मर्द को दर्द नही होता

'मर्द को दर्द नही होता' अमिताभच्या  एका हिंदी चित्रपटातील गाजलेला डायलॉग. हाच   डायलॉग मला एका डॉक्टरांनीही ऐकवला बहुतेक तेही अमिताभप्रेमी असावेत जेव्हा मी त्यांच्याकडे मागे एकदा एका शाररिक पीडेच्या  उपचारासाठी गेलो होतो. खरच मर्द म्हणजे पुरुषाला दुःख होत नाही? तो माणूस नाहीये ? त्याला हृद्य, मन  नाहीये ? . निर्सगतः  स्त्री  हि कोमल मनाचीच  व पुरुष हे  कणखर मनाचेच   अशी स्त्री व पुरुषाची व्याख्या केली आहे. कदाचित शारीरिक क्षमतेचा त्याचा पाया असेल. एखादा पुरुष रडायला लागला कि 'काय बायकासारखा रडतो' अशी त्याची हेटाळणी केली जाते. तो कोणत्या गोष्टीला भीत असेल तर काय 'बायकासारखा भितो' असे शब्द त्यास ऐकवले जातात. म्हणजे भीती, वेदना, दुःख, निराशा या भावना मोकळेपणाने व्यक्त पुरुषाने करावयाच्या नाहीत असा अलिखित  नियम घालून दिला गेला आहे .  बिचारा पुरुष बाकी कोणते नियम एखादयावेळेस मोडेल पण हा नाही व वर त्याला फिल्मी डायलॉगचे  आवरणं पण घालेल 'मर्द को दर्द नही होता'. 

मुलगा, वडील, नवरा, भाऊ, काका, मामा , दीर अश्या अनेक नात्यात पुरुष विभागला जातो. प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे  निभावण्याचा त्याचा प्रयत्न असतो. जीवनात अनेक दुःखाला तो सामोरा जातो. पण ते दुःख मोकळेपणाने त्याला व्यक्त करता येत नाही. जीवनाच्या दुःखद प्रसंगी त्याला सावरण्याच्या भूमिकेत शिरावे लागते. इतरांना आधार द्यावा लागतो.  जगतांना अपमान, निराशा , शारिरीक पीडा यावर आपल्या कणखरतेने मात करावी लागते,  सोबत कोणी असो अथवा नसो. 'पुरुष आणि त्याला कोणाची सोबत लागते' हा विषयच हास्यापद बनतो. काही प्रसंगी 'एकला चलो रे '  हा मार्ग त्याला स्वीकारावा लागतो. 

मन मग ते स्त्रीचे असो वा पुरुषाचे दुःख,  आजारातील वेदना, अपयश, निराशा, आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू याचा विपरीत परिणाम त्यावर  होतोच. स्त्री एखाद्यावेळेस आपले दुःख रडून किंवा कोणाजवळ तरी मोकळे करेल पण पुरुषाला अशी मोकळीक नसते. पुरुषी अहंकार,  पुरुषत्वाची काहीअंशी   केलेली चुकीची  व्याख्या, समाजाचा दृष्टिकोन अश्या काही गोष्टी यातील अडसर ठरतात. याचे काही वाईट परिणाम पुरुष वर्गाला भोगावे लागतात. 

मी पुरुष आहे म्हणजे मी कधी रडायचंच नाही . मी पुरुष आहे म्हणजे मी कधी हळुवार व्हायचंच नाही . मी पुरुष आहे म्हणजे मी कधी हताश, निराश व्हायचंच नाही. मी पुरुष आहे म्हणजे मी कधी कोणाची सोबत मागायचीच नाही. मी पुरुष आहे म्हणजे मी शारीरिक पीडेतील वेदना सांगायच्या नाहीत  अशी काही चुकीची गृहीतकं  मोडीत काढणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष निसर्गतः शरीराने वेगळे वेगळे असली तरी व स्त्री हि हळुवार व पुरुष कणखर हि भूमिका निसर्गतः योग्य असली तरी तो न मोडता येणारा नियम बनू नये.  

कायम कणखर भूमिका निभावता निभावता आपण भावनाशून्य तर होत नाहीत ना याचा विचार पुरुष जातीने करावा . वरून कणखर दिसत असलेल्या पुरुषाच्या आत किती आणि कोणते वादळ चालू आहे हे ओळखणे गरजेचे आहे . पुरुषांनीही अश्या वादळांना आतच न थोपवता त्याला मोकळी वाट करून त्याचा निचरा करणे गरजेचे आहे .  कणखर असलेली भूमिका एखाद्यावेळेस आपण सोडली तर आपले हसे होईल असा चुकीचा गैरसमज पुरुषांनी सोडावा  व अश्या प्रसंगी स्त्रीने देखील त्याला समजून घेणे आवश्यक आहे कारण ' मर्द को भी कभी कभी दर्द होता है ' 

(महेश भा. रायखेलकर)

Comments

Popular posts from this blog