विचारांचे सीमोल्लंघन करूयात 

आज  'दसरा' म्हणजेच विजयादशमी . 'दसरा सण मोठा नाही  आनंदाला तोटा ' असे आपण म्हणतो . खरंच  आहे या दिवशी सर्वत्र उत्साहाचे , प्रसन्न  वातावरण असते.  नवीन कपडे,  वस्तूंची खरेदी केली जाते. याच दिवशी शस्त्र पूजनही केले जाते . रामाचे  रावणावरील विजयाचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन या दिवशी केले जाते.   या दिवशी सीमोल्लंघनला महत्व  आहे. . सीमोल्लंघन म्हणजे याच दिवसी आधीच्या काळात शत्रूवर विजय मिळविण्यासाठी राज्याचा सीमा पार करून प्रस्थान केले जायचे. नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. या  सर्व कृतीसोबतच  विचारांचे सीमोल्लंघन करण्यास काय हरकत आहे ? जुने , कालबाह्य विचार टाकून देवून नवीन विचार  अंगिकारण्यासाठी या सारखा शुभ दिवस तो कोणता . विचारांच्या कक्षा रुंदावल्या तर प्रगतीचे आभाळ रुंदावेल. संकुचित विचार प्रगतीला अडथळेच निर्माण करतील. एका उच्च ध्येयाने प्रेरित होऊन त्याचा सतत विचारपूर्वक पाठलाग करणे  गरजेचे आहे. त्यासाठी तो मला असे म्हणाला, याने माझा अपमान केला , माझ्या बाबतीततच असेच  का ?  अश्या लहान सहान  विचारांपासून  स्वतःला दूर  ठेवावे लागेल . आज स्त्री- पुरुष बरोबरीने काम  करतात ,  घरासाठी कमवतात तेव्हा घरातील काही कामे स्त्री सोबत करण्यास पुरुषास कोणताही संकोच बाळगायचे कारण नाही. हे माझे काम नाही हा विचार पुरुषांना त्यागावा .  स्त्री ही अबला आहे , कमकुवत आहे , पुरुषापेक्षा कमी आहे या विचारांच्या सीमा आता छेदल्या गेल्या आहेत नसतील तर त्या छेदाव्या लागतील . स्त्रीने देखील स्वतःला  कोणत्याच बाबतीत कमी समजू नये. कोणत्या जाती , धर्मात जन्माला यावे हे माणसाच्या हातात नाही तेव्हा त्याचा  फुकाचा  अभिमानाचा , गर्वाचा  विचार त्यागावा लागेल. आपल्या ज्ञानाच्या , कष्टाच्या , सात्यत्याच्या बळावर आपण कोणतेही क्षेत्र  काबीज करू शकतो हा विचार  यशाला गवसणी घालू  शकतो. मी , माझे कुटूंब एवढा संकुचित विचार पार करून माझा देश , हे विश्व कसे समृद्ध होईल,   त्यासाठी माझे काही योगदान मी देऊ शकतो का याचा विचार प्रत्येकाने करावा. एक मानव म्ह्णून मी दुसऱ्या मानवाचे काही अंशी तरी कल्याण करू शकतो का असा विचार करणे क्रमप्राप्त आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो त्याच्या संवर्धनासाठी मी काय करतो याचा विचार  सर्वांनी करावा. पैशासाठी वाटेल त्या करामती करणे, भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविणे , स्वैराचार म्हणजे जीवन असले विचार मनाला शिवणार देखील  नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. जुन्या  सर्व चाली-परंपरा  निरुपयोगी आणि नवे सगळे चांगले असा विचार आपली हानीच करत आहे हे  समजून  घ्यावे लागेल. जुन्यातील चांगले  घेऊन नवीन उत्तम गोष्टीचा स्वीकार करत आपल्याला मार्गक्रमण करावे लागेल. काम, क्रोध , मोह, माया , मत्सर आदी विचारांचा त्याग करत प्रेम, आनंद,परोपकार, त्याग, सेवा   याला  स्वीकारून  विचारांचे सीमोल्लंघन करण्यास आपण सर्व सज्ज  राहुयात .  हे अनोखे सीमोल्लंघन  नक्कीच आपल्याला सर्वाथाने समृद्ध करेल .  सर्वांना नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !


(महेश भालचंद्रराव रायखेलकर) 

Comments

Popular posts from this blog