  इंजिनीअर , वकील, तंत्रज्ञ , शिक्षक इ. ची  उणीव समाजात  भासते हि उणीव  भरून काढू शकेल त्याला स्पर्धा कसली ?  आपल्या ग्राहकांचे हित  जपणारे ,  तत्पर सेवा देणारे , आपल्या सेवेची व मालाची गुणवत्ता जपणारे , वाजवी किंमत आकारणारे , नवीन तंत्रज्ञान स्वीकारत ग्राहकांना उत्तम सेवा देणारे  किती व्यवसाय आज बाजारात आहेत ? याचे उत्तर  आहे फारच  थोडे . ज्या व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे ह्या गोष्टी स्वीकारल्या आहेत त्यांना स्पर्धेचा विचार सुचतही नाही.  कालच्या पेक्षा आज मी स्वतःला कसे प्रगत करू शकेल याचा बारकाईने विचार करणारा  , नवीन तंत्रज्ञान स्वीकारत  , नवीन कल्पना  लढवत  पुढे जाणाऱ्याला कोणतीही स्पर्धा नाही. आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेला व्यक्तींची मदत घेण्यास कमीपणा मानू  नका .  त्यांनी स्पर्धेचा विचार  किती  सकारात्मकतेने केला हे त्यांच्याशी चर्चेतून कळेल .  जीवन एक खूप लांबचा प्रवास आहे ,  घाईने काहीही  साध्य होणार नाही. तेव्हा स्पर्धेच्या दबावाखाली  घाईत चुकीचा  मार्ग  निवडणे  धोकादायक ठरू शकते. प्रत्येकाचे जीवन वेगळे आहे,  प्राधान्यक्रम वेगळे आहेत, अपेक्षा वेगळ्या आहेत , मार्ग वेगळे आहेत तेव्हा  इतरांशी  स्पर्धा करत स्वतःला दुःखी  करणे शहाणपणाचे नाही. त्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत,  लहान लहान  गोष्टीचा आनंद घेत मार्गक्रमण करणे कधीही चांगले.                                  

Comments

Popular posts from this blog